Bappi Lahiri Mumbai House Inside Photos: दिग्गज गायक व संगीतकार बप्पी लहरी आता हयात नाहीत, पण त्यांचा वारसा त्यांच्या संगीतातून आणि मुंबईतील त्यांच्या घराच्या भिंतींमधून आजही जिवंत आहे. नुकतीच त्यांच्या नातवाने या ऐतिहासिक घराची झलक सर्वांना दाखवली. बप्पी लहरी यांनी १९८३ मध्ये हे घर तब्बल १९.३२ लाख रुपयांना खरेदी केलं होतं. आता या घराचे मूल्य केवळ पैशांत मोजता येणार नाही, कारण तिथे जपलेल्या आठवणी, पुरस्कार, जुने फोटो याद्वारे त्यांचा सगळा वारसा तिथे पाहायला मिळतोय.
बप्पी लहरी हे गणपती बाप्पाचे खूप मोठे भक्त होते. कोणत्याही मोठ्या प्रोजेक्टपूर्वी किंवा संगीत दौऱ्यापूर्वी ते आठवणीने सिद्धिविनायकाचे दर्शन घ्यायचे. त्यांची ही श्रद्धा त्यांच्या घरातही दिसून येते. या घरात त्यांनी वर्षानुवर्षे जमा केलेल्या १,००० हून अधिक गणपती मूर्ती आहेत. ‘पिंकविला’शी बोलताना बप्पी लहरींचा नातू रेगो म्हणाला, “माझ्या आजोबांनी १९८३ मध्ये त्यांच्या वडिलांना दाखवून हे घर विकत घेतलं होतं.”
व्हरांडा, खिडक्या अन्.., घराला मिळतो व्हिंटेज लूक
हे घर बाहेरून पांढऱ्या रंगाचे असून अत्यंत सुंदर दिसते. मुख्य म्हणजे या घराला एक व्हरांडा आहे. घराच्या प्रशस्त बैठकीच्या खोलीत बप्पी लहरींचे अनेक पुरस्कार आणि रेकॉर्ड्स सजवलेले आहेत. यात त्यांनी वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षी तबला वादनासाठी जिंकलेल्या पहिल्या मेडलचा देखील समावेश आहे. लाकडी चौकटीच्या काचेच्या खिडक्या, निळ्या रंगाचे मऊ सोफे आणि बाहेरून येणारा सूर्यप्रकाश यामुळे घराला एक व्हिंटेज लूक मिळतो. या घरात आता एक खास कोपरा बप्पी लहरींच्या फोटोंसाठी ठेवण्यात आला आहे. घरी येणारे पाहुणे इथे त्यांना आदरांजली वाहतात.
घरातील सर्वात खास कोपरा: बप्पी दांचा ‘हॉल ऑफ फेम’
बप्पी लहरींच्या या घरातील सर्वात आकर्षक भाग म्हणजे त्यांचा ‘हॉल ऑफ फेम’. त्यांचा नातू रेगो याने या खोलीबद्दल माहिती दिली. या खोलीत वाद्ये, पुरस्कार, चाहत्यांनी दिलेले फोटो आणि गणपतीच्या मूर्तींचा संग्रह आहे. “आजोबांकडे १०० वर्षे जुनी वाद्ये आहेत.” एका जुन्या तबल्याकडे बोट दाखवत तो म्हणाला, “हा तोच तबला आहे जो घेऊन ते मुंबईत आले होते. ते एक उत्तम गिटारवादक देखील होते.”

किशोर कुमार यांचा शेवटचा फोटो
या खोलीतील अनेक खास गोष्टींपैकी एक म्हणजे किशोर कुमार यांच्याबरोबरचा बप्पी लहरी यांचा एक फोटो. रेगो म्हणाला, “हा किशोर कुमार यांचा शेवटचा फोटो आहे. त्यांच्या निधनाच्या अवघ्या एक दिवस आधी, ‘वक्त की आवाज’ चित्रपटाच्या रेकॉर्डिंगदरम्यान आजोबांनी हा फोटो काढला होता. त्यानंतर १२ तासांतच त्यांचे निधन झाले होते.”
कुटुंबाने जपून ठेवल्या बप्पी लहरींच्या पाऊलखुणा
या खोलीत एक भव्य सोनेरी मखमली खुर्ची आहे, ही बप्पी लहरींची आवडती खुर्ची होती. रेगो म्हणाला, “दादू इथे बसून गाण्यांचा सराव करायचे आणि इतरांना मार्गदर्शन करायचे.” त्यांच्या निधनानंतर, बंगाली परंपरेनुसार कुटुंबाने या खुर्चीवर त्यांच्या पाऊलखुणा जपून ठेवल्या आहेत. या खुर्चीच्या शेजारीच डिस्को डान्सर काळातील एक सोन्याचा मुलामा असलेला माईक आहे. हा माईक त्यांचं सोन्यावर असलेलं प्रेम दर्शवतो.
बप्पी लहरी हयात नसले तरी या घराची एक झलक पाहण्यासाठी चाहते मोठ्या प्रमाणात येतात. बप्पी लहरींचा स्वभाव अत्यंत मनमिळाऊ होता, ते अनेकदा चाहत्यांना स्वतःहून घरात बोलावून घ्यायचे, त्यांना घर दाखवायचे आणि आपल्या आयुष्यातील किस्से सांगायचे. दरम्यान, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, बप्पी लहरी यांनी हे घर १९,३२,००० रुपयांना खरेदी केले होते. हे घर एकूण १,०५० चौरस फूट क्षेत्रफळात पसरलेले आहे.
