बॉलीवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी भावंडं आहेत ज्यांनी त्यांच्या कामामुळे प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे. अशीच एक भाऊ-बहिणीची जोडी म्हणजे लोकप्रिय अभिनेत्री अमीषा पटेल आणि तिचा भाऊ अभिनेता अश्मित पटेल. अशातच आता त्याने त्याच्या ‘मर्डर’ या लोकप्रिय चित्रपटानंतरचा त्याचा प्रवास, चित्रपटांच्या ऑफर, बहिणीबरोबरचं नातं, वाद आणि कुटुंब याबद्दल भाष्य केलं आहे.
२००४ साली प्रदर्शित झालेला अनुराग बासू दिग्दर्शित ‘मर्डर’ हा चित्रपट मोठा चर्चेचा विषय ठरला होता. चित्रपटातील गाजलेल्या गाण्यांबरोबरच इमरान हाश्मी, मल्लिका शेरावत आणि अश्मित पटेल यांच्यातील केमिस्ट्रीमुळेही या चित्रपटाला विशेष लोकप्रियता मिळाली. ‘मर्डर’’ त्या काळातील एक यशस्वी आणि लक्षवेधी चित्रपट ठरला, विशेषतः मल्लिका शेरावत आणि इमरान हाश्मी यांच्या कारकिर्दीसाठी हा चित्रपट महत्त्वाचा ठरला. मात्र, अश्मित पटेलने नुकतंच सांगितलं की, ‘मर्डर’’च्या यशाचा त्याच्या करिअरला तितका फायदा झाला नाही. चित्रपटाच्या यशानंतरही त्याला तितकी लोकप्रियता किंवा कामाच्या संधी मिळाल्या नाहीत. यासह त्याने त्या काळातील आपल्या वैयक्तिक आयुष्यातील परिस्थिती आणि ‘मर्डर’मधील त्याच्या व्यक्तिरेखेचा भावनिक प्रवास यांच्यातील साम्याचाही खुलासा केला.
प्रेयसीने केलेली फसवणूक
‘हिंदी रश’ला दिलेल्या मुलाखतीत अश्मित पटेलने सांगितलं की ‘मर्डर’च्या शूटिंगदरम्यान तो त्याच्या प्रेयसीने केलेल्या फसवणुकीतून सावरत होता. याबद्दल बोलताना तो म्हणाला, “माझ्या वैयक्तिक आयुष्यातही अशीच परिस्थिती होती. माझ्या एक्सने माझी फसवणूक केली होती. मला याबद्दल नंतर समजलं आणि त्यामुळे मी खूप अस्वस्थ झालो होतो. या चित्रपटाच्या माध्यमातून मला त्या परिस्थितीचा एका अर्थाने स्वीकार करता आला. माझ्यासाठी हा अनुभव भावनिकदृष्ट्या खूप वेगळा होता. त्यामुळे पडद्यावर दिसणाऱ्या माझ्या व्यक्तिरेखेच्या भावना खऱ्या होत्या.”
मल्लिका शेरावतने सगळी लोकप्रियता मिळवली – अश्मित पटेल
अश्मित पटेलने ‘मर्डर’च्या यशाचा चित्रपटातील कलाकारांच्या करिअरवर झालेल्या परिणामाबद्दलही भाष्य केलं. त्याच्या मते, ‘मर्डर’च्या लोकप्रियतेचा सर्वाधिक फायदा मल्लिका शेरावतला झाला, तर चित्रपट यशस्वी होऊनही त्याला तुलनेने कमी लोकप्रियता मिळाली. याबद्दल बोलताना तो म्हणाला, “हे खूपच रंजक होतं. मर्डर प्रदर्शित झाल्यानंतर मल्लिका शेरावत तिच्या कारकिर्दीत यशाच्या शिखरावर होती. तिचा पीआर खूप चांगला होता. ती अर्थातच सुंदर मुलगी होती आणि आधीपासूनच चर्चेत होती, त्यामुळे तिने बरीच लोकप्रियता मिळवली आणि खरं सांगायचं तर, तिने त्यासाठी मेहनतही घेतली होती.”
तो पुढे म्हणाला, “या चित्रपटातून इमरानलाही फारशी लोकप्रियता मिळाली नाही, अगदी अनुराग बासूंनाही नाही आणि मला तर सर्वात कमी ओळख व लोकप्रियता मिळाली. माझी भूमिका अशी होती की माझ्यासाठी गाणीही नव्हती. दोन्ही हिट गाणी इमरानवर चित्रित करण्यात आली होती. त्यात माझे फक्त एक-दोन शॉट्स होते. त्यामुळे चित्रपटानंतर मला फारशी लोकप्रियता मिळाली नाही.”
