Ashish Vidyarthi felt defeated after divorce at 55: बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेते आशीष विद्यार्थी हे सध्या त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी ५५ व्या वर्षी जेव्हा घटस्फोट झाला, तेव्हा कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागला याबद्दल वक्तव्य केले आहे.
“तुमचं वय कितीही असलं तरी आनंदाने जगण्याचा अधिकार तुम्हाला आहे”
शुभंकर मिश्राला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, “२४ वर्षांच्या संसारानंतर जेव्हा माझे लग्न मोडले तो खूप कठीण काळ होता, त्यावेळी माझे वय ५५ होते. आयुष्यात हरल्यासारखे वाटले. ज्या गोष्टींना सर्व काही दिले, मेहनत घेतली, तेच नातं आता आयुष्यात नाही अशी भावना मनात निर्माण होते.”
ते असेही म्हणाले, “माझे लग्न एका वैयक्तिक गोष्टीमुळे मोडले, त्याबद्दल बोलून कोणाचाही फायदा होणार नाही. असे काहीतरी व्हावे असे कोणालाही वाटत नव्हते, पण ते घडले.”
लोकांच्या सल्ल्यामुळे आणि त्यांनी केलेल्या टीकेमुळे हा काळ अधिक कठीण झाला असेही ते म्हणाले. ते म्हणाले, “मी मोटिव्हेशनल स्पीकर आणि अभिनेता आहे. पण, लोक माझ्याबद्दल काय बोलत होते आणि मी त्या सगळ्याचा सामना कसा केला हे मला माहीत आहे. लोक कोणत्याही परिस्थितीची पूर्ण माहिती नसताना, प्रचंड आत्मविश्वासाने निर्णय देतात. अशा घटना घडतात तेव्हा केवळ एक व्यक्ती बोलत नाही, तर अनेक जण एकत्र येऊन त्यावर चर्चा करू लागतात.”
दुसऱ्या लग्नाचा निर्णय घेताना इतर लोक त्यांना काय म्हणायचे किंवा सल्ले द्यायचे याबद्दल आशीष विद्यार्थी म्हणाले, “लोक मला विचारायचे की आता या वयात तुला लग्न करण्याची काय गरज आहे? त्यापेक्षा लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये का राहत नाहीस? काही जण तर मला म्हणायचे की, आता शांत बस आणि मुलाला मोठं होताना पाहत राहा. मी कदाचित खचलेलो असेन, पण स्वतःला पुन्हा सावरण्याचा आणि नव्याने आयुष्य जगण्याचा मला पूर्ण अधिकार आहे. आयुष्यात प्रत्येकजण कधी ना कधी तुटतो, पडतो; मात्र दुसऱ्याच्या दुःखाची कधीच थट्टा करू नये. तुमचं वय कितीही असलं तरी आनंदाने जगण्याचा अधिकार तुम्हाला आहे, त्यासाठी कोणाच्याही परवानगीची गरज नाही.”
आशीष विद्यार्थी यांचं पहिलं लग्न अभिनेत्री आणि गायिका राजोशी बरुआ यांच्याशी झालं होतं. राजोशी यांना ‘पिलू’ या नावानेही ओळखलं जातं. दोघांचं लग्न २२ वर्ष टिकलं. त्यांना अर्थ नावाचा मुलगादेखील आहे. दोघांनीही विभक्त होण्याचा निर्णय खासगी ठेवला होता. मात्र, मे २०२३ मध्ये आशीष यांनी दुसरं लग्न केल्यानंतर त्यांच्या घटस्फोटाची बातमी समोर आली. ऑक्टोबर २०२२ मध्ये दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता.
दरम्यान, आशीष विद्यार्थी यांनी २५ मे २०२३ रोजी कोलकाता येथे उद्योजिका रुपाली बरुआ यांच्याशी विवाह केला. मोजक्या कुटुंबीयांच्या आणि जवळच्या मित्रमंडळींच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला. रुपाली या आसाममधील असून कोलकाता येथे फॅशन व्यवसायात त्या काम करतात.
