बॉलीवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' अभिनेता आमिर खान मुलगा जुनैद खान साध्या राहणीमानामुळे नेहमी चर्चेत असतो. त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर सतत व्हायरल होतं असतात. पण सध्या जुनैद हिंदी सिनेसृष्टीतील पदार्पणामुळे चर्चेत आला आहे. आमिर खानचा लेक आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण करण्यास सज्ज झाला आहे. १४ जूनला जुनैद खानचा पहिला चित्रपट 'महाराज' नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे. पण प्रदर्शनापूर्वीच जुनैदचा पहिला-वहिला चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी जुनैदच्या 'महाराज' चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित झाला होता. या पोस्टरमधून जुनैदसह अभिनेता जयदीप अहलावतचा चित्रपटातील पहिला लूक प्रेक्षकांसमोर आला होता. पण याच पोस्टरमुळे विश्व हिंदू परिषदेची युवा संघटना बजरंग दलने आक्षेप घेतला आहे. हेही वाचा - ‘मुरांबा’ मालिकेतून स्मिता शेवाळेची एक्झिट, आता जान्हवीच्या भूमिकेत झळकणार ‘काव्यांजली’ फेम अभिनेत्री 'बॉलीवूड हंगामा'च्या वृत्तानुसार, बजरंग दलने यशराज फिल्म्स आणि नेटफ्लिक्सला पत्र लिहिलं आहे. ३ जूनला हे पत्र लिहिलं असून त्यामधून बजरंग दलने म्हटलं आहे की, चित्रपटाच्या पोस्टरमधून एका हिंदू धार्मिक नेत्याची व्यक्तिरेखा नकारात्मक स्वरुपात दाखवली जात आहे. त्यामुळे विशिष्ट वर्गाच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात. कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थितीही निर्माण होऊ शकते. म्हणून प्रदर्शनापूर्वी चित्रपट बजरंग दलला दाखवण्यात यावा अशी मागणी पत्राद्वारे केली आहे. ३ जूनला बजरंग दलचे कोकण प्रदेश संयोजक गौतम रावरिया यांनी हे पत्र यशराज फिल्म्स आणि नेटफ्लिक्सला दिलं. या पत्राच्या शेवटी गौरव यांनी हा चित्रपट वीएचपी दाखवावा. जेणेकरून त्यानंतर पुढे काय करायचं याचा निर्णय घेता येईल, असं स्पष्ट सांगितलं आहे. गौतम रावरिया यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर नेटफ्लिक्सच्या एका अधिकाऱ्याला पत्र देतानाचा व्हिडीओ देखील पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्येही गौतम नेटफ्लिक्सच्या अधिकाऱ्यांना म्हणतात की, जर चित्रपटात काही आक्षेपार्ह असेल तर बजरंग दल चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही. हेही वाचा - Video: ‘ठरलं तर मग’ मालिकेतील अर्जुन, कल्पना, पूर्णाआजीचं भर उन्हात शूटिंग; अभिनेता व्हिडीओ शेअर करत म्हणाला… दरम्यान, महाराज लायबल केसवर आधारित असलेला 'महाराज' चित्रपटात जुनैद मुख्य भूमिकेत असून त्याच्या विरोधात जयदीप खलनायक दाखवण्यात आला आहे. या चित्रपटात आमिर खानच्या मुलाने पत्रकार करसनदास मुलजी ही व्यक्तिरेखा साकारली आहे. तर जयदीप चित्रपटात महाराजच्या भूमिकेत झळकणार आहे.