फराह खान तिच्या व्लॉगमध्ये सेलिब्रिटींची घरं व फार्महाऊसची झलक दाखवत असते. ताज्या एपिसोडमध्ये ती तिचा मित्र आणि सेलिब्रिटी फोटोग्राफर अविनाश गोवारीकरच्या फार्महाऊसवर पोहोचली. फरहाने अविनाशच्या भव्य फार्महाऊसची झलक दाखवली, तसेच त्याच्या चित्रपटसृष्टीतील प्रवासाबद्दलच्या काही रंजक गोष्टीही सांगितल्या. एकेकाळी अविनाशला खूप संघर्ष करावा लागला होता, स्वतःचे घर नसल्यामुळे तो सलमान खानच्या घरी राहायचा आणि आज तो बॉलीवूडमधील अनेक मोठ्या स्टार्सचा आवडता फोटोग्राफर आहे.

“एक वेळ अशी होती जेव्हा अविनाशकडे राहण्यासाठी स्वतःचं घर नव्हतं. मला त्याच्या प्रवासाचा खूप अभिमान वाटतो. घर नसताना तो तीन वर्षे सलमान खानच्या घरी, सोहेल खानच्या खोलीत राहिला,” असं फराह खान म्हणाली. पण ३ वर्षे राहण्याचा दावा अविनाशने मान्य केला नाही. “मी किती काळ राहिलो, याबद्दल वाद आहे. पण हो मी सलमानच्या घरी नक्कीच राहिलो होतो. मी तीन महिने राहिलो की तीन वर्षे, हे नक्की सांगता येणार नाही,” असं अविनाश गोवारीकर म्हणाला. फराह पुढे गमतीत म्हणाली, “सोहेलचं लग्न झाले, तेव्हा अविनाशला त्याच्या खोलीतून बाहेर काढलं होतं आणि याबद्दल त्याला खूप वाईट वाटलं होतं.”

कोणामुळे इंडस्ट्रीत आला अविनाश गोवारीकर?

व्लॉगमध्ये अविनाश गोवारीकरने हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा फोटोग्राफर बनण्याचा प्रवास सांगितला. त्याला ‘बाजी’ चित्रपटाचे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी सिनेसृष्टीत आणल्याचं तो सांगतो. आशुतोष यांनीच त्याची आमिर खानशी करून दिली. आमिर खानचे फोटोशूट केल्यानंतर अविनाशने बॉलीवूडमध्ये दमदार एन्ट्री केली आणि त्यानंतर सलमान खानबरोबर काम करायला सुरुवात केली.

सलमान खानबरोबर काम करण्याबद्दल अविनाश म्हणाला, “मी नेहमीच म्हणतो की, जर सलमान खानला तुम्ही आवडलात, तर तुमचं नशीब फळफळलं समजा.” अविनाशने सांगितलं की फराह खानने त्याची शाहरुख खानशी ओळख करून दिली होती. मग त्याने ‘ओम शांती ओम’साठी शाहरुखबरोबर काम केलं. “तेव्हापासून तो फक्त शाहरुख खानबरोबरच शूटिंग करतोय,” असं फराह म्हणाली. अविनाश हा अमिताभ बच्चन यांचाही आवडता फोटोग्राफर असून बिग बी फोटोशूटसाठी नेहमी अविनाशलाच पसंती देतात, असंही तिने नमूद केलं.

Avinash Gowariker struggle story stay at Salman Khan house Farah Khan Vlog
अविनाश गोवारीकरच्या फार्महाऊसची झलक (फोटो- इन्स्टाग्राम)

अविनाश गोवारीकरच्या आलिशान फार्महाऊसची झलक

अविनाश गोवारीकरने इंडस्ट्रीत प्रचंड यश मिळवलं, याची साक्ष त्याचं आलिशान फार्महाऊस देतं. या फार्महाऊसचा एक मोठा परिसर प्राण्यांसाठी राखीव आहे. तिथे त्याच्या पत्नीने रेस्क्यू केलेले प्राणी असतात. व्लॉगमध्ये अविनाशने दोन गाई दाखवल्या, त्या राम चरणने भेट दिल्या आहेत.

फार्महाऊसचे इंटिरियर अत्यंत आलिशान आहे. घराचे छत खूप उंच आहे आणि लाकडी फर्निचर आहे. हॉलमध्ये मोठ्या खिडक्या आहेत, ज्यामुळे घराबाहेरील निसर्गरम्य दृश्ये थेट घरातूनच पाहता येतात.

घरातील सोफा सेट गौरी खान आणि सुझान खान यांच्या इंटिरियर डिझाइन कंपन्यांकडून घेतले आहेत, असं अविनाश गोवारीकर यांनी सांगितलं. फार्महाऊसमध्ये एक आत व एक बाहेर असे दोन स्वयंपाकघर आहेत. अविनाश व त्याच्या पत्नीने त्यांच्या खोल्यांची झलकही दाखवली. त्यांच्या खोल्या अतिशय साध्या आहेत.