Bhagyashree wedding mehndi Secret : मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्रीने ‘मैंने प्यार किया’मधून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आणि पहिल्याच सिनेमातून ती घराघरांत पोहोचली. निरागस चेहरा, प्रभावी अभिनय आणि सोज्वळ अंदाज यामुळे तिला प्रचंड ओळख मिळाली. पहिल्याच सिनेमानंतर तिने लगेचच हिमालय दासानी यांच्याशी लग्न केले. भाग्यश्री ही तिच्या लग्नामुळे त्यावेळेस प्रचंड चर्चेत आली होती. आता भाग्यश्रीने तिच्या लग्नाच्या आठवणी सांगितल्या असून वर्षभर तिने हातावरची मेंदी जाऊ दिली नसल्याचे सांगितले.
हॉटरफ्लाय दिलेल्या मुलाखतीमध्ये भाग्यश्रीने तिच्या लग्नाच्या काळातील किस्सा शेअर केला आहे. भाग्यश्री म्हणाली, “मी माझ्या सासूबाईंना सांगितले होते की, लग्नामध्ये नेसण्यासाठी साडी ही तुम्ही तुमच्या पद्धतीने घ्या आणि मी ती नेसेन. माझी फक्त इच्छा आहे की माझ्या हातावर मेंदी असली पाहिजे.”
भाग्यश्रीने लग्नानंतर वर्षभर जाऊ दिली नाही हातावरची मेंदी
पुढे ती म्हणाली, “लग्नानंतर एक वर्ष मी माझ्या हातावरची मेंदी उतरू दिली नाही. जर मेंदीचा रंग कमी होत गेला, तर मी लगेच मेंदी काढणाऱ्यांना बोलावून मेंदी काढून घेत असे. तसेच जर मेंदीवाली नसेल तर मी स्वतः मेंदीची वाटी घेऊन बसत असे आणि टूथपिकने स्वतःच्या हातावर मेंदी काढत असे, त्यामुळे लग्नानंतर एक वर्षभर माझ्या हातावरची मेंदी उतरली नाही.”

१९८९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मैंने प्यार किया’ सिनेमामुळे सलमान खानबरोबर स्क्रीन शेअर केलेली भाग्यश्री प्रचंड चर्चेत आली होती. तिने १९९० मध्ये हिमालय दासानी यांच्याशी विवाह केला. भाग्यश्री आणि हिमालय यांची ओळख शाळेपासून होती आणि पुढे त्यांच्या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. भाग्यश्री ही सांगलीच्या पटवर्धन राजघराण्यातील मुलगी असल्याने भाग्यश्रीच्या लग्नाला तिच्या घरच्यांचा विरोध होता. भाग्यश्रीच्या लग्नाला तिच्या कुटुंबातील कोणीही उपस्थित नव्हते. आता भाग्यश्रीला अभिमन्यू दासानी आणि अवंतिका दासानी अशी दोन अपत्य आहेत.


दरम्यान, भाग्यश्री पुन्हा एकदा सिनेविश्वामध्ये सक्रिय झाली असून काही महिन्यांपूर्वीच तिने ‘राजा शिवाजी’ या सिनेमामध्ये राजमाता जिजाऊ यांची प्रभावी भूमिका साकारली होती. रितेश देशमुख यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमाने १०० कोटींहून अधिक रुपयांची कमाई केली होती. सोशल मीडियावरही सक्रिय असलेली भाग्यश्री तिच्या चाहत्यांबरोबर स्कीनकेअर, आहार आणि आरोग्याशी संबंधित टीप्स शेअर करत असते.
