Bheja Fry Cast Salary: २००७ ला प्रदर्शित झालेल्या एका सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला होता. ‘भेजा फ्राय’ असे या सिनेमाचे नाव होते. या चित्रपटाची चांगलीच चर्चा झाली होती.

सिनेमाला सुरुवातीला तितका प्रतिसाद मिळाला नाही, मात्र त्यानंतर पुढे सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. सिनेमाने बजेटच्या दहापट कमाई केली होती, मात्र चित्रपटाला इतके यश मिळाल्यानंतरही कलाकारांना मात्र कमी मानधन मिळाले होते. या सिनेमात रजत कपूर व विनय पाठक प्रमुख भूमिकेत दिसले होते.

सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत रजत कपूर, विनय पाठक आणि रणवीर शौरी यांनी कलाकारांच्या आयुष्याबद्दल आणि आजच्या पीआरच्या वाढत्या प्रभावाबद्दल वक्तव्य केले.

“फक्त २५,००० रुपये…”

आजकाल अनेक कलाकार पीआर कन्सल्टंट ठेवतात, पण तुम्ही का ठेवत नाही? असे विचारल्यावर विनय पाठक म्हणाले, “आमच्याकडे त्यासाठी पैसे नाहीत.”

मुलाखतीत ‘भेजा फ्राय’ सिनेमाबद्दलही कलाकारांनी वक्तव्य केले. रजत कपूर म्हणाले, “त्या चित्रपटासाठी कुणालाही फार पैसे मिळाले नाहीत. आम्हा सगळ्यांना फक्त २५,००० रुपये मानधन मिळाले. आम्ही त्या पैशांत २२ ते २३ दिवस शूटिंग केले होते.आम्ही हा चित्रपट पैशासाठी केला नव्हता. चित्रपट अतिशय कमी बजेटमध्ये बनवण्यात आला होता.”

यावर विनय पाठक म्हणाले, “आम्ही हा सिनेमा पैशासाठी केला नव्हता, म्हणूनच आम्ही तसा चित्रपट बनवू शकलो. आमची प्रतिमा आमच्या चित्रपटांमुळे निर्माण होते, त्यामुळे आम्ही पीआर किंवा इमेज कन्सल्टंट नाहीत.”

ट्रेड रिपोर्ट्सनुसार, ‘भेजा फ्राय’ सुमारे १.५ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनला होता. सिनेमाने जगभरात ११.८१ कोटी रुपयांची कमाई केली, तर भारतात ८.७५ कोटी रुपयांची कमाई झाली. त्यानंतर २०११ मध्ये ‘भेजा फ्राय २’ हा सिक्वेलही आला. यामध्ये विनय पाठकबरोबर मिनिषा लांबा आणि के. के. मेनन हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. ‘भेजा फ्राय २’ने जवळजवळ ९ कोटी बजेटवर १७ कोटी रुपयांची कमाई केली होती.

‘भेजा फ्राय’ सिनेमाला १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर रजत कपूर एका मुलाखतीत म्हणालेले, “शूटिंगचा अनुभव खूपच छान होता. कमी बजेट असल्यामुळे आम्ही २० दिवसांत शूट पूर्ण केलं. या सिनेमाचं शूटिंग करणं थोडं धावपळीचं होतं, पण खूप मजा आली. सेटवर सगळ्यांमध्ये खूप चांगली मैत्री होती.”

रजत कपूर असेही म्हणालेले की, चित्रपट इतका यशस्वी होईल अशी टीमला अजिबात अपेक्षा नव्हती. थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर चित्रपटाला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आणि हो, या चित्रपटाने खूप पैसा कमावला.