६० आणि ७० च्या दशकात आशा पारेख यांनी हिंदी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवलं. आशा पारेख यांची त्याकाळातील सर्वात सुंदर आणि गुणी अभिनेत्रींपैकी एक म्हणून त्यांची ओळख होती. त्यामुळे आजही त्यांचा मोठा चाहतावर्ग असून, प्रेक्षकांमध्ये त्यांची लोकप्रियता कायम आहे.

मात्र, चाहत्यांकडून मिळणाऱ्या या प्रेमाबरोबर कधी कधी काही विचित्र अनुभवांनाही कलाकारांना सामोरं जावं लागतं. २०१७ मध्ये फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत आशा पारेख यांनी अशाच एका घटनेचा खुलासा केला होता. या घटनेमुळे त्या प्रचंड घाबरल्या होत्या.

आशा यांनी सांगितला चाहत्याचा धक्कादायक किस्सा

आशा पारेख यांनी सांगितलं होतं की, “एक चिनी व्यक्ती माझ्या घराबाहेर येऊन राहू लागला होता. तो माझ्या येण्या-जाण्यावर आणि दैनंदिन हालचालींवर सतत लक्ष ठेवायचा. त्याच्यापासून वाचण्यासाठी मला अनेकदा कारमध्ये लपून बाहेर जावं लागायचं. शेजाऱ्यांनी त्याला तिथून निघून जाण्यास सांगितलं, तेव्हा त्याने चाकू काढून त्यांना धमकावलं आणि म्हणाला, ‘मी तुम्हाला मारून टाकेन. मला आशाशी लग्न करायचं आहे.”

आशा पारेख त्या चाहत्यामुळे पूर्णपणे हादरल्या होत्या. त्यांना स्वतःच्या घरातही भीती वाटू लागली होती आणि काय करावं, हेच सुचत नव्हतं. अखेर दुसरा कोणताही मार्ग न दिसल्याने त्यांनी त्यावेळच्या मुंबईच्या पोलीस आयुक्तांना फोन करून मदत मागितली. त्यानंतर पोलिसांनी त्या व्यक्तीला अटक करून तुरुंगात पाठवलं.

याबद्दल आशा पारेख म्हणाल्या होत्या, “मी पोलीस आयुक्तांना फोन केला. त्यांनी त्याला तुरुंगात टाकलं. नंतर त्याने मला तुरुंगातून पत्र लिहिलं, तुम्ही मला तुरुंगात टाकलं आहे, आता मला बाहेर काढा. त्यावर मी मनात म्हटलं, अरे, तुला आत टाकलं ते मी नाही, पोलिसांनी टाकलं. आता तुला बाहेर मी कसं काढू?” कपिल शर्माच्या कार्यक्रमातही आशा पारेख यांनी हा संपूर्ण किस्सा सांगितला होता.

आशा पारेख यांचं चित्रपट निर्माते नासिर हुसेन यांच्यावर प्रेम होतं. मात्र, त्यांनी कधीही लग्न केलं नाही आणि आयुष्यभर अविवाहित राहिल्या. २०२० मध्ये भारतीय चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. अनेक दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी ‘फिर वही दिल लाया हूँ’, ‘जब प्यार किसी से होता है’, ‘तीसरी मंजिल’, ‘बहारों के सपने’, ‘प्यार का मौसम’ आणि ‘कारवाँ’ यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये अभिनय केला.