Batwara 1947 Trailer Release : भारताच्या इतिहासातील अत्यंत वेदनादायी आणि काळजाला भिडणाऱ्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर आधारित ‘बटवारा 1947’ या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आमिर खान प्रॉडक्शन्सच्या बॅनरखाली बनलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार संतोषी यांनी केले आहे. जवळपास तीन दशकांनंतर सनी देओल आणि राजकुमार संतोषी यांची ही जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र येत असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या चित्रपटात सनी देओलसोबत प्रीती झिंटा, शबाना आझमी, करण देओल आणि अली फझल यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

१९४७ च्या भारताच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर आधारित ‘बटवारा 1947’ ही एका कुटुंबाची कथा आहे. त्या कुटुंबाचे आयुष्य हिंसा, भीती आणि सक्तीच्या स्थलांतरामुळे पूर्णपणे बदलून जाते. एकेकाळी एकत्र राहणारे समाज विभाजनाच्या जखमा सोसताना दिसतात. चित्रपटात प्रचंड दुःख आणि वाढता द्वेष दाखवण्यात आला आहे. पण त्याचबरोबर माणुसकी, आशा आणि करुणा याची झलकही पाहायला मिळते.

सनी देओलने मुस्लीम पात्र साकारलं आहे. फाळणीनंतर त्याला एका हिंदू महिलेच्या घरात राहण्यास सांगण्यात येतं. त्यावरून जो गदारोळ होतो, त्यावर हा चित्रपट बेतलेला आहे. या चित्रपटात सनी देओल एका अशा व्यक्तीची दमदार भूमिका साकारताना दिसतोय, जो कोणत्याही परिस्थितीत आपल्या विवेकाशी तडजोड करत नाही. शबाना आझमी एका ज्येष्ठ महिलेच्या भूमिकेत विलक्षण प्रभाव पाडतात. त्यांचं शहाणपण, संयम आणि करुणा या चित्रपटाचा नैतिक आधार वाटतात. प्रीती झिंटा अत्यंत कठीण परिस्थितीतही आपल्या कुटुंबाला एकत्र ठेवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या महिलेच्या भूमिकेत दिसते.

पाहा बटवारा १९४७ चा ट्रेलर

बटवारा 1947चा हा ट्रेलर फाळणीची शोकांतिका आणि सामान्य माणसांमधील माणुसकीची भावना दोन्ही प्रभावीपणे मांडतो. ‘बटवारा 1947’ मध्ये शबाना आझमी, सनी देओल, प्रीती झिंटा, करण देओल, अली फझल आणि अभिमन्यू सिंग यांचा दमदार कलाकारांची मांदियाळी आहे. जवळपास तीन दशकांनंतर दिग्दर्शक राजकुमार संतोषी आणि सनी देओल पुन्हा एकत्र येत असल्याने या चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखी वाढली आहे.

आमिर खान प्रॉडक्शन्सच्या बॅनरखाली तयार झालेल्या ‘बटवारा 1947’ चे दिग्दर्शन राजकुमार संतोषी यांनी केले आहे. चित्रपटाला ए. आर. रहमान यांनी संगीत दिले असून गीतकार जावेद अख्तर यांनी गीतलेखन केले आहे. आमिर खान आणि अपर्णा पुरोहित यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून, हा चित्रपट १४ ऑगस्ट २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.