Ashutosh Rana & Renuka Shahane : मराठीसह बॉलीवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी २५ मे २००१ मध्ये अभिनेते आशुतोष राणा यांच्याबरोबर लग्न केलं. या दोघांचा विवाहसोहळा मध्यप्रदेशमध्ये आशुतोष राणा यांच्या गावी पार पडला होता. या दोघांनीही त्यांच्या विविध सिनेमांद्वारे गेली अनेक दशकं प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलेलं आहे. नुकताच आशुतोष राणा यांनी त्यांचा ५८ वा वाढदिवस साजरा केला. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि चाहते या आदर्श जोडीचं भरभरून कौतुक करत आहेत.
आशुतोष राणा यांनी आजवर हिंदीसह मराठी, कन्नड, तेलुगू, तामिळ अशा सगळ्या इंडस्ट्रीमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. नुकताच ( १० नोव्हेंबर ) त्यांचा ५८ वा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यांच्या बर्थडे पार्टीला जवळचे कुटुंबीय व मित्रमंडळी उपस्थित होते. यावेळी वाढदिवसाचा केक कापण्यापूर्वी आशुतोष राणा व रेणुका शहाणे यांनी एकमेकांच्या गळ्यात पुन्हा एकदा वरमाळा घालून हा खास दिवस साजरा केल्याचं पाहायला मिळालं.
आशुतोष राणांनी गळ्यात वरमाळा घातल्यावर रेणुका यांनी हात जोडून त्यांना नमस्कार केला. त्यांच्या या कृतीने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आशुतोष व रेणुका यांनी एकमेकांना वरमाळा घातल्यावर उपस्थितांनी एकच जल्लोष केला. यावेळी त्यांची दोन्ही मुलं सुद्धा उपस्थित होती. हा गोड व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
गेली २३ वर्षे रेणुका शहाणे आणि आशुतोष राणा सुखी वैवाहिक आयुष्य जगत आहेत. दोघांना शौर्यमन आणि सत्येंद्र अशी दोन मुलं आहेत. रेणुका-आशुतोष यांची जोडी प्रेक्षकांमध्ये आजही तेवढीच लोकप्रिय असून दोघांनी अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
दरम्यान, रेणुका शहाणेंच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर लवकरच त्या ‘उत्तर’ सिनेमात झळकणार आहेत. ‘उत्तर’ या अत्यंत संवेदनशील विषयावरील चित्रपटात अभिनेत्री रेणुका शहाणे आईच्या भूमिकेत आहेत. तर अभिनय बेर्डे मुलाच्या भूमिकेत आहे.
