लोकप्रिय हिंदी व पंजाबी गायक-रॅपर बादशाह त्याच्या लक्झरी लाइफस्टाइलसाठी ओळखला जातो. गेल्या वर्षी, त्याने रोल्स-रॉइस कलिनन सिरीज II ही कार खरेदी करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ही कार घेणारा तो पहिला भारतीय संगीतकार ठरला होता.
ही लक्झरी कार खरेदी केल्यावर तो मुकेश अंबानी, शाहरुख खान व अजय देवगण अशा मोजक्याच लोकांच्या यादीत सामिल झाला, ज्यांच्याकडे ही कार आहे. आता एका मुलाखतीत बादशाहने ही कार घेण्याच्या निर्णयाबद्दल सांगितलं. हा निर्णय अचानक घेतला होता. त्याचा ही कार खरेदी करण्याचा उत्साह फक्त १०-१५ मिनिटंच टिकला, असंही त्याने सांगितलं.
बादशाहने घेतलेल्या कारची ऑन रोड किंमत १२.४५ कोटी रुपये आहे. कर्ली टेल्सशी बोलताना बादशाह म्हणाला, “मला वाटतं की ही कार खरेदी करण्याचा निर्णय खूपच अचानक घेतला होता. मी लगेचच ठरवलं की मला ती आजच घ्यायची आहे. ही एक छान कार आहे, पण कार घेण्याचा तो उत्साह फक्त १०-१५ मिनिटे टिकला. मग मी विचार केला, आता ‘पुढे काय?'” ही कार घेणं, चेकलिस्ट पूर्ण करण्यासारखं होतं, असंही बादशाहने नमूद केलं.
बादशाह पुढे म्हणाला, “मला सर्वोत्तम टेक्नॉलॉजी असलेली कोणतीही गोष्ट माझ्याकडे हवी असं वाटतं. लोक म्हणतात ना की ही सर्वात चांगली कार आहे. म्हणून मला त्या सर्व गोष्टी हव्या असतात.” लक्झरी वस्तूंवर कोट्यवधी रुपये खर्च करणारा बादशाह काहीही खरेदी करण्यापूर्वी किंमत पाहतो.
बादशाहला आहे लक्झरी गाड्यांची आवड
बादशाह लिमिटेड एडिशन घडी घेण्यास प्राधान्य देतो. त्याच्यामते दुर्मिळ घड्याळांची किंमत काळानुसार वाढत जाते. घड्याळ्याच्या खऱ्या किमती आई-वडिलांना कधीच सांगत नाही, कारण घड्याळ इतके महाग असतात, त्यावर त्यांचा विश्वास बसणार नाही. “मला चांगले कपडे घालणं, चांगड्या गाड्या चालवणं, चांगले शूज घालणं आवडतं, पण मी वस्तूंपेक्षा नात्यांना जास्त प्राधान्य देतो,” असं बादशाह म्हणाला.
