अभिनेत्री बिपाशा बासूने २००१ मध्ये ‘अजनबी’ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर ‘राज’सारखे हिट चित्रपट दिल्यानंतर २००३ मध्ये आलेल्या ‘जिस्म’ चित्रपटात तिने सोनियाची बोल्ड भूमिका साकारली. मात्र, ‘जिस्म’सारख्या थ्रिलरमध्ये काम करणं तिच्या करिअरसाठी मोठा धोका ठरेल, असा सल्ला तिला इंडस्ट्रीतील अनेकांनी दिला होता. बिपाशा आई झाल्यानंतर तब्बल सहा वर्षांनी कमबॅक करणार आहे. यानिमित्ताने तिने ‘जिस्म’नंतर करिअर संपेल, असा सल्ला तिला देण्यात आला होता, याबद्दल भाष्य केलं. याबरोबरच प्रेग्नन्सीनंतर वजन वाढल्यामुळे झालेल्या ट्रोलिंगवरही बिपाशाने मन मोकळं केलं.
Elle Indiaला दिलेल्या मुलाखतीत बिपाशाने ‘जिस्म’ चित्रपट निवडण्याबाबत सांगितलं, “इंडस्ट्रीतील प्रत्येकजण मला हा चित्रपट करू नकोस, असं सांगत होता. त्यांनी म्हटलं की, जर मी थोडासा इरोटिका (कामुक आशय) असलेला चित्रपट केला तर माझं करिअर संपेल. पण माझं म्हणणं होतं की मी मोठी आहे. ही प्रौढांसाठीची प्रेमकथा आहे. हा चित्रपट प्रौढांसाठी बनवण्यात आला आहे, मुलांसाठी नाही. मला या चित्रपटातील सोनियाच्या व्यक्तिरेखेचे विविध पैलू खूप आवडले आणि मला हा चित्रपट करायचाच आहे, हे तेव्हाच माहीत होतं.”
मात्र, बिपाशाच्या या व्यक्तिरेखेचा लूक पुढे आयकॉनिक ठरला समुद्रकिनारी पांढरे कपडे घालण्याचा ट्रेंड सुरू झाला. बिपाशाने सांगितलं, “अचानक वेव्हज, टँग्स, पांढरे कपडे आणि समुद्रकिनारा या सगळ्याच गोष्टी मोठ्या प्रमाणात ट्रेंड होऊ लागल्या. हा लूक पूर्णपणे बदलला आणि लोकांनी बोल्डनेस स्वीकारायला सुरुवात केली. त्यामुळे मला वाटतं की, इंडस्ट्रीमध्ये त्यावेळी महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक चांगला होण्यासाठी मी काही गोष्टी केल्या आहेत.”
त्या काळात फिटनेस आयकॉन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बिपाशा बासूने सांगितलं की, पिळदार (मस्क्युलर) शरीरयष्टी असलेल्या महिलांना हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनेत्री म्हणून फारसं स्वीकारलं जात नव्हतं. ती म्हणाली, “मला वाटतं, ज्या महिलांच्या शरीरावर अधिक मसल्स असायचे, त्यांना अभिनेत्री म्हणून फारसं स्वीकारलं जात नव्हतं. पण मला वाटतं, मी हा ट्रेंड सुरू केला. मी प्रत्येकाला स्वतःवर प्रेम करा असं सांगायला सुरुवात केली. कारण मला जाणवलं की, केवळ चांगलं दिसणं महत्त्वाचं नाही, तुम्ही निरोगी असणं गरजेचं आहे.”
ट्रोलिंगबद्दल बिपाशाचा संताप
मात्र, आता महिलांच्या शरीरयष्टीबद्दल होणाऱ्या चर्चांना बिपाशा विचित्र मानते. बिपाशा म्हणाली, “महिलांच्या शरीरयष्टीबद्दलची चर्चा आजही खूप विचित्र आहे. मूल जन्माला घातल्यानंतर जादूने चाळिशीतही तुम्ही विसाव्या वर्षीच्या शरीरयष्टीत परत यावं, अशी अपेक्षा केली जाते. २० वर्षांच्या मुलीकडून ज्या गोष्टींची अपेक्षा केली जाते, तीच अपेक्षा ४० वर्षांच्या महिलेकडूनही केली जाते. आणि जर तुम्ही लगेच पूर्वीसारख्या शरीरयष्टीत परतला नाहीत, तर तुम्हाला ट्रोल केलं जातं. लोक खूप क्रूरपणे टीका करतात.”
बिपाशाने पुढे सांगितलं, “मला खूप, खूप ट्रोलिंगचा सामना करावा लागला. काही असंवेदनशील पापाराझींनी माझे अतिशय विचित्र फोटो काढले. एक महिला किती मेहनत घेत असते, बाळ, तिचं आयुष्य, जीवनशैली आणि वैयक्तिक दबाव यांचा समतोल साधण्यासाठी तिला किती गोष्टी कराव्या लागतात, याचा ते विचार करत नाहीत. खरं तर कोणालाच याची पर्वा नसते. प्रत्येकालाच तुमच्याकडून लगेच पूर्वीसारख्या शरीरयष्टीत परतण्याची अपेक्षा असते.”
दरम्यान, बिपाशा बासू सध्या दिग्दर्शक हंसल मेहता यांच्या आगामी प्रोजेक्टच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. या क्राइम थ्रिलर सीरिजच्या माध्यमातून ती अभिनय क्षेत्रात कमबॅक करणार आहे. ‘बाराबंकी’ असं या सीरिजचं नाव असून, यात बिपाशाबरोबर सनी कौशल आणि विशाल जेठवा हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
