लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित आणि विकी कौशल अभिनीत ‘छावा’ हा चित्रपट २०२५मधील ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला. चित्रपटात विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली होती तर रश्मिका मंदानाने महाराणी येसूबाईंची भूमिका साकारली होती. या व्यतिरिक्त अभिनेता अक्षय खन्नाने या चित्रपटात औरंगजेबाची भूमिका साकारली होती. यातील त्याच्या कामाचं प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केलं होतं. पण तुम्हाला माहीत आहे का अक्षय खन्नाने साकारलेल्या या भूमिकेसाठी अजून एका अभिनेत्याला विचारणा झाली होती.

अक्षय खन्नाने नेहमीच त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहे आणि त्यांची पसंती मिळवली आहे. पण ‘छावा’ या चित्रपटातून त्याने पहिल्यांदाच अशी ऐतिसाहिक भूमिका साकारली. यातील त्याच्या लूकचं, अभिनयाचं प्रचंड कौतुक झालं आणि यामधून तो खऱ्या अर्थाने पुन्हा लोकप्रियतेत आला असंही म्हटलं जातं. पण ‘छावा’साठी अक्षय खन्नाच्या आधी अभिनेता अविनाश वाधवनला औरंजेबाच्या भूमिकेसाठी विचारणा झाल्याचं त्याने हिंदी रशला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

१९८० च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि १९९० च्या दशकाच्या सुरुवातीला ‘जुनून’, ‘गीत’ आणि ‘बलमा’ यांसारख्या अनेक लोकप्रिय चित्रपटांत झळकलेला अभिनेता अविनाश वाधवन त्याच्या भूमिकांसाठी आजही ओळखला जातो. त्याने ‘सीआयडी’ आणि ‘बालिका वधू’ यांसारख्या मालिकांमध्येही काम केलं. मात्र, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अविनाशने करिअरबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केलं. अभिनयासाठी एमबीएचं शिक्षण अर्धवट सोडलं, पण हळूहळू प्रमुख भूमिका मिळणं बंद झालं. तसेच, साहाय्यक भूमिका स्वीकारण्याची तयारी नव्हती असंही त्याने सांगितलं.

छावाला का दिला नकार?

अविनाश वाधवनने लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ चित्रपटातील औरंगजेबाची भूमिका नाकारल्याचा खुलासा केला. या भूमिकेचं कमी स्क्रीन टाइम आणि पात्राची मांडणी आवडली नसल्यामुळे हा चित्रपट नाकारल्याचं त्याने सांगितलं. याबद्दल बोलताना तो म्हणाला, “विकी कौशल मुख्य भूमिकेत असलेल्या ‘छावा’ चित्रपटासाठी मला कास्टिंग कंपनीकडून फोन आला. त्यांनी सांगितलं, सर, आम्ही छावा नावाचा चित्रपट करत आहोत. विकी कौशल मुख्य भूमिकेत आहे आणि आम्हाला मुख्य खलनायकाच्या भूमिकेसाठी तुम्हाला भेटायचं आहे.”

तो म्हणाला, “मी त्यांना भेटायलाही गेलो नाही. मी त्यांना स्पष्ट सांगितलं, माझ्या व्यक्तिमत्त्वाला साजेशी आणि अधिक चांगली भूमिका घेऊन या. मला पांढरी दाढी लावून वृद्ध खलनायक का बनवताय? मला ती भूमिका अजिबात प्रभावी वाटली नाही.” त्यांने पुढे सांगितलं, “मी त्यांना आधी चित्रपटाची कथा सांगण्यास सांगितलं. त्यांनी कथा सांगितली, पण त्यात औरंगजेबाच्या भूमिकेला फारसं महत्त्व नव्हतं. मी त्यांना विचारलं, अभिनेता म्हणून मला यात काय वाव आहे? इतक्या वर्षांनंतर मी पुनरागमन करत आहे आणि जर मी बनावट पांढरी दाढी लावली, तर त्याचा काहीच प्रभाव पडणार नाही, असं मला वाटलं.” अविनाश पुढे म्हणाला, “काही कारणाने मला खात्री पटली होती की ही भूमिका माझ्या करिअरसाठी फारशी उपयोगाची ठरणार नाही. केवळ काम करायचं म्हणून मला ते करायचं नव्हतं. इतक्या वर्षांनंतर पुनरागमन करत असताना एखाद्या दमदार दिग्दर्शकाबरोबर आणि अभिनयाची संधी देणाऱ्या प्रभावी भूमिकेतूनच परत यायचं होतं.”

चित्रपटाच्या यशाबद्दल बोलताना अविनाश वाधवन म्हणाला, “छावा’ ब्लॉकबस्टर ठरला. चित्रपटाला मोठं यश मिळालं. औरंगजेबाच्या भूमिकेचा स्क्रीन टाइम कमी होता आणि संवादही फार नव्हते, तरीही प्रेक्षकांनी त्या भूमिकेचं भरभरून कौतुक केलं. पण आयुष्य असंच असतं. कधी आपण एखादी गोष्ट नाकारतो, कधी स्वीकारतो आणि अनेकदा परिणाम अनपेक्षित असतो.”

तो पुढे म्हणाला, “कदाचित हे माझं नशीबच असेल की मी ज्या कलाकृतींना नकार दिला, त्यापैकी अनेक हिट ठरल्या. ही भूमिका नाकारणारा मी एकटाच नव्हतो. माझ्याआधीही काही कलाकारांनी ती नाकारली होती, कारण त्या पात्रात फारसं काही करण्यासारखं नव्हतं. अखेरीस ती भूमिका अक्षय खन्नाने साकारली. त्याने ती स्वीकारली आणि त्या भूमिकेला पूर्ण न्याय देत उत्कृष्ट काम केलं.”