Where is Bollywood Actress Mayuri Kango: ‘घर से निकलते ही…कुछ दूर चलते ही…’ हे लोकप्रिय गाणं तुम्ही कधी ना कधी नक्कीच ऐकलं असेल. या गाण्यात दिसणारी अभिनेत्री म्हणजे मयुरी कांगो होय. अनेक चित्रपट व टीव्ही मालिका करणाऱ्या मयुरीने सिनेइंडस्ट्री सोडली आणि विदेशात स्थायिक झाली. ४२ वर्षांची मयुरी ग्लॅमर इंडटस्ट्रीपासून दूर आहे, पण ती काय करते ते जाणून घेऊयात.
मयुरीचा जन्म १५ ऑगस्ट १९८२ रोजी महाराष्ट्रातील औरंगाबाद इथे झाला. तिचे वडील भालचंद्र कांगो हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते आहे. तिची आई सुजाता कांगो अभिनेत्री होत्या, आईमुळेच मयुरी सिनेक्षेत्रात आली. मयुरी ही तिच्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी आहे. मयुरीने तिचे शालेय शिक्षण (Mayoori Kango Education) सेंट फ्रान्सिस स्कूल, औरंगाबाद इथून घेतले. तिने पुढील शिक्षण औरंगाबादच्या देवगिरी कॉलेजमधून पूर्ण केले. मयुरी अभ्यासात हुशार होती आणि लहानपणापासूनच तिने मोठ्या कंपनीची सीईओ व्हायचं स्वप्न पाहिलं होतं, पण ती अभिनेत्री झाली.
अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी केलं होतं अरेंज मॅरेज, कोण आहेत त्यांचे पती? जाणून घ्या
मयुरीला कसा मिळाला पहिला चित्रपट?
१२वीत असताना मयुरी आई सुजाताबरोबर मुंबईत आली होती. त्यावेळी दिग्दर्शक सईद अख्तर मिर्झा यांनी मयुरीला पाहिलं आणि तिला चित्रपट ऑफर केला. ही ऑफर मिळाली तेव्हा ती खूप लहान होती, पण तरीही तिने सिनेमाला होकार दिला. तिच्या ‘नसीम’ नावाच्या या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. मयुरी कांगो आयआयटी कानपूरमध्ये शिकत होती, नंतर तिने चित्रपटासाठी शिक्षण सोडलं. तिने अजय देवगण, महेश बाबू आणि संजय दत्त यांसारख्या बड्या कलाकारांसह काम केलं. ‘नसीम’ चित्रपटात मयुरीने मुख्य भूमिका साकारली होती, ज्यामध्ये तिची आई सुजाता यांनीही काम केले होते. ज्येष्ठ गीतकार आणि शबाना आझमी यांचे वडील कैफी आझमी यांनीही या चित्रपटात काम केलं होतं, त्यांनी चित्रपटात मयुरीच्या आजोबांची भूमिका साकारली होती.
महेश भट्ट यांची हिरोइन झाली मयुरी कांगो
चित्रपट निर्माते महेश भट्ट यांनी मयुरीला ‘नसीम’मध्ये पाहिलं आणि तिला ‘पापा कहते हैं’ या चित्रपटात जुगल हंसराजबरोबर साईन केलं. या चित्रपटातील ‘घर से निकलते ही’ हे गाणं खूप गाजलं. हा चित्रपट १९९६ मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट हिट झाला आणि मयुरीने यातच करिअर करायचं ठरवलं. तिने ‘बेताबी’, ‘होगी प्यार की जीत’ आणि ‘मेरे अपने’मध्ये काम केले. २००० मध्ये मयुरी राणी मुखर्जीच्या ‘बादल’ या चित्रपटात सहाय्यक भूमिकेत दिसली.
बॉलीवूडच्या ऑफर कमी झाल्या, अन् मयुरीने टीव्ही मालिका केल्या
मयुरीने फिल्म इंडस्ट्रीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला व तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या, तिने अनेक चित्रपट साइन केले. पण मयुरीने जे चित्रपट साइन केले ते कोणत्या ना कोणत्या कारणाने बनले नाहीत. लोक मयुरीचा पायगुण वाईट असल्याचं म्हणू लागले व हळूहळू तिला ऑफर मिळणं कमी झालं. मग तिने एक-दोन चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका केल्या, पण तिला मुख्य भूमिका मिळाली नाही. यानंतर मयुरी दाक्षिणात्य इंडस्ट्रीकडे वळली, पण तिथेही यश मिळालं नाही. यानंतर मयुरीने टीव्ही मालिकांमध्ये काम केलं. ‘नर्गिस’, ‘कहीं किसी रोज’, ‘डॉलर बहू’, ‘किट्टी पार्टी’, ‘कुसुम’, ‘करिश्मा’ आणि ‘क्या हादसा क्या हकीकत’ या मालिका तिने केल्या, पण नंतर मात्र तिचं मन अभिनयात रमलं नाही.
मयुरीने सिनेइंडस्ट्री सोडली अन् बालपणीच्या स्वप्नासाठी घेतली मेहनत
मयुरीने २००३ मध्ये एनआरआय उद्योगपती आदित्य ढिल्लनशी लग्न केलं आणि सिनेइंडस्ट्रीला रामराम ठोकला. ती पतीबरोबर अमेरिकेला स्थायिक झाली. इथे तिचं जुनं स्वप्न तिला पुन्हा खुणावू लागलं. मग मयुरीने अभ्यास करून एमबीए शिकण्यासाठी शिष्यवृत्ती मिळवली. त्यानंतर तिथे अनेक वर्षे नावाजलेल्या कंपन्यांमध्ये काम केलं. त्याच काळात तिच्या मुलाचा जन्म झाला. मुलाचा सांभाळ व नोकरी करणं कठीण होतं, पण तिला नोकरी सोडायची नव्हती. नंतर मयुरीला भारतातील एका मोठ्या कंपनीत चांगल्या पदाच्या नोकरीची ऑफर आली. ती तिच्या मुलासह २०११ मध्ये भारतात परतली.
Mayoori Kango is Google India industry head: भारतात अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मयुरीने स्वतःला या इंडस्ट्रीत सिद्ध करण्यासाठी खूप मेहनत केली. मयुरीच्या इतक्या वर्षांच्या मेहनतीला यश आलं. तिला २०१९ मध्ये गुगलने भारताची हेड ऑफ इंडस्ट्री म्हणून ऑफर दिली. तेव्हापासून ती गुगलमध्ये काम करतेय.