Bhumi Pednekkar Talks About Her Late Father : अजय देवगण, रितेश देशमुख, कियारा अडवाणी बॉलीवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी काही कारणांमुळे त्यांच्या नावामध्ये बदल केला आहे. अशातच या यादीत भूमी पेडणेकरच्या नावाचाही समावेश झाला आहे. तिनं तिच्या नावामागे वडिलांचं नाव आता जोडण्याच्या निर्णयाबद्दल सांगितलं आहे.

भूमी पेडणेकर बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. सध्या ती ‘दलदल’ या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपू्र्वी तिनं अभिनयातून ब्रेक घेतल्याचं म्हटलेलं. त्यावेळीसुद्धा अभिनेत्री चर्चेत आलेली. अशातच आता तिनं याबद्दल सांगितलं आहे. ‘स्क्रीन’शी संवाद साधताना भूमीला “तू द रॉयल्सनंतर नुकतंच ‘दलदल’चं चित्रीकरण पूर्ण केलंस. तू अभिनयातून ब्रेक घेण्याबद्दल भाष्य केलेलं. आजवर तुझ्या कामाचं अनेकांनी कौतुक केलं आहे; पण तुझं याबद्दल काही दुमत होतं का?” असं विचारलं.

अभिनयातून ब्रेक घेण्याबद्दल भूमी पेडणेकरची प्रतिक्रिया

विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना ती म्हणाली, “नाही. मी केलेल्या कोणत्याही कामाबद्दल माझं दुमत नाही. मी जे केलंय, ते सगळं मला खूप आवडलंय. मला ‘द रॉयल्स’सुद्धा खूप आवडला. तो शो करताना मजा आली. मी ब्रेक घेतला. कारण- मला येत्या काळात अजून चांगलं काम करायचं आहे. मी आतापर्यंत २५ चित्रपट आणि काही शो केले आहेत. मला कलाकार म्हणून अजून चांगलं घडायचं आहे. काही गोष्टींवर काम करायचं आहे. काही गोष्टी मनासारख्या घडतात; काही घडत नाहीत आणि असं आयुष्यभर सुरूच राहणार आहे. त्यामुळे एक पाऊल मागे येणं महत्त्वाचं होतं. वर्कशॉप करणं, अभ्यास करणं, वाचन करणं, प्रवास करणं आणि माणसांच्या संपर्कात राहणं हे सगळं महत्त्वाचं होतं, ज्यापासून माझा संपर्क तुटला होता.”

वडिलांचं नाव लावण्याबद्दल काय म्हणाली भूमी?

भूमीला यावेळी पहिल्यांदाच तू तुझ्या नावामागे वडिलांचं नाव लावलं आहेस का, असं विचारल्यानंतर ती म्हणाली, “हो. मला माझ्या वडिलांचं नाव लावायचं होतं. कारण- मला ही वेळ योग्य वाटली. मी खूप दिवसांपासून हा विचार करत होते. हा नवीन सुरुवातीचा प्रवास आहे. सगळं नव्यानं सुरू करण्यासारखं आहे. माझ्या वडिलांबरोबर जे काही झालं, ते व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे फार वेळ नव्हता. तो वेळ मला गेल्या काही महिन्यांपूर्वी जेव्हा मी फिल्म सेटवर नव्हते तेव्हा मिळाला. ही खूप वैयक्तिक गोष्ट आहे.”

दरम्यान, भूमी पेडणेकरनं सोशल मीडियावरील आयडीवर तिच्या नावात बदल केला आहे. पूर्वी अभिनेत्री भूमी पेडणेकर, असं नाव लावायची. आता तिनं भूमी सतीश पेडणेकर, असा आयडी तयार केला आहे. तिनं पहिल्यांदाच तिच्या वडिलांचं नाव जोडलं आहे. भूमीचे वडील सतीश पेडणेकर माध्यमांच्या वृत्तानुसार राजकीय नेते होते. २०११ मध्ये त्यांचं निधन झालं. भूमीचं एक जुळी बहीण आणि आई, असं कुटुंब आहे.