Badshah Isha Rikhi Divorce: मनोरंजन विश्वातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध रॅपर बादशाह आणि त्याची दुसरी पत्नी अभिनेत्री ईशा रिखी यांचा अवघ्या ५ महिन्यांचा संसार मोडला आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा रंगल्या होत्या, त्यावर आता घटस्फोटाची अधिकृत घोषणा करत दोघांनी शिक्कामोर्तब केले आहे. सोमवारी बादशाहने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट शेअर करत ईशा व तो परस्पर संमतीने वेगळे होत असल्याचं जाहीर केलं.
बादशाहने त्याच्या पोस्टमध्ये लिहिलं, “मी आणि ईशा रिखीने परस्पर संमतीने वेगळं होण्याचा आणि आपापल्या मार्गाने पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय एकमेकांबद्दल आदर ठेवून घेण्यात आला आहे. या कठीण काळात प्रत्येकाने आमच्या प्रायव्हसीचा आदर करावा, अशी आम्ही विनंती करतो.”
पुढे त्याने लिहिलं, “या विषयावर ही आमची एकमेव प्रतिक्रिया असेल. आमच्या नात्याबद्दल यापुढे कोणतेही तर्कवितर्क किंवा अंदाज लावले जाऊ नयेत, अशी आमची सर्वांना विनंती आहे.”
बादशाहने केलेली घटस्फोटाची पोस्ट

बादशाह आणि ईशाच्या वैवाहिक आयुष्यात सगळं आलबेल नसल्याच्या चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू होत्या, त्यानंतर ही घटस्फोटाची बातमी समोर आली आहे. ईशा रिखीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करून घटस्फोटाचे संकेत दिले होते.
ईशा रिखी हिची पोस्ट
“काही लढाया अशा असतात ज्यांचे शरीरावर कोणतेही घाव किंवा व्रण दिसत नाहीत. मी बराच काळ गप्प राहिले, कारण मला भीती वाटत होती. माझ्या पतीकडे असलेला प्रभाव, ताकद पाहून मी दबून गेले होते, आणि शांत राहणंच सर्वात सुरक्षित आहे, अशी मी माझी स्वतःची समजूत काढली होती. माझं मौन म्हणजे माझी सहमती नव्हती, तर ती केवळ तग धरून राहण्याची माझी धडपड होती. आज मी भीतीपेक्षा धैर्य निवडतेय आहे. मी सगळं सत्य सांगण्यासाठी अजून कदाचित तयार नाही, पण सर्व काही ठीक आहे असं दाखवणं थांबवण्यासाठी मी आता पूर्णपणे तयार आहे,” असं ईशा रिखीने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं होतं.

ईशा रिखीची आई पूनम रिखीने मार्च २०२६ मध्ये बादशाह व ईशाच्या लग्नाचे काही फोटो व व्हिडीओ पोस्ट केले होते. त्यानंतर ईशानेही बादशाहबरोबरचे काही फोटो पोस्ट केले होते. पण बादशाहने मात्र लग्नाच्या वृत्तांबद्दल कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती. आता त्याने थेट घटस्फोटाची घोषणा केली आहे.
बादशाहची पहिली पत्नी कोण?
बादशाहचं हे दुसरं लग्न होतं. त्याचं पहिलं लग्न जास्मिन मसिह हिच्याशी झालं होतं. त्यांचा घटस्फोट २०२० मध्ये झाला. बादशाह व जास्मिन यांना जेसेमी ग्रेस मसिह सिंह नावाची ९ वर्षांची मुलगी आहे. ती तिच्या आईबरोबर परदेशात राहते.
