Bhoot Bangla Box Office Collection Day 13: अक्षय कुमारच्या ‘भूत बंगला’ या सिनेमाची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे.या हॉरर-कॉमेडी सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. अक्षय कुमारसह या सिनेमात तब्बू, राजपाल यादव, परेश रावल, वामिका गब्बी, मिथिला पालकर, असरानी असे लोकप्रिय कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. सिनेमाला पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद आहे. आता या सिनेमाने किती कमाई केली आहे, हे जाणून घेऊ…
‘भूत बंगला’ सिनेमाला प्रदर्शित होऊन तेरा दिवस पूर्ण झाले आहेत. तेराव्या दिवशी सिनेमाने भारतात ३. २५ कोटींची कमाई केली आहे. सॅल्कनिकनुसार, सिनेमाने भारतात एकूण १२४. २५ कोटींची कमाई केली आहे. संपूर्ण जगभरात सिनेमाची १९९.३८ कोटी इतकी कमाई झाली आहे.
अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असलेले अनेक चित्रपटांना प्रेक्षकांना प्रतिसाद मिळाला नाही. यामध्ये जॉली एलएलबी ३, केसरी चाप्टर २, स्काय फोर्स अशा चित्रपटांनी कमी कमाई केली होती.
‘केसरी चाप्टर २’ या सिनेमाने ११०.७६ कोटींची कमाई केली होती. जॉली एलएलबी ३ या सिनेमाने १४०. १४ कोटींची कमाई केली होती. तर स्काय फोर्सने १३५. ५१ कोटींची कमाई केली होती. त्यामुळे भूत बंगलाची कमाई या सिनेमांहून अधिक आहे.
असे असले तरी हाऊसफुल ५ सिनेमाची कमाई भूत बंगला सिनेमाच्या कमाईपेक्षा जास्त असल्याचे पाहायला मिळते. या सिनेमाने भारतात २१८. ४२ कोटींची कमाई केली होती. याबरोबरच, भारतात १६१.०९ कोटी कमाई केलेल्या थम्मा, २१६.५० कोटींची कमाई केलेल्या भूल भुलैय्या, ३११.३५ कोटींची कमाई केलेल्या भूल भुलैय्या ३ या सिनेमांहून भूत बंगलाची कमाई कमी असल्याचे दिसते.
प्रदर्शित झाल्यानंतर भूत बंगला सिनेमाला रणवीर सिंहच्या धुरंधर २ या सिनेमाबरोबर स्पर्धा करावी लागली. धुरंधर २ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या सिनेमाने आतापर्यंत १७८०.७६ कोटींची कमाई केली आहे. आता या आठवड्यात प्रदर्शित होणाऱ्या एक दिन, राजा शिवाजी या चित्रपटांशी स्पर्धा करावी लागणार आहे. आता आगामी काळात भूत बंगला सिनेमा आणखी किती कमाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, भूत बंगला सिनेमाचे दिग्दर्शन प्रियदर्शन यांनी केले आहे. तर या सिनेमाच्या निमित्ताने जवळजवळ २५ वर्षांनी तब्बू व अक्षय कुमार यांनी एकत्र काम केले आहे.
