Amitabh Bachchan Ayodhya Land deal : प्रभू रामांची जन्मभूमी असलेल्या अयोध्यामध्ये जमिनीच्या खरेदी विक्रीमध्ये वाढ झाली आहे. मंदिर निर्माण झाल्यामुळे पर्यटनासह रिअल इस्टेट व्यवसाय वाढीस आला असून जमीन खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. बॉलीवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांनीही अयोध्यामध्ये जमीन खरेदी केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, त्यांनी २.६७ एकर जमीन खरेदी केली आहे. अमिताभ बच्चन यांनी रामजन्मभूमी अयोध्यामध्ये जमीन विकत घेतल्याचे अनेकांना माहीत आहे; मात्र या जमिनीच्या व्यवहारासाठी अमिताभ यांनी चक्क मध्यरात्री ३ वाजता फोन केल्याचे समोर आले आहे. अमिताभ बच्चन यांनी स्वतः त्यांना रात्री उशिरा फोन करून अयोध्येत जमीन खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केल्याचे अभिनंदन लोढा यांनी सांगितले आहे.

अमिताभ बच्चन यांनी अभिनंदन लोढा यांच्याशी जमिनीचा व्यवहार केला होता आणि यासाठी त्यांनी स्वतः फोन करून जमीन खरेदी करायची असल्याचे सांगितले होते. ‘द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा’ (HoABL) चे संस्थापक अभिनंदन लोढा यांनी या व्यवहाराच्या आधी काय घडले याबद्दल एक रंजक किस्सा सांगितला. अमिताभ बच्चन यांच्यासारख्या दिग्गज कलाकाराने स्वतः फोन करून जमीन खरेदी करायची इच्छा व्यक्त करत किंमत विचारली होती. तसेच त्यांनी हा फोन चक्क रात्री ३ वाजता केला असल्याचा खुलासा अभिनंदन लोढा यांनी केला आहे.

अमिताभ बच्चन यांचा मध्यरात्री ३ वाजता फोन अन्

‘हिंदुस्तान टाइम्स इंडिया नेक्स्ट रिअल इस्टेट समिट २०२६’ मध्ये अभिनंदन लोढा यांनी अमिताभ बच्चन यांच्यासह व्यवहाराच्या आठवणी सांगितल्या आहेत. ते म्हणाले, “२०२३ मध्ये मी ऑस्ट्रेलियात होतो. पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास काही मिस्ड कॉल्स दिसून आले. यानंतर अमिताभ बच्चन यांचे काही आश्चर्यचकित करणारे मेसेज आले होते आणि त्यामधील नम्रता पाहून मी थक्क झालो होतो. अमिताभ बच्चन यांनी मेसेजमध्ये लिहिले होते, “मी अमिताभ बच्चन बोलतोय, तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा कृपया मला कॉल करा.” ते बघून मी घाईघाईने उठलो आणि लगेच अमिताभ बच्चन यांना फोन केला.”

अमिताभ बच्चन यांनी अयोध्येत खरेदी केली जमीन

पुढे लोढा म्हणाले, “बिग बी यांचा साधेपणा व नम्रता या गोष्टींनी मला सर्वात जास्त प्रभावित केले होते. फोनवर अमिताभ बच्चन म्हणाले होते, ‘अभिनंदनजी नमस्कार, मी उत्तर प्रदेशचा आहे आणि मला अयोध्येत जमीन विकत घ्यायची आहे.’ यावर मी त्यांना म्हणालो, तुमच्यासाठी काही तरी जमिनीची व्यवस्था नक्की करू. पुढे बच्चन साहेबांनी आधी जमिनीची किंमत विचारली. यावर त्यांना उत्तर दिले होते, ‘मी तुमच्याशी किमतीबद्दल कसे बोलू?’ ते म्हणाले, ‘त्यांना १५,००० चौरस फूट जमीन विकत घ्यायची आहे आणि मी त्यांना सांगितले होते की तेवढ्या जमिनीची किंमत अंदाजे १५ कोटी रुपये असेल.’ दुसऱ्याच दिवशी त्यांनी मला १५ कोटी रुपये पाठवले.”

३५ कोटी रुपयांना २.६७ एकर जमीन खरेदी

नवभारत मीडियाच्या रिपोर्टनुसार, अमिताभ बच्चन यांनी अयोध्येमध्ये २०२५ मध्ये अंदाजे ४० कोटी रुपयांना २५,००० चौरस फुटांची जमीन खरेदी केली होती. यानंतर २०२४ मध्ये त्यांनी ‘द शरयू’ प्रकल्पात अंदाजे १४.५ कोटी रुपयांना १०,००० चौरस फुटांचा भूखंड खरेदी केला. यानंतर मार्च २०२६ मध्ये अमिताभ बच्चन यांनी HoABL कडून अंदाजे ३५ कोटी रुपयांना २.६७ एकर जमीन खरेदी करून अयोध्येतील मालमत्तेचा विस्तार केला. ही अयोध्येतील त्यांची तिसरी आणि HoABL सोबतची चौथी गुंतवणूक होती. ही जमीन कंपनीच्या ‘द शरयू’ या ७५ एकरच्या प्रकल्पाजवळ आहे.