Best Bollywood Biopics to Watch: हल्ली चरित्रपटांचा ट्रेंड सुरू आहे. त्यामुळे अलीकडे अनेक लोकप्रिय व्यक्तींच्या जीवनावर आधारित चरित्रपट बॉलीवूडमध्ये बनताना दिसले. येत्या काळातही काही बायोपिक प्रदर्शित होणार आहेत. जर तुम्हीसुद्धा बायोपिकसाठी इच्छुक असाल अथवा तुम्हालाही या धाटणीच्या चित्रपटांची आवड असेल, तर आम्ही तुम्हाला अशा काही चरित्रपटांची नावं सांगणार आहोत, जे प्रदर्शित झाल्यानंतर हिट ठरले होते.

बॉलीवूडमध्ये आतापर्यंत ‘भाग मिल्खा भाग’, ‘गंगूबाई काठियावाडी’, ‘मेरी कोम’, ‘दंगल’, ‘एम. एस. धोनी’ यांसारखे चरित्रपट बनले आहेत. या सर्व चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केलीच. परंतु, प्रदर्शनाच्या इतक्या वर्षांनंतरही प्रेक्षकांच्या मनात हे चित्रपट घर करून आहेत. हिट बायोपिकच्या यादीतील १० चित्रपट कोणते आहेत ते जाणून घेऊया…

बॉलीवूडमधील ‘हे’ १० बायोपिक पाहिलेत का?

भाग मिल्खा भाग – फरहान अख्तर मुख्य भूमिकेत असलेला हा चित्रपट मिल्खा सिंग यांच्या जीवनावर आधारित आहे. त्यामध्ये त्यांचं बालपण, त्यांच्या इच्छा, स्वप्न, छंद आणि आयुष्यातील खडतर प्रसंग हे पाहायला मिळतं. त्यांना फ्लाईंग सिंग म्हटलं जायचं. ते प्रसिद्ध खेळाडू होते. काही काळ ते भारतीय आर्मितही होते.

मेरी कॉम – प्रियांका चोप्रा मुख्य भूमिकेत असलेला हा चित्रपट भारतीय बॉक्सर मेरी कॉमवर आधारित आहे. मणिपूरमधील छोट्याशा गावातून येऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर बॉक्सिंग करण्यापर्यंतचा त्यांचा हा प्रेरणादायी प्रवास यामधून पाहायला मिळतो. त्यांना महिला म्हणून करावे लागणारे संघर्ष यामधून दाखवण्यात आले आहेत.

द लिजेंड ऑफ भगत सिंह – अजय देवगण या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. हा देशभक्तीवर आधारित चित्रपट आहे. या स्वातंत्र्यवीरांवर आधारित चित्रपटात भगत सिंह, सुखदेव व राजगुरू यांचा संघर्ष, मेहनत यावर प्रकाश टाकण्यात आला.

दंगल – हा चित्रपट महावीर सिंग फोगाट यांच्यावर आधारित आहे. त्यांनी कसं त्यांच्या मुलींना कुस्ती शिकवली. त्यामुळे त्या देशासाठी कशा मोठी कामगिरी करू शकल्या हे यातून पाहायला मिळतं. मुलींना फक्त चूल आणि मूल यापुरतं मर्यादित न ठेवता, त्यांच्यातील गुण हेरून त्यांना स्वावलंबी बनवलं. हे सर्व या चित्रपटात पाहायला मिळतं. त्यामध्ये गीता-बबिता कुस्तीपटूंचा प्रवासही पाहायला मिळतो.

एम. एस. धोनी – भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एम. एस. धोनीवर हा चित्रपट आधारित आहे. त्यामध्ये धोनीचा प्रवास कसा सुरू झाला, त्याला कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला, तसेच त्याची प्रेमकहाणी, त्याने करिअरमध्ये घेतलेले निर्णय, नवोदित खेळाडू ते कर्णधार हा प्रवास हे सर्व यामधून पाहायला मिळतं.

नीरजा – सोनम कपूर हिने यामध्ये खंबीर नीरजा भानोत या हवाई सुंदरीची भूमिका साकारली आहे, जिने विमान हायजॅक झाल्यानंतर अनेक प्रवाशांना वाचवण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घातला आणि कौतुकास्पद कामगिरी केली हे पाहायला मिळतं.

पॅड मॅन – अरुणाचलम मुरुगनंथम (Arunachalam Muruganantham) यांच्यावर हा चित्रपट आधारित आहे, ज्यांनी स्त्रियांच्या निरोगी आयुष्यासाठी आणि दर महिन्याला येणाऱ्या मासिक पाळीदरम्यान त्यांना अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी अनेक प्रयत्न करून सॅनिटरी नॅपकिन तयार केले आणि समाजात जागरूकता निर्माण केली.

सुपर ३० – यामध्ये हृतिक रोशनने आनंद कुमार या गणिततज्ज्ञाची भूमिका साकारली आहे, जो शिक्षणाचा खर्च उचलू न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना सुशिक्षित करण्यासाठी योगदान देतो आणि ३० विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडत्या इंजिनियरिंगच्या कॉलेजमधून शिक्षण घेण्यासाठी मदत करतो.

शेरशाह – सिद्धार्थ मल्होत्राने या चित्रपटात कॅप्टन विक्रम बात्रा ही भूमिका साकारली आहे. त्यांनी कारगिल युद्धादरम्यान दिलेल्या योगदानावर हा चित्रपट आधारित आहे. त्याच्यासह यामध्ये त्याची बायको कियारा अडवाणी मुख्य नायिकेच्या म्हणजेच विक्रम बात्रा यांच्या प्रेयसीच्या भूमिकेत पाहायला मिळाली.

गंगूबाई काठियावाडी – संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटात बॉलीवूडची अभिनेत्री आलिया भट्ट मुख्य भूमिकेत आहे. तिने यामध्ये गंगूबाई यांची भूमिका साकारली आहे. त्यामधील तिच्या अभिनयासाठी तिचं अनेकांनी कौतुक केलं होतं. बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटानं कोट्यवधींची कमाई केली होती.