‘मैंने प्यार किया’ फेम अभिनेत्री भाग्यश्री सलमान खानबरोबर पदार्पण करून लोकप्रिय झाली होती. भाग्यश्रीने इंडस्ट्री सोडून बालपणीच्या प्रियकराशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण तिच्या आई-वडिलांना हे नातं मान्य नव्हतं. त्यामुळे तिच्या लग्नात कुटुंबातील कोणीच आलं नव्हतं. मात्र, फक्त दोन जणांनी या कठीण काळात तिला साथ दिली. ते दोघे म्हणजे सलमान खान आणि दिग्दर्शक सूरज बडजात्या होय.
भाग्यश्रीने तिच्या लग्नाच्या निर्णयानंतर घडलेल्या गोष्टी सांगितल्या. हॉटरफ्लायशी बोलताना भाग्यश्री म्हणाली, “माझ्या आई-वडिलांनी मला म्हटलं की, जोपर्यंत तू खऱ्या जगाचा अनुभव घेत नाहीस, इतर मुलांना भेटत नाहीस तोपर्यंत लग्नासारखं मोठं पाऊल उचलणं शहाणपणाचं नाही. तू आता खूप लहान आहेस. मग आम्ही ब्रेकअप केलं. त्यावेळी माझ्या वडिलांनी मला सांगितलं की मी त्याच्याशी अशा प्रकारे नातं संपवावं, जेणेकरून तो माझा तिरस्कार करेल. मी हिमालयला म्हटलं की मला तुझं तोंडही पुन्हा बघायचं नाही. मला खूप त्रास झाला होता. त्याला मी हे का करतेय याचं कारणही माहित नव्हतं. मी त्याच्यावर खरंच खूप प्रेम करते हे मला माझ्या पालकांसमोर सिद्ध करायचं होतं.”
त्या रात्री मी खूप रडले होते – भाग्यश्री
भाग्यश्रीच्या आई-वडिलांनी हिमालयने पाठवलेली प्रेमपत्रे जाळली होती. “मी त्यांना म्हटलं, तुम्ही मला जन्म दिलाय, त्यामुळे तुमचा माझ्यावर हक्क आहे. तुम्ही सांगाल ते सर्व मी वर्षभर करेन. तुम्ही म्हणाल त्या व्यक्तीशी मी लग्न करेन. ते खूप कठीण होतं. त्यावेळी माझ्या पालकांनी आम्ही एकमेकांना लिहिलेली सर्व पत्रे जाळून टाकली. त्या रात्री मी खूप रडले. ते सगळं खूप त्रासदायक होतं,” असं भाग्यश्री म्हणाली.
मी आशीर्वाद घेतले अन् घर सोडून गेले – भाग्यश्री
शेवटी भाग्यश्री व हिमालयचं प्रेम जिंकलं. दोघांनी मंदिरात लग्न करायचं ठरवलं. “आमचं नातं आई-वडिलांच्या आशीर्वादाशिवाय पुढे जावं, अशी आमची कधीच इच्छा नव्हती. पण, माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. मी त्यांचे आशीर्वाद मागितले, पण त्यांनी दिले नाहीत. मी त्यांच्या पाया पडले आणि घर सोडून गेले. त्यानंतर आमचं लग्न झालं. माझ्या मनात एक इच्छा होती की कधी तरी माझे आई-वडील येतील, पण तसं झालं नाही,” अशी आठवण भाग्यश्रीने सांगितली.
त्यांनी दार उघडलं नाही – भाग्यश्री
भाग्यश्रीने लग्नानंतरही आई-वडिलांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. ती त्यांना भेटली, पण त्यांनी घराचं दार उघडण्यासही नकार दिला. “लग्नानंतर मी आशीर्वाद घ्यायला घरी गेले, पण त्यांनी दार उघडलं नाही. काही वर्षांनी माझ्या मुलाचा जन्म झाला. मग त्यांनी हे नातं थोडं स्वीकारलं, त्यांनी अजूनही पूर्णपणे स्वीकारलेलं नाही, ती वेदना, ती खंत नेहमीच मनात राहील,” असं भाग्यश्रीने नमूद केलं.
सलमान खान व सूरज बडजात्यांनी दिली साथ
‘मैंने प्यार किया’चे दिग्दर्शक सूरज बडजात्या आणि सलमान खान यांनी त्या कठीण काळात भाग्यश्रीला खूप साथ दिली. “मंदिरातून आल्यानंतर आम्ही एक छोटासा स्वागत समारंभ ठेवला होता. सूरजजी, त्यांची पत्नी, सलमान, सगळेच तिथे होते. सलमान खूप काळजीत होता. तो मला सतत विचारत होता की मी ठीक आहे का किंवा मला त्याच्याकडून काही मदत हवी आहे का. ते तिथे उपस्थित राहिल्याने मला खूप चांगलं वाटलं होतं. सूरज सरा तर माझ्या आई-वडिलांशी बोलून आमच्यातील दुरावा मिटवण्याचा प्रयत्न करायला तयार होते,” असं भाग्यश्री म्हणाली.
“माझ्या लग्नात माझ्या कुटुंबातलं कोणीही नव्हतं, पण सलमान पूर्ण वेळ तिथे होता. तो सर्वात शेवटी गेला होता. मला वाटलं नव्हतं तो इतका वेळ थांबेल. खरं तर तो खूप खोडकर होता, पण तो खूप प्रेमळही होता,” असं भाग्यश्री म्हणाली.
लग्नानंतर भाग्यश्रीने इंडस्ट्री सोडली
भाग्यश्रीने १९८९ मध्ये हिमालय दसानीशी लग्न केलं. त्यांना मुलगा अभिमन्यू आणि मुलगी अवंतिका दोन अपत्ये आहेत. लग्नानंतर भाग्यश्रीने चित्रपटसृष्टी सोडली असली तरी, गेल्या काही वर्षांत ती पुन्हा इंडस्ट्रीत परतली आहे. ती आता रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या चित्रपटात दिसणार आहे. तिची दोन्ही मुलं अभिमन्यू आणि अवंतिका, हे अभिनयक्षेत्रात आहेत.

