Bhumi Pednekar Business : इंडस्ट्रीत असे अनेक कलाकार आहेत जे अभिनयाव्यतिरिक्त वेगळ्या क्षेत्रातही व्यवसाय करत असतात. काही हॉटेलचे मालक आहेत, काहींचा कपड्यांचा ब्रँड आहे. यापैकीच एक म्हणजे बॉलीवूडमधील मराठमोळा चेहरा भूमी पेडणेकर. भूमीसुद्धा स्वत:चा व्यवसाय करत आहे.
भूमी पेडणेकर बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिनं आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये आणि वेब सीरिजमध्ये काम केलं आहे. सध्या अभिनेत्री तिच्या व्यवसायामुळे चर्चेत आहे. २०२५ मध्येच अभिनेत्रीनं हा व्यवसाय सुरू केलेला. भूमी पेडणेकरचा व्यवसाय नेमका कोणता आहे आणि ती का चर्चेत आहे, याबद्दल जाणून घेऊयात…
नवीन व्यवसायाबद्दल भूमी काय म्हणाली?
भूमीनं २०२५ मध्ये तिचा ब्रँड बॅकबे सुरू केला होता. ती प्रीमियम वॉटरची विक्री करते. परंतु, यासाठी तिला खूप ट्रोल करण्यात आलेलं. ५००मि.ली इतकं पाणी ती जवळपास १५० रुपयांना विकत होती आणि ७५० मि.ली जवळपास २०० रुपयांना. अशातच आता मुलाखतीत तिनं सुरू केलेल्या पाण्याच्या व्यवसायाचं रूपांतर तिनं आता पेय पदार्थांमध्ये केल्याची माहिती दिली आहे. येत्या काळात लवकरच ती स्पार्कलिंग वॉटरसुद्धा लाँच करणार आहे. यावेळी तिनं तिचा ब्रँड महागडा असला तरी इतर ब्रँडसुद्धा त्या किमतीत विक्री करत असल्याचं म्हटलं आहे.
जय मदनशी संवाद साधताना भूमी म्हणाली, “आम्ही नैतिकदृष्ट्या ही कंपनी चालवत आहोत. आम्ही जे काही विकत आहोत ते सगळं चांगल्या दर्जाचंच असणार याची काळजी घेतो आणि आम्हाला मजा येत आहे.” भूमी पुढे म्हणाली, “आम्ही आता वॉटर ब्रँड चालवत नाहीये तर आता पेय पदार्थांचा ब्रँड सुरू केला आहे. आम्हाला एक चांगला ब्रँड तयार करायचा आहे.”
आपला ब्रँड “महाग” उत्पादनं विकत असल्याची कबुली देत ती म्हणाली, “हो, माझं पाणी महाग आहे यात काही शंका नाही. पण, मी ज्या श्रेणीत आहे, म्हणजेच प्रीमियम वॉटर कॅटेगरीत… त्याच श्रेणीतील जुन्या परंपरागत मोठे ब्रँड्स ज्यांच्याशी मी स्पर्धा करू शकत नाही असं मला सांगितलं जात होतं. त्यांचं पाणी माझ्यापेक्षा खूपच महाग आहे. भारतात आपण अनेक आंतरराष्ट्रीय ब्रँड्सची पेयं पितो आणि त्यासाठी तुम्ही ४००-५०० रुपये मोजता.”
भूमीने सांगितले की, सुरुवातीपासूनच तिला हे स्पष्ट होते की हा प्रोडक्ट प्रीमियम आहे आणि मोठ्या प्रमाणावरच्या (मास) बाजारासाठी नाही. तसंच ती म्हणाली की, मास मार्केटमध्ये प्रवेश करताना ती अजून एक ब्रँड लाँच करेल. ती म्हणाली, “एक उद्योजक म्हणून तुम्हाला तुम्ही कोणत्या श्रेणीत काम करता याची स्पष्टता असणं गरजेचं आहे. मला पूर्णपणे स्पष्ट आहे की मी प्रीमियम कॅटेगरीत आहे. जेव्हा मला मास मार्केटमध्ये यायचं असेल, तेव्हा मी बॅकबेसाठी सिस्टर ब्रँड घेऊन येईन.”
सध्या बॅकबेच्या वेबसाइटवर ५०० मि.ली. (१२ बाटल्यांचा पॅक) १,५५६ रुपयांना विकला जात आहे, म्हणजे प्रति बाटली सुमारे १२९.६ रुपये. तर ७५० मि.ली. (१२ बाटल्यांचा पॅक) २,१११ रुपयांना उपलब्ध आहे, म्हणजे प्रति बाटली अंदाजे १७६ रुपये.
