Atif Aslam India ban interview : आपल्या जादुई आवाजाने भारतीय प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा पाकिस्तानी गायक आतिफ अस्लम हा चर्चेत आला आहे. अनेक वर्षांपासून आतिफवर भारतामध्ये बंदी आहे. उरी दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांना बॉलीवूडमध्ये काम करण्यावरून वाद निर्माण झाला होता. त्यामुळे पाकिस्तावनी कलाकारांवर बंदी घालण्यात आली. १० वर्षांपासून ही बंदी असून, आता आतिफ अस्लमने बॉलीवूडवरील बंदीवर प्रतिक्रिया दिली आहे. बंदी असून वेगवेगळ्या पद्धतींनी भारतीय चाहते त्याचं गाणं ऐकत असल्याचे आतिफ अस्लम म्हणाला आहे.

‘क्रिस फेड’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये आतिफ अस्लमने भारतावरील बंदीवर प्रतिक्रिया दिली. भारतामध्ये बंदी घातल्यामुळे करिअरमध्ये बदल झाला असला तरी त्यामुळे एक स्वतंत्र गायक म्हणून वेगळी ओळख निर्माण करता आल्याचे मत त्याने व्यक्त केले. आतिफ म्हणाला, “माझ्यावर भारतात बंदी घालण्यात आल्यानंतर जवळपास १० वर्षे झाली आहेत. हा भारत सरकारचा निर्णय होता. त्यांनी पाकिस्तानमधील कलाकारांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. आता पाकिस्तानमध्येही भारतीय कलाकारांवर बंदी आहे. भारतात काम करण्यावर बंदी घालण्यात आल्यामुळे करिअरमध्ये नक्कीच बदल झाला; पण याच वेळेमध्ये मला एक स्वतंत्र संगीतकार म्हणून ओळख निर्माण करण्याची संधी मिळाली.”

चाहते VPN वापरून गाणी ऐकतात – आतिफ अस्लम

पुढे तो म्हणाला, “मागच्या १० वर्षांपासून मी भारतात एकही गाणं गायलेलं नाही. तरीही भारतातील माझ्या चाहत्यांपर्यंत माझं गाणं पोहोचतं. माझे चाहते व्हीपीएन (VPN) वापरून गाणी ऐकतात, सीडीज (CDs) तयार करतात आणि माझ्या चाहत्यांना देतात. असं नाहीये की, मी पायरसी करण्याचं समर्थन करतोय; पण जिथं गाणं पोहोचायला हवं, तिथं ते पोहोचणारच. माझं पहिलं गाणंही अशाच प्रकारे लोकप्रिय झालं होतं. चाहत्यांनी एकमेकांना सांगितल्यामुळे माझं गाणं लोकप्रिय झालं. त्यावेळी हा मुलगा कोण आहे हे कोणालाच माहीत नव्हतं. रेडिओ, सीडी व कॅसेटच्या माध्यमातून मला यश मिळालं आहे.”

बरं झालं भारतात बंदी घातली – आतिफ अस्लम

पुढे तो म्हणाला, “माझे चाहते माझं गाणं बरोबर शोधून काढतात. माझं गाणं जर आवडत असेल, तर ते नक्कीच प्रेक्षकांपर्यंत पोहोचतं. चाहत्यांना मला हे सांगायचं आहे की, मला भारतामध्ये गाता येत नसल्यामुळे तुम्ही नाराज होऊ नका. उलट ज्यांनी माझ्यावर भारतामध्ये बंदी घातली, त्यांचा मी आभारी आहे. बरं झालं त्यांनी बंदी घातली. कारण- त्यामुळे मला स्वतःला चांगल्या प्रकारे ओळखण्याची संधी मिळाली. पण, बंदी घातल्यानंतरही माझ्यावर प्रेम करणाऱ्या भारतीय प्रेक्षकांचे मी मनापासून आभार मानतो. मला माझ्या भारतीय चाहत्यांची आठवण येते; पण मला तिथे काम करण्याची आठवण येत नाही.”

पाकिस्तानी कलाकारांना भारतामध्ये का आहे बंदी?

दरम्यान, २०१६ मध्ये उरी दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर भारतात काम करण्यावर निर्बंध घातले गेले. सप्टेंबर २०१६ मध्ये इंडियन मोशन पिक्चर प्रोड्युसर्स असोसिएशनने (IMPPA) संबंध सुधारत नाहीत तोपर्यंत पाकिस्तानी कलाकारांना भारतामध्ये काम न देण्याचा ठराव केला होता. २०१९ मधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर हे निर्बंध आणखी कडक करण्यात आले.