Asha Parekh on Rajesh Khanna: राजेश खन्ना यांना बॉलीवूडचे पहिले सुपरस्टार असे म्हटले जाते. त्यांचे अनेक सिनेमे गाजले. त्यांचा मोठा चाहतावर्ग होता. असे म्हटले जाते की त्यांच्याइतके स्टारडम कोणीच पाहिले नाही. आजही राजेश खन्नांबद्दल त्यांचे अनेक सहकलाकार वक्तव्य करतात. त्यांच्या आठवणी सांगतात.

‘इंडियन आयडॉल’च्या पुढील भागात ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख हजेरी लावणार आहेत. त्याचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे. शोचा सूत्रसंचालक हर्ष लिंबाचिया त्यांना विचारतो की, राजेश खन्ना खूप मोठे स्टार होतील, असे कोणत्या क्षणी तुम्हाला वाटले होते?

“आम्ही ‘मेरे सपनों की रानी’चे शूटिंग करत होतो अन्…”

यावर आशा पारेख म्हणाल्या, “त्यांचा चित्रपट मोठ्या प्रमाणात गाजला. मुली त्यांच्यासाठी वेड्या झाल्या होत्या. त्याचवेळी माझ्या लक्षात आले की ते सुपरस्टार झाले आहेत. एखाद्या हिरोसाठी असलेले वेडेपण मी फक्त आणखी एका अभिनेत्यासाठी पाहिले आहे. देव आनंद यांच्यासाठीही मुली वेड्या होत्या. मी असेही ऐकले आहे की राजेश खन्ना त्यांच्या गाडीला मुली किस करायच्या. तर काहींनी त्यांच्या फोटोशीही लग्न केले होते.”

आशा पारेख यांनी एक आठवणही सांगितली. त्या म्हणाल्या, “आम्ही ‘मेरे सपनों की रानी’चे शूटिंग करत होतो आणि डबिंग थिएटरमध्ये गेलो होतो. ते एक छोटे थिएटर होते आणि तिथे २००-३०० मुली आल्या. राजेश खन्ना यांना पाहून सगळेच वेडे झाले होते.”

विशाल दादलानी राजेश खन्ना यांच्या लोकप्रियतेबद्दल म्हणाले, “राजेश खन्ना यांच्या स्टारडमबद्दल अनेकजण बोलतात. जेव्हा मी चित्रपट बघायला सुरुवात केली, तेव्हा जग आधीच अमिताभ बच्चन यांच्याकडे वळले होते . पण मी राजेश खन्ना यांच्याबद्दल अनेक गोष्टी ऐकल्या आहेत. ते एक खूप मोठे स्टार होते. मला त्यांच्या स्टारडमची खरी जाणीव तेव्हा झाली, जेव्हा मी सांताक्रूझमध्ये पाहिले.”

ते पुढे म्हणाले, “आशा पारेखजी जसं म्हणाल्या तसेच मीही ऐकले आहे की त्यांची पांढरी गाडी लिपस्टिकने पूर्णपणे लाल होऊन परत यायची. लोक त्यांच्यासाठी खूप वेडे होते.”

राजेश खन्ना यांनी जवळजवळ सहा दशके बॉलीवूडमध्ये काम केले. त्यांचे ‘आनंद’, ‘आराधना’, ‘कटी पतंग’, ‘अमर प्रेम’, ‘हाथी मेरे साथी’ आणि ‘सफर’ यांसारखे अनेक चित्रपट गाजले. आजही या चित्रपटांबद्दल बोलले जाते.

दरम्यान, राजेश खन्नांनी जितके यश पाहिले, तितकेच त्यांना अपयशही पाहावे लागले. त्यांना उतरता काळ पाहावा लागला. याबरोबरच, त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही अनेकदा चर्चा होते. त्यांचे लग्न डिंपल कपाडिया यांच्याशी झाले होते. मात्र, त्यांचे लग्न फार काळ टिकू शकले नाही. लग्नाच्या काही वर्षांनंतर ते वेगळे झाले. त्यांना दोन मुली आहेत.