मोठ्या चित्रपटांतून काढून टाकलं
‘मर्डर’मुळे अश्मित पटेलला त्याच्या काही सहकलाकारांप्रमाणे अपेक्षित लोकप्रियता मिळाली नाही. मात्र,त्याच्या अभिनयाचं समीक्षकांनी कौतुक केलं, असं त्याने सांगितलं. तो म्हणाला, “समीक्षकांच्या दृष्टीने माझ्या अभिनयाचं खूप कौतुक झालं आणि मला काही चांगल्या ऑफर्सही मिळाल्या. पण त्याच काळात माझ्या वैयक्तिक आयुष्यात, विशेषतः माझ्या कुटुंबाशी संबंधित काही गोष्टी घडत होत्या. त्याचा इंडस्ट्रीमध्ये माझ्याबद्दल असलेल्या मतावर परिणाम झाला असावा, असं मला वाटतं. काही मोठ्या निर्मात्यांबरोबर एक-दोन मोठे चित्रपट साइन केले होते. मात्र, कोणतीही पूर्वसूचना न देता मला त्या चित्रपटांतून काढून टाकण्यात आलं. ते खूप निराशजनक होतं.”
त्या काळाकडे मागे वळून पाहताना अश्मित पटेलने हा काळ संमिश्र अनुभवांचा असल्याचं म्हटलं. तो म्हणाला, “म्हणून हा माझ्यासाठी संमिश्र अनुभवांचा काळ होता. ज्यांना अभिनयाची खरी जाण आहे, जे एखाद्या व्यक्तीला समजून घेतात आणि त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या प्रत्येक पैलूकडे पाहतात, अशा योग्य लोकांकडून मला खूप प्रेम मिळालं. पण व्यावसायिकदृष्ट्या मला जेवढं काम मिळायला हवं होतं, तेवढं मिळालं नाही. हा खूप संघर्षाचा काळ होता.” अश्मित पटेल शेवटचा २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘निर्दोष’ या चित्रपटात दिसला होता.
याच मुलाखतीत अश्मितने त्याची बहीण अमीषा पटेलबरोबरच्या वादाच्या चर्चांवरही भाष्य केलं आणि तिची शेवटपर्यंत रक्षा करणार असं म्हटलं आहे. अश्मित आणि अमीषा पटेल यांच्या नात्याबद्दल गेल्या काही वर्षांपासून चर्चा होत आहे. एबीपीच्या वृत्तानुसार २००० मध्ये कुटुंबात सुरू असलेल्या वादादरम्यान दोन्ही भावंडांमधील मतभेदही सार्वजनिकपणे समोर आले होते. अमीषा पटेलने २००४ मध्ये तिचे वडील अमित पटेल यांच्यावर आर्थिक व्यवहार योग्य पद्धतीने न हाताळल्याचा आरोप करत त्यांना कायदेशीर नोटीसही पाठवली होती.असंही म्हटलं जातं.
जग काय म्हणतं याने मला फरक पडत नाही – अश्मित पटेल
अमीषा पटेलबद्दल प्रश्न विचारण्यात आल्यानंतर अश्मितने त्यांच्या नात्याबद्दल भाष्य केलं. तो म्हणाला की, प्रत्येक नात्यात चढ-उतार येत असतात. “आता आमच्यात सगळं ठीक आहे. म्हणतात ना, रक्ताची नाती अधिक घट्ट असतात. याबाबत तुम्ही काहीच करू शकत नाही, कारण आमचं रक्त एकच आहे. मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तिचं रक्षण करेन. हे अमीषालाही माहीत आहे, हे महत्त्वाचं आहे. जग काय म्हणतं, याने मला काहीही फरक पडत नाही.”
या विषयावर अधिक बोलणं टाळत अश्मित म्हणाला, “माझ्या कुटुंबाला किंवा माझ्या माणसांना विनाकारण चर्चेत आणावं, असं मला वाटत नाही. कारण त्याची काहीच गरज नाही, असं मला वाटतं. माझ्या जवळच्या व्यक्तींबरोबरची नाती माझ्यासाठी खूप खासगी आहेत आणि त्याबद्दल सार्वजनिकपणे बोलायला मला आवडत नाही”.
