Baby Naaz was exploited by mother: बॉलीवूडच्या सिनेमांमध्ये काम केलेल्या अनेक बालकलाकारांना मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली. बेबी नाझही त्यापैकीच एक होत्या. त्यांच्या काळात त्या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या बालकलाकार होत्या. ‘बूट पॉलिश’ या सिनेमातील कामासाठी त्यांना १९५५ मध्ये कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. त्या चित्रपटांच्या सेटवरच मोठ्या झाल्या. मोठमोठ्या कलाकारांकडून त्यांचे कौतुक झाले.
बेबी नाझ यांनी १२० सिनेमांत केले काम
बूट पॉलिशसारख्या चित्रपटाच्या सेटवर राज कपूर यांच्यासारखे दिग्गज त्यांचे लाड करत असत. मात्र, खऱ्या आयुष्यात त्यांना खूप दु:ख सहन करावे लागले. नाझ यांनी चौथ्या वर्षापासून कमाई करण्यास सुरुवात केली. त्यांनी जवळजवळ १२० सिनेमांत काम केले. मात्र, त्यांना त्यांच्या कमाईतील पैसे मिळाले नाहीत, त्यांनी कमावलेल्या पैशांचा त्यांना कधी आनंद घेता आला नाही. कारण त्यांच्या आईचे एका व्यक्तीबरोबर अफेअर होते. त्यांची आई नाझ यांनी कमावलेले पैसे त्या व्यक्तीवर खर्च करत असत.
नाझ यांचे नाव सलमा बेग असे होते. चौथ्या वर्षी त्यांनी स्टेजवर डान्स करण्यास सुरुवात केली. स्क्रीनवरील हिरोईन ज्या पद्धतीने डान्स करत आहेत, तसा डान्स करणे त्यांना आवडायचे. स्टारडस्टला दिलेल्या एका मुलाखतीत त्या म्हणालेल्या, “मी छंद म्हणून डान्स करायला सुरुवात केली होती, पण त्यानंतर ते मला नाइलाजास्तव करावे लागले.”

घरातील आर्थिक गरजा भागवण्यासाठी करावे लागले काम
नाझ यांचे वडील कथालेखक म्हणून काम करत होते. मात्र, त्यांना संघर्ष करावा लागत होता. कुटुंबाच्या गरजा भागवण्याइतपत ते पैसे कमावू शकत नव्हते. नाझ यांना प्रत्येक कार्यक्रमासाठी १०० रुपये मानधन मिळत होते. त्यांना मिळत असलेल्या पैशातून घराच्या आर्थिक गरजा भागवल्या जाऊ लागल्या.
आठव्या वर्षी नाझ यांना पहिल्यांदा चित्रपटाची ऑफर मिळाली. सुरुवातीला नाझ यांचे आई-वडील फारसे उत्सुक नव्हते. मात्र, जेव्हा त्यांना मानधनाबद्दल समजले, त्यावेळी त्यांनी सिनेमाची ऑफर स्वीकारली.
चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यग्र झाल्यामुळे नाझ शाळेत गेल्या नाहीत, शेवटी त्यांना शाळेतून काढून टाकण्यात आले. पुढे काही चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर आणि राज कपूर यांच्या बूट पॉलिश या चित्रपटात झळकल्यानंतर नाझ घराघरांत पोहोचल्या. त्यांची लोकप्रियता पाहून शाळेने शिक्षण पूर्ण करण्यासाठी पुन्हा बोलावले. मात्र, नाझ यांच्या कमाईवरच घर चालत असल्याने त्यांच्या शिक्षणाकडे कोणीही लक्ष दिले नाही.
नाझ याबद्दल म्हणालेल्या, “माझी आई चित्रपटाच्या ऑफर स्वीकारत होती आणि माझ्या वडिलांनी काम करणं बंद केलं. माझ्या आईला माझ्याकडून पैसे कमावण्याची खूप सवय झाली होती. त्यावेळी मी खूप लहान होते आणि आई-वडिलांबद्दल माझ्या मनात खूप आदर होता, त्यामुळे त्यांना नकार देण्याची माझी हिंमतही झाली नाही; या सगळ्यामुळे माझं शिक्षण थांबलं.”
दहाव्या वर्षी आत्महत्या करण्याचा केलेला प्रयत्न
नाझ यांच्या आयुष्यात असेही काही दिवस आले, जेव्हा त्या दिवसरात्र मेहनत करायच्या, पण काही वेळा त्यांना जेवणही मिळायचे नाही. जेव्हा त्या घरी परतायच्या त्यावेळी त्यांच्या आई-वडिलांची भांडणे सुरू असायची. त्या म्हणालेल्या की मी असंख्य वेळा जेवण न करताच झोपले आहे.
नाझ यांनी वयाच्या दहाव्या वर्षी विहिरीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, त्यावेळी त्यांना वाचवण्यात आले. मात्र, नाझ यांनी त्यावेळी घडलेला प्रसंग सांगितला होता. त्या म्हणालेल्या की, माझ्या आईने मला त्यावेळी समजावण्याचा प्रयत्न केला नाही किंवा ती रडली नाही, ती माझ्यावर जोरात ओरडली होती आणि तिने मला कानाखाली मारली होती. बूट पॉलिश या सिनेमानंतर नाझ यांना स्वित्झर्लंडला शिक्षणासाठी पाठवू, अशी ऑफर राज कपूर यांनी दिली होती. पण, त्यांच्या आईने नकार दिला.

वयाच्या १२ व्या वर्षी नाझ यांना समजले की त्यांच्या आई-वडिलांची सतत भांडणे का होत आहेत. आईचे राजेंद्र मलोनी नावाच्या एका कॅमेरामॅनबरोबर अफेअर होते आणि तिला घटस्फोट हवा होता. नाझच्या आईने वडिलांना घराबाहेर हाकलून दिले. नाझ १६ वर्षांची असताना त्यांच्या आईने राजेंद्रबरोबर लग्न केले. पुढे नाझ यांनी आईला आर्थिक मदत करणे बंद केले. वडिलांचा शोध घेतला आणि घरी आणले. जेव्हा नाझ यांनी पैसे देणे बंद केले, त्यावेळी त्यांच्या आईला राजेंद्रने सोडून दिले.

नाझ यांनी १९६५ ला अभिनेते सुबिराज यांच्याशी लग्नगाठ बांधली. लग्नानंतर नाझ यांनी काम करणे सुरू ठेवले, पण त्यांना हवी तशी प्रसिद्धी मिळाली नाही. त्यांनी श्रीदेवींसाठी डबिंगचेही काम केले, मात्र त्यांचे स्टार बनण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले.
१९९५ मध्ये त्यांचे कर्करोगाने निधन झाले. त्यावेळी त्यांचे वय ५३ होते.
