Bhagyashree On Summer Fitness Tips: ऋतु बदलाप्रमाणे आपल्या शरीराला विविध घटकांची गरज असते. त्यामुळे विविध ऋतुमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा आहार घेतला जातो. आहारात तसा बदल करणे महत्वाचे असते. आता उन्हाळ्याला सुरुवात झाली.

उन्हाळ्यात घामामुळे शरीरातील पाणी कमी(Dehydration) होते. तसेच, उष्माघात, घामोळे, सनबर्न, डोकेदुखी किंवा पोटाच्या समस्यादेखील होतात, त्यासाठी आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे असते.

आता लोकप्रिय अभिनेत्री भाग्यश्रीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये उन्हाळ्यात स्वत:ची काळजी कशी घ्यायची हे सांगितले. तसेच, पाणी पिणे तर गरजेचे आहे, पण त्याबरोबर कोणती गोष्ट महत्वाची आहे, हे तिने व्हिडीओमध्ये सांगितले.

Award Banner

उन्हाळ्यात फक्त पाणी पिऊ नका, तर…

व्हिडीओच्या सुरुवातीला पाहायला मिळते की, भाग्यश्री पाणी पित आहे. ती म्हणते, “फक्त पाणी पिऊन चालणार नाही. पाणी प्यायल्यानंतर शरीर हायड्रेटेड राहते. त्यामुळे पाणी पिणे गरजेचे आहे. पण, जेव्हा तुम्हाला खूप उकडत असेल किंवा खूप जास्त प्रमाणात घाम येत असेल, अशा वेळी फक्त पाणी पिऊन चालणार नाही. “

पुढे ती म्हणाली, “फक्त पाणी प्यायले तरी तुम्हाला शरीरात पाण्याची कमतरता जाणवेल. याचे कारण म्हणजे, तुमच्या शरीरातील इलोक्ट्रोलाईट म्हणजेच सोडियम, पोटॅशिअम, क्लोराईड कमी झाले आहेत. तुमच्या शरारीतील पेशींना पाणी शोषून घेण्यासाठी सोडियमची मदत होते. तसेच, क्लोराईड तुमच्या शरीरात पाणी योग्य प्रमाणात ठेवण्यासाठी मदत करते. कारण- जर पेशींमध्ये प्रमाणापेक्षा जास्त पाणी झाले, तर त्यामुळे नुकसान होऊ शकते.”

भाग्यश्री असेही म्हणाली, “उकाड्यामुळे जेव्हा तुम्हाला चक्कर येते, त्यावेळी तुमच्या शरीरात कॅल्शिअम व पोटॅशिअमची कमतरता असते. इलोक्ट्रोलाईट्स पाण्यात विरघळतात.त्यामुळे व्यायामानंतर फक्त पाणी पिऊन चालणार नाही. नारळाचे पाणी, लिंबू पाणी किंवा इलेक्ट्रोलाईट्स मिसळून पाणी प्यायले पाहिजे. इलेक्ट्रोलाईट्सचे पॉकेट्स बाजारात मिळतात. तुम्ही तुमच्या डॉक्टरांना विचारून ते तुमच्याजवळ ठेवा. ते तुमच्या उपयोगी पडतील.”

हा व्हिडीओ शेअर करताना तिने लिहिले, “होळी नंतर उष्णता वाढते. त्यामुळे फक्त पाणी नाही तर शरीराला आवश्यक क्षार(electrolytes) असलेले पाणी पिणे महत्त्वाचे आहे.”

अभिनेत्रीच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या. एकाने लिहिले, “या खूप महत्वाच्या टीप्स आहेत”, दुसऱ्या एकाने लिहिले, “उन्हाळ्यात इलेक्ट्रोलाईट पाऊडर महत्वाची असते”, “मला तुमचे सगळे व्हिडीओ आवडतात”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत.

भाग्यश्री सोशल मीडियावर सक्रिय असते. ती चाहत्यांना दैनंदीन आयुष्य सोपे व्हावे यासाठी अनेक टीप्स देते. अनेक पदार्थांच्या रेसिपीदेखील सांगते. तसेच, आरोग्य निरोगी राहावे यासाठीहीदेखील छोट्या-छोट्या टिप्स देते.

दरम्यान, भाग्यश्री लवकरच रितेश देशमुखच्या राजा शिवाजी या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.