Bhagyashree Magic Water recipe for weight loss and glowing skin: ‘मैंने प्यार किया’ हा १९८९ ला प्रदर्शित झालेला चित्रपट आजही लोकप्रिय आहे. चित्रपटातील गोष्ट, गाणी यांमुळे हा सिनेमा प्रचंड गाजला. सिनेमातील कलाकारांचेदेखील मोठ्या प्रमाणात कौतुक झाले. सलमान खान आणि भाग्यश्री यांची जोडी लोकप्रिय ठरली.

आता भाग्यश्री अनेक चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारताना दिसत आहे. लवकरच ती रितेश देशमुखच्या राजा शिवाजी या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अभिनयाबरोबरच भाग्यश्री सोशल मीडियावरदेखील सक्रिय असते. ती सोशल मीडियावर विविध व्हिडीओ शेअर करते. यामध्ये अनेकदा तिचे विविध लूक पाहायला मिळतात. कधी ती पारंपारिक मराठमोळ्या वेशभूषेत दिसते तर कधी विविध सणांनुसार ती वेशभूषा करते, त्यामुळे तिचे लूक लक्ष वेधून घेतात.

याबरोबरच, भाग्यश्री सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध पदार्थांच्या रेसिपी सांगते. तसेच, व्यायामाबद्दल आणि काही दैनंदीन जीवनात उपयुक्त ठरणाऱ्या काही गोष्टीदेखील ती शेअर करते.

“चमकदार त्वचा, उत्तम रोगप्रतिकार शक्ती अन्…”

आता भाग्यश्रीने तिच्या एका व्हिडीओमध्ये मॅजिक वॉटर( Magic Water)बद्दल सांगितले आहे. आता हे मॅजिक वॉटर म्हणजे नेमके काय आणि त्याचे कोणते फायदे आपल्या शरीराला होतात, हे जाणून घेऊ…

भाग्यश्रीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये ती म्हणाली, “जर तुम्हाला चमकदार त्वचा, उत्तम रोगप्रतिकार शक्ती आणि वजन कमी करण्यासाठी मदत हवी असेल, त्यासाठी मी तुम्हाला मॅजिक वॉटरबद्दल सांगणार आहे.

“मूठभर लवंगा, दालचिनीचे तुकडे, चक्रफूल (स्टार अ‍ॅनिस), तमालपत्र, पुदिन्याची पाने आणि वेलची कोमट पाण्यात ८ तास भिजत ठेवावीत. दोन आठवडे नियमित या पाण्याचे सेवन केल्यानंतर त्याचे तुमच्या शरीरावर चांगले परिणाम दिसतात.”

दालचिनी आणि लवंग चयापचाय क्रिया वाढवतात आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवतात. वेलची आणि पुदिन्यामुळे शरीरात दाह निर्माण होत नाही. तमालपत्र आणि चक्रफूल हे शरीराला डिटॉक्स करते आणि तसेच शरीरातील सूज कमी करतात.

पुढे तिने कॅप्शनमध्ये असेही लिहिले, “तुमच्या स्वयंपाकघरातील साध्या गोष्टी तुमचे शरीर बदलू शकतात. तुमच्या अंतर्गत आरोग्याची काळजी घेतल्यास त्याचा चांगला परिणाम तुमच्या दिसण्यावरही होतो.”

सल्लागार आहारतज्ज्ञ कनिका मल्होत्रा यांनी द इंडियन एक्सप्रेसशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, “दोन आठवडे दररोज रात्री लवंगाचे पाणी पिण्यामुळे अनेक आरोग्यदायी फायदे मिळू शकतात. हे पाणी पचनसंस्थेचे आरोग्य सुधारण्यास मदत करते, पोटफुगी कमी करते आणि आतड्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करते. अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असलेले लवंगाचे पाणी रोगप्रतिकारशक्ती वाढवते.”

ती पुढे म्हणाल्या की हे वजन नियंत्रणासाठीही उपयुक्त ठरू शकते, कारण ते चयापचय क्रिया (मेटाबॉलिझम) वाढवण्यास आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते. यामुळे अनावश्यक खाण्याची इच्छा कमी होते.

लवंगामध्ये असेलेल्या गुणधर्मामुळे जसा त्याचा फायदा शरीराला होतो. तसेच दालचिनी, चक्रफूल, तमालपत्र आणि पुदिन्याच्या पाने, वेलची यांचेदेखील शरीराला मोठ्या प्रमाणात फायदे होतात. त्यामुळे भाग्यश्रीने सांगितलेल्या मॅजिक वॉटरचा शरीराला फायदा होऊ शकतो.