Ashutosh Rana gives Marriage Advice: अलीकडच्या काळात घटस्फोट, ब्रेकअप यांचे प्रमाण खूपच वाढले आहे. अगदी लोकप्रिय कलाकारांचेदेखील घटस्फोट होताना दिसतात. आपल्या आवडत्या जोड्यांना वेगळे होताना पाहून अनेक चाहत्यांना दु:खही होते. नुकतीच, आकांक्षा चमोलाने ‘लॉकअप’च्या दुसऱ्या सीझनमध्ये सहभागी झाल्यानंतर ती व गौरव वेगळे होत असल्याचा खुलासा केला. आता या सगळ्यात अभिनेते आशुतोष राणा यांनी लग्न टिकवण्यासाठी, खरी नाती टिकवण्यासाठी काय केलं पाहिजे याबद्दलही सांगितले.
“त्यामुळे एकमेकांचे…”
आशुतोष राणा यांनी नुकताच ‘एबीपी लाइव्ह’शी संवाद साधला. यावेळी त्यांनी वैवाहिक आयुष्य तसेच रिलेशनशिप यांबद्दल वक्तव्य केले. या मुलाखतीत त्यांना विचारले गेले की, नुकताच तुम्ही तुमचा लग्नाचा २५ वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. तुमच्या फोटो व व्हिडीओंवर चाहत्यांनी प्रेम व्यक्त केले होते. आताच्या काळात नाती निभावणे कठीण होत चालले आहे. जर आताच्या पिढीला रिलेशनशिप किंवा लग्नाबद्दल तुम्हाला सल्ला द्यायचा असेल, तर तो सल्ला काय असेल? त्यावर आशुतोष राणा म्हणाले, “मी फक्त इतकंच सांगेन की, कोणतंही नातं सुरू करण्यापूर्वी आपण समोरच्या व्यक्तीला पूर्णपणे समजून घेतलं पाहिजे. डोळे उघडे ठेवून गोष्टींचं निरीक्षण केलं पाहिजे. पण, एकदा तुम्ही कोणाबरोबर नात्यात आलात की, त्यानंतर तुम्ही तुमचे डोळे अर्धे मिटून घ्यावेत. अनेक गोष्टी दुर्लक्ष करण्यासारख्या असतात. एकदा का नातं निर्माण झालं की, प्रत्येक लहान लहान उणिवेवर टीका करत बसण्याऐवजी किंवा तक्रार करण्याऐवजी काही गोष्टींकडे दुर्लक्ष करणं महत्त्वाचं आहे.”
पुढे ते म्हणाले, “दुसरी गोष्ट अशी की, एका व्यक्तीनं समोरच्याला जर समस्या सांगितली, तर लगेच त्यावर उपाय सांगू नका. त्या व्यक्तीकडे त्या समस्येचं उत्तर आहे. त्याला फक्त संवेदनशीलपणे ऐकून घेणारं कोणीतरी हवं असतं. ऐकणंसुद्धा त्या समस्येवर उपाय देण्यासारखंच असते. त्यामुळे एकमेकांचं ऐकलं पाहिजे.”
तसेच, याच मुलाखतीत आशुतोष राणा यांनी बदलते तंत्रज्ञान, जीवनशैली, अधात्म, आजची पिढी यांबद्दलही वक्तव्य केले.
आशुतोष राणा हे दुश्मन, छावा, संघर्ष, फायटर, टायगर ३, सिम्बा, राज अशा अनेक सिनेमांतील त्यांच्या दमदार भूमिकांसाठी ओळखले जातात. त्यांच्या कवितांचाही मोठा चाहतावर्ग आहे. कविता म्हणण्याची त्यांची शैली लोकप्रिय आहे.
आशुतोष राणा व रेणुका शहाणे यांनी २००१ मध्ये लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाला नुकतीच २५ वर्षे पूर्ण झाली आहेत.
