Bhagyashree shares recipe of Tilgul: मकर संक्रांतीचा सण जवळ आला आहे. सण-उत्सव हे मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. परंपरा आणि ऋतू यांप्रमाणे हे सण-उत्सव साजरे केले जातात. संपूर्ण देशभरात उत्सव साजरे केले जात असताना विविध ठिकाणच्या रीत-परंपराप्रमाणे त्यामध्ये काही बदल पाहायला मिळतात. असे असले तरी काही गोष्टी मात्र सारख्याच असल्याचे पाहायला मिळते.

मकर संक्रांतीच्या सणाला तीळ व गूळ यांच्या संमिश्रणाचे पदार्थ प्रामुख्याने खाल्ले जातात. काही ठिकाणी तीळ आणि गुळाचा वापर करून छान पदार्थ बनवले जातात. तीळ व गुळाची पोळी, लाडू, वड्या असे अनेकविध पदार्थ बनवले जातात. अनेक जण सोशल मीडियाच्या माध्यमातून हे पदार्थ कसे बनवायचे, याच्या रेसिपी सांगतात.

आता लोकप्रिय अभिनेत्री भाग्यश्रीनेदेखील संक्रांतीच्या निमित्ताने एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओमध्ये भाग्यश्रीने काळ्या रंगाची सुंदर साडी नेसली असल्याचे पाहायला मिळाले आहे. तसेच तिने दागिनेही घातले आहेत.

Award Banner

“तिळगुळ घ्या आणि…”

व्हिडीओच्या सुरुवातीला ती म्हणते, “तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला.” पुढे तीळ व गुळाचे लाडू कसे करायचे, हे ती सांगते. भाग्यश्रीने व्हिडीओमध्ये दाखविल्यानुसार तीळ व गुळाचे लाडू बनवण्यासाठी चार महत्त्वाच्या गोष्टी लागतात. त्या म्हणजे तीळ, गूळ, तूप आणि बारीक केलेले किंवा कापलेले बदाम लागतात.

या रेसिपीनुसार प्रथम तीळ भाजून घ्यायचे, त्यामध्ये कापलेल्या बदामाचे तुकडे टाकायचे. त्यानंतर त्यामध्ये बारीक किसलेला गूळ टाकायचा आणि हे सर्व मिश्रण भाजून घ्यायचे. त्यानंतर हे सर्व मिश्रण दुसऱ्या भांड्यात काढायचे. त्यामध्ये थोडेसे तूप टाकायचे आणि त्यानंतर त्याचे लाडू बनवायचे. भाग्यश्रीने ही रेसिपी सांगताना लाडू बनवून दाखवले आहेत. तसेच ती म्हणते की, शब्दांच्या गोडव्याने नाती जपूया, नववर्षात आपल्या माणसांमध्ये प्रेम वाढवूया. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा.”

हा व्हिडीओ शेअर करताना तिने लिहिले, “घरी स्वादिष्ट तिळगुळ बनवण्याचा हा एक सोपा मार्ग आहे. त्यामध्ये लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम व फायबरचे प्रमाण जास्त प्रमाणात असते. हिवाळ्यात तुमच्या शरीराला त्याची गरज आहे. मकर संक्रांतीच्या शुभेच्छा! तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला.”

दरम्यान, भाग्यश्री असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करीत असते. ती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. अभिनेत्रीचा चाहतावर्गही मोठा आहे.