Bhagyashree Relationship Rule 2-2-2 Formula: बॉलीवूड अभिनेत्री भाग्यश्री ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून चाहत्यांबरोबर ती तिचे अनुभव शेअर करत असते. दर मंगळवारी भाग्यश्री आरोग्याशी संबंधित, तर दैनंदिन आयुष्याशी निगडित महत्त्वाचे सल्लेही देत असते. पण, यावेळी भाग्यश्रीने जोडीदाराबरोबर नाते अधिक चांगले आणि टिकवून ठेवण्यासाठी मोलाचा सल्ला दिला आहे. सोशल मीडियावर तिने २-२-२ असा एक फॉर्म्युला शेअर केला आहे.
भाग्यश्री इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये काम, कुटुंब आणि जबाबदारी या सगळ्यांमध्ये अनेकदा जोडीदाराला वेळ द्यायला जमत नाही. पण, आयु्ष्यामध्ये बाकी सर्व गोष्टींसाठी तुम्ही वेळ काढू शकता तर थोडासा वेळ हा आपल्या रिलेशनशिपसाठी नक्की काढायला हवा.”
काय आहे भाग्यश्रीने सांगितलेला २-२-२ फॉर्म्युला?
चांगल्या नात्यांसाठी भाग्यश्रीने खास सल्ला दिला. ती म्हणाली, “नात्यांसाठी २-२-२ असा नियम पाळा. दोन आठवड्यातून एकदा कॉफी प्यायला किंवा डेट नाईटसाठी वेळ द्या. त्या डेटवेळी फोनचा अजिबात वापर करू नका. त्यावेळी घरातील किंवा कामासंबंधित गप्पा मारू नका, तर फक्त एकमेकांसाठी एकमेकांना वेळ द्या आणि गप्पा मारा. आपल्या जोडीदारातील सर्वांत आवडत्या दोन गोष्टी त्याला आवर्जून सांगा. त्याचे हसणे किंवा त्याचा मधूर आवाज किंवा त्याची अशी कोणतीही गोष्ट, ही जो तो तुमच्यासाठी करत असेल तर ते त्याला सांगा. कोणाचेही कौतुक करण्यासाठी कोणतीच गोष्ट ही लहान किंवा मोठी असत नाही, त्यामुळे जोडीदाराचे मनापासून कौतुक करा.”
पुढे भाग्यश्री म्हणाली, डेट नाईट संपण्यापूर्वी दोन मिनिट तुमच्या जोडीदाराच्या डोळ्यांमध्ये पाहा. काहीही न बोलता फक्त त्याच्या डोळ्यांमध्ये पाहत राहा.”
भाग्यश्रीने जोडीदाराबरोबर चांगले नाते राहण्यासाठी खास सल्ला दिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिच्या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका नेटकऱ्याने लिहिले, “खूपच प्रेरणादायी व्हिडीओ आहे,” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले, “हे तर फारच चांगले आणि कुतूहल निर्माण करणारे आहे.” आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “तू खूपच मोलाचा सल्ला दिला आहेस, यासाठी खूप धन्यवाद, मी खऱ्या आयुष्यात हे नक्की फॉलो करेन.” तसेच भाग्यश्रीच्या व्हिडीओवर एकाने लिहिले, “खूप छान, आयुष्यभर उपयोगी पडणारा सल्ला आहे.”
