Veteran Actress Talks About Dharmendra : धर्मेंद्र बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेते होते. त्यांनी अनेक चित्रपटांत काम करीत त्यांच्या अभिनयशैलीद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. त्यांनी अनेक लोकप्रिय कलाकारांबरोबर काम केलं. अशातच आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्याबरोबर स्क्रीन शेअर केलेल्या लोकप्रिय अभिनेत्री आशा पारेख यांनी त्यांच्याबद्दल सांगितलं आहे.
धर्मेंद्र यांनी त्यांच्या अभिनयानं तर प्रेक्षकांची मनं जिंकलीच; पण त्याचा स्वभावसुद्धा खूप चांगला होता आणि त्यामुळे त्यांचे अनेकांबरोबर घट्ट संबंध होते, असं अनेक कलाकार बोलताना दिसतात. धर्मेंद्र यांनी आजवर अनेक अभिनेत्रींबरोबर काम केलं; पण त्यांची व आशा पारेख यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री काही औरच होती. अशातच आता आशा यांनी धर्मेंद्र यांच्याबरोबरच्या आठवणी शेअर केल्या आहेत.
आशा पारेख यांची धर्मेंद्र यांच्याबद्दल प्रतिक्रिया
धर्मेंद्र यांच्या ९० व्या जयंतीनिमित्त ‘एनडी टीव्ही’शी संवाद साधताना आशा पारेख यांनी त्यांच्याबद्दल सांगितलं आहे. यावेळी त्यांनी धर्मेंद्र यांच्यासाठी अनेक तरुण मुली वेडावल्या होत्या असं सांगितलं. त्या म्हणाल्या, “मुली त्यांच्यासाठी वेड्या असायच्या. धर्मेंद्रजी, राजेश खन्ना व देव आनंद यांच्याभोवती कायमच चाहत्यांची गर्दी असायची.” त्यावर त्यांना तेव्हा धर्मेंद्र यांची काय प्रतिक्रिया असायची, असं विचारल्यानंतर त्या म्हणाल्या, “त्या प्रसंगी ते खूप लाजायचे.”
धर्मेंद्र यांच्याबद्दल त्या म्हणाल्या, “धर्मेंद्रजी खूप निरागस होते; पण स्वभावाने खूप मिश्कील होते. मला आठवतंय की, जेव्हा आम्ही पहिल्यांदा भेटलो तेव्हा आम्ही दोघेही थोडेसे संकोचलो होतो. कारण- आम्हाला तेव्हा रोमँटिक सीन करायचा होता आणि तो सीन करणं कठीण होतं. आम्ही त्यावेळी दार्जिलिंगमध्ये होतो. सकाळी निर्माते मला म्हणाले, मला थोडी काळजी वाटतेय. तुम्ही दोघे कसे वागत आहात? एक इकडे, तर दुसरा तिकडे; आपण कसं शूटिंग करणार आहोत? तेव्हा मी म्हणाले की, पण, मी तर तसं काहीच केलं नाही. मग तुम्ही हे मला का सांगत आहात? त्यावर ते म्हणाले की, ही खूप विचित्र गोष्ट आहे. कारण- एक महिनाभर शूटिंग करायचं आहे आणि तुम्ही जर असं वागलात, तर ते चांगलं होणार नाही.”
धर्मेंद्र यांच्याबद्दल आशा पारेख पुढे म्हणाल्या, “ते माझ्या ‘द हिट गर्ल’ या पुस्तकाच्या लाँचला आले होते. आम्ही सतत संपर्कात नसायचो; पण आम्ही दोघांनी एकत्र दोन रिअॅलिटी शोमध्ये काम केलं होतं आणि मी त्यांना आमिर खानच्या लेकीच्या लग्नात भेटले होते. धर्मेंद्र व आशा यांनी पहिल्यांदा एकत्र ‘आये दिन बहार के’ या चित्रपटात काम केलं होतं.
