Atif Aslam Coke Studio Pakistan Vs India Comparison: पाकिस्तानी गायक आतिफ अस्लमने आपल्या जादुई आवाजाने बॉलीवूडमध्ये वेगळी ओळख निर्माण केली. पण भारतामध्ये पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यानंतर त्याचे बॉलीवूडमध्ये काम करणे बंद झाले. आता आतिफ अस्लमने भारतातील कोक-स्टुडिओ आणि पाकिस्तानातील ‘कोक-स्टुडिओ’ यांच्यातील फरक सांगितला आहे. दोन्हींमधील असणाऱ्या कलात्मक फरक आतिफने स्पष्ट केला आहे.

दोन्ही देशांतील ‘कोक स्टुडिओ’च्या व्हर्जनमधील फरक सांगताना आतिफ अस्लम म्हणाला, “एक वेगळीच जादू आहे. दोन्हीकडे खूप काही चांगल्या गोष्टी आहेत. पण आपल्याकडे (पाकिस्तानमध्ये) जी संगीताची मुळे आहेत, ती अजूनही जोडलेली आहेत. पण मला वाटते की, भारताच्या ‘कोक-स्टुडिओ’मध्ये या गोष्टीची कमतरता आहे.”

पाकिस्तानमध्ये गायकांना स्वातंत्र्य

    आतिफ म्हणाला, “‘कोक स्टुडिओ इंडिया’मध्ये संगीताच्या व्यावसायिक बाजूला जास्त महत्त्व दिले जाते. तर ‘कोक स्टुडिओ पाकिस्तान’मध्ये मूळ संगीत आणि प्रत्येक कलाकाराच्या वेगळ्या शैलीला महत्त्व दिले जाते. पाकिस्तानी कोक स्टुडिओमध्ये एका गाण्याच्या कॉम्पोजिशनवर अनेक कलाकार एकत्र काम करू शकतात आणि गायकांना त्यांच्या शैलीत ते गाणे सादर करण्याचे स्वातंत्र्यही दिले जाते.”

    याच मुलाखतीत आतिफला ‘त्याचे असे कोणते गाणे आहे, जे दुसऱ्या कोणत्यातरी गायकाने गायले असले तर जास्त चांगले झाले असते,’ असे वाटते, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर त्याने ‘तेरे लिए’ गाण्याचा उल्लेख केला. हे गाणे २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘प्रिन्स’ सिनेमामध्ये होते.आतिफ अस्लम आणि श्रेया घोषाल यांनी गायलेल्या या गाण्यात विवेक ओबेरॉय झळकला होता. विशेष म्हणजे, हे गाणे स्वतः गायले असल्याबद्दल आतिफने सांगितले, “माझ्या मनात कधी कधी हा विचार येतो की, हे गाणे दुसऱ्या गायकाने गायले असते तर बरे झाले असते.”

    दरम्यान, आतिफ अस्लमने संगीत विश्वातील ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ अर्थात एआयच्या वापराबद्दलही मत व्यक्त केले. एआय भविष्यात गायकांची जागा घेऊ शकतो का, असा प्रश्न त्याला विचारण्यात आला, यावर आतिफ होकार देत “अर्थातच, हे आता शक्य आहे, सहज बदल करता येण्यासारखे आहे. तसेच गाणे लिहिण्यासाठीसुद्धा चॅटजीपीटीसारख्या एआय टूल्सचा वापर केला जाऊ शकतो.”