Bhagyashree Honorarium in maine pyaar kiya : सलमान खान आणि भाग्यश्री यांचा सुपरहिट मैंने प्यार किया हा चित्रपट आजही प्रेक्षक विसरलेले नाहीत. चित्रपटातील प्रत्येक गाणे आणि संवाद प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. भाग्यश्रीच्या पदार्पणातील या चित्रपटाने तिला लोकप्रियता तर दिलीच; पण त्याचरोबर सलमान खानलादेखील स्टार बनवले. सूरज बडजात्या यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटातील दोन्ही कलाकारांची ही जोडी हिट ठरली. मात्र, त्यामध्ये सलमानपेक्षा अधिक मानधन भाग्यश्रीने घेतल्याची माहिती समोर आली आहे.

सिनेविश्वामध्ये असलेल्या पुरुषसत्ताक पद्धतीवरून अनेकदा वाद-विवाद होत असतात. अनेकदा चित्रपटातील अभिनेत्यांना अभिनेत्रींपेक्षा अधिक मानधन दिले जाते. दोन्ही कलाकारांची मेहनत समान असली तरीदेखील भेदभाव करून अभिनेत्याला अधिक मानधन दिले जाते; तर अभिनेत्रींना तडजोड करण्यास भाग पाडले जाते. मात्र, सिनेविश्वातील ही परंपरा मोडीत काढत पदार्पणावेळी भाग्यश्रीने अधिक मानधनाची मागणी केली होती.

सलमान खानपेक्षा भाग्यश्रीला अधिक मानधन

१९८९ साली आलेल्या मैंने प्यार किया या चित्रपटासाठी भाग्यश्रीने सलमान खानपेक्षा अधिक पैसे घेतल्याचे समोर आले. तसेच निर्मात्यांनीदेखील ते दिले. त्याबाबत भाग्यश्रीने तिचे मत मांडले असून, योग्य मानधन मागण्यास काहीही हरकत नसल्याचे म्हटले.

निर्मात्यांचा कलाकारांबाबत व्यावसायिक दृष्टीकोन

झूमला दिलेल्या मुलाखतीमध्ये अभिनेत्री भाग्यश्रीने कलाकारांना मिळालेले मानधन यावर मत मांडले. ती म्हणाली की, एखाद्या कलाकाराचे मानधन हे बऱ्याचदा ‘मागणी आणि पुरवठा’ या मूलभूत आर्थिक तत्त्वांवर अवलंबून असते. निर्माते कलाकारांची निवड करताना ‘केवळ व्यावसायिक दृष्टिकोन’ ठेवतात; एखाद्या प्रकल्पात कलाकार किती महत्त्वाचा आणि आणि त्यानं स्वतःसाठी किती मानधनाची मागणी केली आहे, यावरून कलाकाराची निवड केली जाते. एखादा कलाकार कमी पैशांमध्ये तेच काम तितक्याच क्षमतेनं करणार असेल तर निर्माते अशा कलाकारांचा विचार करतात, आणि आधी निवड केलेल्या कलाकारांना काढून टाकण्यास अजिबात संकोच करत नाही. हा त्यांचा व्यावसायिक दृष्टिकोन असतो, असे मत अभिनेत्री भाग्यश्रीने व्यक्त केले.’

चित्रपटसृष्टी हे अत्यंत अस्थिर मार्केट – भाग्यश्री

पुढे ती म्हणाली की, अशा वेळी अभिनेत्रीने योग्य निर्णय घ्यायचा असतो. आपल्याकडे काम करण्यासाठी आलेली संधी सोडून द्यायची आणि दुसऱ्या कोणाला तरी ती संधी घेऊ द्यायची, अशी तुमच्या मनाची तयारी आहे का याचा अभिनेत्रींनी विचार करावा. जोपर्यंत सर्व स्त्रिया एकत्र येऊन, “आम्हाला इतकंच मानधन मिळायला हवं,” असं ठामपणे सांगत नाहीत, तोपर्यंत हे घडणार नाही, असेदेखील मत भाग्यश्रीने व्यक्त केले. मनोरंजन क्षेत्राचा डोलारा हा सतत चालणाऱ्या वाटाघाटी आणि तडजोडींवरच उभा राहिलेला आहे. काम करण्याची इच्छा असणारे अनेक जण कमी मानधनामध्ये जास्त तास काम करण्यास तयार असतात. त्यामुळे हे अत्यंत अस्थिर मार्केट आहे, असे स्पष्ट मत अभिनेत्री भाग्यश्रीने व्यक्त केले.