Bhagyashree Glowing Skin Secret : बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री भाग्यश्री हिने नैसर्गिक सौंदर्याने व अदांनी चाहत्यांना घायाळ केले आहे. ५७ वर्षीय भाग्यश्री आजही अनेकांसाठी फिटनेस आणि ब्युटी आयकॉन आहे. ‘मैने प्यार किया’ या सिनेमातून घराघरात पोहोचलेल्या भाग्यश्रीचा मोठा चाहतावर्ग आहे. या वयातही भाग्यश्रीची तजेलदार त्वचा आणि ग्लो याचं नेमकं रहस्य काय, अशी चर्चा रंगते. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या भाग्यश्रीने नुकत्याच शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये रोजच्या आहारातील एका खास फळाची माहिती दिली आहे. हे फळ त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवण्याबरोबरच पचनक्रियेलाही फायदेशीर ठरत असल्याचे तिने सांगितले आहे. या फळामुळे स्किन ग्लोइंग होत असल्याचा खुलासा भाग्यश्रीने केला आहे.

अभिनेत्री भाग्यश्री सोशल मीडियावर तिच्या फिटनेस आणि आरोग्याशी संबंधित टिप्स चाहत्यांबरोबर नियमित शेअर करत असते. दर मंगळवारी ती ‘ट्यूसडे टिप’ (Tuesday Tip) या सिरीजद्वारे आहार, फिटनेस आणि निरोगी जीवनशैलीविषयी माहिती देणारे व्हिडीओ पोस्ट करीत असते. याच सिरीजमधील नव्या व्हिडीओमध्ये तिने एका खास फळाचे आरोग्यासाठी असलेले फायदे सांगितले आहेत. विशेष म्हणजे, हे फळ एका विशिष्ट पद्धतीने खात असल्याचेही तिने नमूद केले.

भाग्यश्री कोणते फळ खाते?

यावेळी भाग्यश्रीने ड्रॅगन फ्रूटचे महत्त्व अधोरेखित केले. हे फळ खास ओडिशामधून आल्याचे सांगत ती म्हणाली, “हे कमलम आहे. मी हे फळ फ्रीजमध्ये थंड करून कापते आणि त्यावर थोडासा लिंबाचा रस पिळून मग खाते. अशा पद्धतीने खाल्ल्यावर मन तृप्त झाल्यासारखं वाटतं. यामध्ये व्हिटॅमिन सी आणि भरपूर अँटिऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे त्वचा चमकदार राहते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.”

पुढे तिने ड्रॅगन फ्रूटच्या इतर आरोग्यदायी फायद्यांविषयीही माहिती दिली. ती म्हणाली, “या फळामध्ये फायबर आणि प्री-बायोटिक्स मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे पचनक्रिया सुधारते, पोट स्वच्छ राहते आणि आतड्यांचे आरोग्यही चांगले राहते. तसेच ड्रॅगन फ्रूटमधील लहान काळ्या बिया ओमेगा-३ फॅटी अॅसिडने समृद्ध असतात. त्या नीट चावून खाल्ल्यास हृदयाच्या आरोग्यासाठीही त्या फायदेशीर ठरतात,”

भाग्यश्रीच्या ‘राजा शिवाजी’ सिनेमातील भूमिकेचे झाले कौतुक

भाग्यश्रीने १९८९ मध्ये सलमान खानसह ‘मैने प्यार किया’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आणि पहिल्याच चित्रपटात तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. यानंतर तिने ‘कैद में है बुलबुल’, ‘त्यागी’, ‘पायल’, ‘घर आया मेरा परदेसी’ यांसारख्या सिनेमांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. काही वर्षे सिनेविश्वापासून दूर राहिल्यानंतर ती पुन्हा एकदा सक्रिय झाली आहे. काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘राजा शिवाजी’ या चित्रपटात तिने राजमाता जिजाऊ यांची महत्त्वपूर्ण भूमिका साकारली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्रींची भूमिका भाग्यश्रीने प्रभावीपणे साकारली असून, तिच्या अभिनयाचे कौतुक झाले.