सलमान खान आणि भाग्यश्री यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘मैंने प्यार किया’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. या सिनेमामुळे सलमान-भाग्यश्री या दोन्ही कलाकारांना इंडस्ट्रीत एक वेगळी ओळख मिळाली. यातील गाणीही सर्वत्र तुफान लोकप्रिय आहेत. पण, तुम्हाला माहितीये का? भाग्यश्रीला सुरुवातीला या सिनेमात काम करायचं नव्हतं, तिने यासाठी नकार दिला होता. याबद्दल अभिनेत्रीने ‘इंडियाज बेस्ट डान्सर ५’मध्ये खुलासा केला आहे.
भाग्यश्री म्हणाली, “मला हा सिनेमा करायचाच नव्हता कारण, मला माझं शिक्षण पूर्ण करण्यासाठी परदेशात जायचं होतं. मी तेव्हा १८ वर्षांची होते. त्यामुळे चित्रपटांमध्ये वगैरे काम करण्याचा मी विचारच केव्हा नव्हता. तेव्हा सूरजजी आणि त्यांचे वडील राज बाबू आमच्या घरी आले होते. सूरज बडजात्या यांनी मला सिनेमाची कथा ऐकवली. मी त्यांना म्हणाले, “थँक्यू…खूप छान गोष्ट आहे. मला खरंच सध्या सिनेमा करायचा नाहीये. पण, जर यामध्ये ही एक गोष्ट असती तर मी कदाचित या सिनेमाला होकार दिला असता.”
यावर सूरज बडजात्या भाग्यश्रीला म्हणाले होते, ‘ठिक आहे काहीच हरकत नाही’. चित्रपट करायचा नव्हता म्हणून सुरुवातीला भाग्यश्रीने अनेक कारणं दिली होती. शिक्षण पूर्ण करायचंय, विशिष्ट प्रकारचे कपडे घालणार नाही. पण, सूरज बडजात्या यांनी अभिनेत्रीच्या सगळ्या अटी मान्य केल्या होत्या. अभिनेत्री पुढे म्हणाली, “घरी येऊन गेल्यावर १० वगैरे दिवसांनी मला पुन्हा फोन आला…ते म्हणाले, तुम्ही जे सांगितलं होतं की हा असा बदल हवा आहे, ते मी स्क्रिप्टमध्ये बदललं आहे.”
“जवळपास ७ वेळा मी त्यांना असे बदल सांगितले आणि शेवटी सातव्या वेळी मला वाटलं, सूरजची माणूस म्हणून इतके चांगले आहेत…आपल्याला गोष्ट नीट ऐकवली, मी सांगितल्याप्रमाणे त्यांनी बदलही केले तर मी यांना नकार कसा देऊ?” अशाप्रकारे भाग्यश्रीने सिनेमासाठी अखेर होकार दिल्याचं सांगितलं.
‘मैंने प्यार किया’ हा सिनेमा एवढ्या मोठ्या प्रमाणात सुपरहिट झाला हे भाग्यश्रीच्या केव्हा लक्षात आलं याबाबत अभिनेत्री जुन्या एका मुलाखतीत म्हणाली होती, “त्यावेळी पोस्टमन आमच्या घरी यायचा. आम्ही पहिल्या मजल्यावर राहायचो आणि आमच्या जिन्यांच्या प्रत्येक पायरीवर पत्रांच्या गोण्या भरलेल्या असायच्या. हाच तो क्षण होता जेव्हा माझ्या लक्षात आलं की, प्रेक्षक या चित्रपटाशी आणि माझ्या सुमन या पात्राशी किती खोलवर जोडले गेले आहेत.”
