Bharat Bhhagya Viddhaata trailer released: २६/११ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या मन हेलावून टाकणाऱ्या सत्य घटनांवर आधारित ‘भारत भाग्य विधाता’ चित्रपट सध्या चर्चेत आला आहे. मुंबईतील कामा रुग्णालयातील धाडसी नर्स आणि कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून शेकडो रुग्णांचे प्राण वाचवले होते, याच सत्य घटनेवर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘भारत भाग्य विधाता’ चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला असून त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

यामध्ये अभिनेत्री कंगना रणौत यांनी प्रमुख भूमिकेत दमदार अभिनय साकारला आहे. विशेष म्हणजे या ट्रेलरमध्ये मराठमोळ्या अभिनेत्रींच्या प्रभावी अभिनयाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. मराठी कलाकारांनी बॉलीवूडमध्ये पुन्हा एकदा आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे.

‘भारत भाग्य विधाता’ चित्रपटाचा थरारक ट्रेलर रिलीज

‘भारत भाग्य विधाता’ चित्रपटामध्ये अनेक मराठी कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. कंगना रणौत यांच्यासह गिरिजा ओक व स्मिता तांबे यांनी स्क्रीन शेअर करत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. चित्रपटाच्या पोस्टरमध्येदेखील दोन्ही मराठमोळ्या अभिनेत्री झळकत आहेत. अंगावर शहारा आणणारा ‘भारत भाग्य विधाता’ चित्रपटाचा थरारक ट्रेलर रिलीज झाला आहे. अवघ्या अडीच मिनिटांच्या या ट्रेलरने प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता निर्माण केली आहे. सामान्य कुटुंबातील या नर्स दहशतवादी हल्ला झाल्यानंतर असामान्य कार्य करून दाखवतात. कामा रुग्णालयातील डॉक्टर, नर्स तसेच इतर कर्मचाऱ्यांचे शौर्य चित्रपटातून प्रभावीपणे मांडण्यात आले आहे.

‘भारत भाग्य विधाता’ चित्रपटामध्ये मराठी कलाकारांची मांदियाळी

मराठी चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या अनेक अभिनेत्रींनी ‘भारत भाग्य विधाता’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये प्रभावी अभिनय केला आहे. कंगना रणौत यांच्यासह गिरिजा ओक व स्मिता तांबे यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत. याचबरोबर मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्रिया बेर्डे या देखील चित्रपटामध्ये झळकणार आहेत. मराठी मालिका विश्व गाजवणाऱ्या अभिनेत्री आशा शेलार आणि सुहिता थट्टे यांनी ‘भारत भाग्य विधाता’ चित्रपटामध्ये भूमिका साकारली आहे. तसेच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’फेम अभिनेत्री ईशा डे आणि रसिका आगाशे अशा अनेक मराठी कलाकारांनी या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये अभिनयाची छाप उमटवली आहे. मुंबईतील दहशतवादी हल्ल्याचे प्रभावी चित्र मराठी कलाकारांनी स्क्रीनवर मांडले आहे.

‘भारत भाग्य विधाता’ चित्रपट कधी होणार रिलीज?

‘भारत भाग्य विधाता’ चित्रपट येत्या १२ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन मनोज तापडिया यांनी केले आहे, तर चित्रपटाची निर्मिती पेन स्टुडिओ अंतर्गत करण्यात आली असून यामध्ये कंगना रणौत यांची स्वतःची निर्मिती आहे. मणिकर्णिका फिल्म्स आणि परमहंस क्रिएशन्स यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. ‘भारत भाग्य विधाता’ चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला असून यामुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.