दीपिका पादुकोण मागील २ दशकांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. खेळ, मॉडेलिंग व नंतर अभिनय क्षेत्रात दीपिकाने पाऊल ठेवलं. दीपिकाने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. दीपिका पादुकोण उत्तम अभिनेत्री असण्याबरोबरच स्पष्टवक्ती आहे. ती मानसिक आरोग्याबद्दलही जाहिरपणे बोलत असते.
दीपिका पादुकोण ५ जानेवारी रोजी ४० वर्षांची झाली. २०२५ मध्ये मुलीचा जन्म झाल्यावर दीपिका मोठ्या पडद्यापासून दूर आहे. लवकरच ती ‘किंग’मध्ये झळकणार आहे. २०२५ मध्ये ८ तास काम या मागणीमुळे दीपिका चर्चेत राहिली. तिच्या या मागणीमुळे तिच्यावर टीकाही झाली. तर संदीप रेड्डी वांगाचा चित्रपटही हातातून गेला. आता २०२६ हे वर्ष दीपिका पादुकोणसाठी कसं असेल, त्याबद्दल जाणून घेऊयात.
प्रसिद्ध लाइफ कोच आणि अॅस्ट्रो-वास्तु तज्ज्ञ श्रद्धा सल्ला यांनी फिल्मीबीटशी बोलताना दीपिका पादुकोणसाठी २०२६ हे वर्ष कसे असेल, त्याबद्दल अंदाज व्यक्त केले. त्यांनी काय म्हटलंय, ते जाणून घेऊयात.
५ जानेवारी रोजी जन्मलेल्या दीपिका पादुकोणमध्ये अंकशास्त्रानुसार अंक ५ आणि मकर राशीच्या ज्योतिषीय ऊर्जेचं एक शक्तिशाली मिश्रण आहे. यावरून तिच्यातील जुळवून घेण्याची क्षमता, तिचं जागतिक स्तरावरील महत्त्व आणि भावनिकता दिसून येते.
अंकशास्त्रानुसार, बुध ग्रहाचं राज्य असलेला ५ हा अंक गती, संवाद आणि उत्क्रांतीचे प्रतिनिधित्व करतो. या अंकात जन्मलेल्या व्यक्ती स्थिर नसतात. स्वतःमध्ये बदल घडवून आणणे, स्वतःला व्यक्त करणे आणि जीवनाच्या बदलत्या टप्प्यांमध्ये प्रासंगिक राहण्याची क्षमता हीच ५ तारखेला जन्मलेल्या लोकांची ताकद असते.
२०२६ हे वर्ष दीपिका पादुकोणसाठी कसं असेल?
- भावनिक किंवा जागतिक महत्त्व असलेले प्रोजेक्ट मिळतील.
- अर्थपूर्ण कथा असलेले चित्रपट मिळतील.
- एक उत्तम पब्लिक प्रेझेन्स, नकारात्मक चर्चा व गोंधळ कमी कमी असेल.
- दीपिका पादुकोणसाठी हे वर्ष जास्त काम करण्याचं नाही. या वर्षी ती जे काम करेल, त्यात एक उद्देश असणं आवश्यक आहे.
दीपिकाची शक्ती, संवाद कौशल्य, बुद्धिमत्ता आणि जुळवून घेण्याची क्षमता हे गुण अधिक प्रभावी ठरतील. दीपिका पादुकोणची खरी ताकद तिच्या मूळ स्वभावाला न सोडता स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याच्या क्षमतेत आहे. २०२६ मध्ये दीपिका स्पष्टता, विवेकबुद्धी आणि अर्थपूर्ण कथानक असलेल्या चित्रपटांमुळे करिअरमध्ये पुढे जाईल, असंही ज्योतिषांनी नमूद केलं.
