Bhagyashree Perimenopause Struggle: सलमान खानबरोबर स्क्रीन शेअर करत बॉलीवूड गाजवणारी अभिनेत्री भाग्यश्री ही पुन्हा एकदा सिनेविश्वामध्ये सक्रिय झाली असून सोशल मीडियावर ती तिचे अनुभव शेअर करत असते. आता भाग्यश्रीने मासिक माळी थांबताना ‘मेनोपॉज’च्या आधीचा टप्पा ‘पेरिमेनोपॉज’ काळातील अनुभव सांगितले आहेत. वयाच्या ४० नंतर महिलांच्या शरीरामध्ये होणारे बदल आणि त्यामुळे मूड स्विंग्स व झोपेचा त्रास होऊ शकतो याबद्दल सांगितले. भाग्यश्रीनेही या टप्प्यातून जाताना तिला स्वतःला झालेला त्रास यावर भाष्य केले आहे.
पेरिमेनोपॉज काळात शरीरात होणाऱ्या बदलांबद्दल भाग्यश्री म्हणाली, “या काळात मला खूप वेळा माझ्याच भावनांवर नियंत्रण मिळवणं अवघड झालं होतं. अशा वेळी मी सारखी अंघोळ करत होते. त्या काळात मी दिवसातून ४-५ वेळा शॉवर घेतला असेल. मला खूप रडू आलं तरी मी जाऊन अंघोळ करायचे.”
पेरिमेनोपॉजवेळी शॉवर खाली बसून रडले – भाग्यश्री
पुढे भाग्यश्री म्हणाली, “माझा पाण्याच्या शक्तीवर खूप विश्वास आहे, त्यामुळे रडावेसे वाटले की अंघोळीला जायचे. पेरिमेनोपॉजवेळी मी शॉवर खाली बसून खूप वेळा रडले. जेव्हा पण मला वाटायचे की आता मला खूप रडू येतेय, तेव्हा मी शॉवर घेत होते. त्या पाण्याबरोबर माझ्यातील नकारात्मक ऊर्जा आणि माझी दुःखसुद्धा वाहून जात होती.”
पुढे भाग्यश्रीने याचा आरोग्यावर खूप परिणाम झाल्याचे सांगितले. ती म्हणाली, “या काळात तिला मूड स्विंग्स आणि हॉट फ्लॅशेसचा खूप त्रास झाला. त्याचबरोबर अचानक काही गोष्टी विसरणे, लक्षात न राहणे, खोलीत ज्या कामासाठी गेले तेच विसरून जाणे, बोलताना ‘माइंड फॉग’ जाणवणं असे अनुभवही मला आले आहेत. तसेच रात्रीच्या वेळी येणाऱ्या घामाचाही मला खूप त्रास झाला. कपडे आणि बेडशीट हे सगळे पूर्णपणे भिजून जात होते, त्यामुळे माझी झोपही पूर्ण होत नव्हती. यामुळे मी झोपताना जास्तीचा नाईटसूट, बेडशीट आणि गरज असल्यास टाल्कम पावडर जवळ ठेवत होते.”
या काळामध्ये आरोग्यावर आणि आहारावर जास्त लक्ष दिल्याचे तिने सांगितले. भाग्यश्री म्हणाली, “मला होणाऱ्या त्रासाचा माझ्या रोजच्या आयुष्यावर परिणाम होऊ लागल्यामुळे मी व्यायामावर लक्ष देण्यास सुरुवात केली. डाळिंबाचा रस, हिबिस्कस चहा, कडधान्ये आणि भरपूर फायबर असलेले जेवण जेवू लागले. तसेच सकाळी लवकर उठून कोवळ्या उन्हात फिरू लागले आणि ध्यानधारणा, योगा हे सर्व करत होते.”
दरम्यान, भाग्यश्री ही नुकतीच रितेश देशमुख यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘राजा शिवाजी’ सिनेमामध्ये झळकली होती. यामध्ये तिने राजमाता जिजाऊंचे पात्र प्रभावीपणे साकारले होते.
