Asha Parekh on revealing costumes in Bollywood : बॉलीवूडच्या चित्रपटांमधील अभिनेत्रींच्या कपड्यांवरून नवा वाद सुरू झाला आहे. ‘पेड्डी’ या तेलुगू चित्रपटातील अभिनेत्री जान्हवी कपूरच्या लूकवरून सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी अभिनेत्रींना अशा पद्धतीने पडद्यावर मांडण्याबाबत आक्षेप घेतला आहे. बॉलीवूडचा असाही एक काळ होता, अभिनेत्री साधेपणा, अभिनय आणि व्यक्तिमत्त्वाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत होत्या. पूर्ण कपड्यांमध्येही त्यांचे सौंदर्य खुलून दिसत होते.

चित्रपटांत अभिनेत्रींनी वापरलेल्या कपड्यांवरून सुरू असलेल्या चर्चांवर ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख आणि अभिनेत्री जया बच्चन यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. छोटे कपडे घालण्यास सांगणाऱ्या दिग्दर्शकाला चोख उत्तर दिल्याचा अनुभव त्यांनी शेअर केला आहे.

दिग्दर्शकांना आशा पारेख यांनी दिले चोख उत्तर

‘डेक्कन क्रॉनिकल’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये आशा पारेख यांनी अभिनेत्रींना छोटे कपडे परिधान करण्यास सांगणे हे एक प्रकारे शोषण असल्याचे मत मांडले आहे. त्यांच्या काळातील आठवण सांगताना आशा पारेख म्हणाल्या, “मला आठवते, एकदा एका दिग्दर्शकाने मला डान्ससाठी अंगप्रदर्शन करणारा ड्रेस (revealing costume) घालण्यास सांगितले. मी थेट त्याच्या डोळ्यांत डोळे घालून विचारले, ‘तुमच्या मुलीने असे कपडे घातले, तर तुम्हाला आवडेल का?’ असे विचारताच त्यांनी तो विचार तिथेच सोडून दिला. आजच्या काळातील हिरोईन इतक्या सुंदर आहेत की, त्यांना स्वतःचे ‘वस्तू’सारखे प्रदर्शन करण्याची गरज नाही, असे मत अभिनेत्री आशा पारेख यांनी व्यक्त केले.

आशा पारेख यांनी केले ‘या’ दिग्दर्शकाचे कौतुक

तसेच दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटांचे आशा पारेख यांनी कौतुक केले. त्या म्हणाल्या की, भन्साळी हे किती सुंदर पद्धतीनं चित्रपटातील नायिका सादर करतात. त्यामध्ये इतकी कलात्मकता असते की, त्या अतिशय मनमोहक दिसतात. मात्र, इतर दिग्दर्शक त्याच अभिनेत्रींना अंगप्रदर्शन करणारे कपडे परिधान करायला सांगून, त्यांचे एक प्रकारे शोषण करत असतात, अशी परखड भूमिका ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांनी घेतली आहे.

जया बच्चन यांना काय आला होता अनुभव?

ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांनीही बॉलीवूडमध्ये काम करताना मर्यादा पाळण्याबाबत मत व्यक्त केले. त्या म्हणाल्या, “माझ्या बाबतीत मर्यादा ओलांडण्याची कोणाची हिंमत झाली नाही. मात्र एका दिग्दर्शकाकडून मला विचित्र अनुभव आला होता; पण त्यानंतर मी कधीच त्यांच्यासह पुन्हा काम केलेच नाही,” अशी आठवण जया बच्चन यांनी सांगितली आहे. जया बच्चन यांनी सांगितलेला हा प्रसंग मनोज कुमार दिग्दर्शित ‘शोर’ या चित्रपटासंदर्भात असल्याची माहिती समोर आली आहे.