अभिनेत्री बिपाशा बासूला लेकीच्या जन्मानंतर वाढलेल्या वजनावरून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागला. अशातच आता तिने याबद्दल भाष्य केलं आहे. ४७ वर्षीय बिपाशा आता अभिनय क्षेत्रात पुनरागमन करण्यासाठी सज्ज असून, वाढत्या वयाचा ती सहजपणे स्वीकार करत असल्याचंही तिने म्हटलं आहे. विशेष म्हणजे, विशीतील शरीरयष्टीपेक्षा आता तिला स्वतःचं शरीर अधिक आवडतं, अशी कबुलीही बिपाशाने दिली.
बॉलीवूडमधील सुरुवातीच्या फिटनेस आयकॉन्सपैकी एक म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या बिपाशा बसूने प्रसूतीनंतर वाढलेल्या वजनावरून झालेल्या ट्रोलिंगचा आपल्यावर फारसा परिणाम झाला नसल्याचं सांगितलं. ती म्हणाली, “मी अतिशय आत्मविश्वासू व्यक्ती आहे, त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या ट्रोलिंगमुळे मी खचून जात नाही. माझा प्रवास काय आहे, मला कोणत्या गोष्टींसाठी किती मेहनत घ्यायची आहे आणि ती कधी घ्यायची आहे, हे मला माहीत आहे. त्यामुळे मी त्याच मार्गाने पुढे जाईन. लोक काय बोलतात, याने मला फारसा फरक पडत नाही. मी अभिनय क्षेत्र निवडलं आहे, त्यामुळे माझ्याबद्दल लोक कायमच त्यांची मतं, प्रतिक्रिया व्यक्त करणार आहेत. याची मला जाणीव आहे.”
ट्रोलिंगबद्दल बिपाशा बासूचं स्पष्ट मत
ट्रोलिंगबद्दल बिपाशी बासू पुढे म्हणाली,”महिलांच्या शरीरयष्टीबद्दलची चर्चा आजही खूप विचित्र आहे. मूल जन्माला घातल्यानंतर जादूने चाळिशीतही तुम्ही विशीत दिसायचा तसंच दिसावं,अशी अपेक्षा केली जाते. २० वर्षांच्या मुलीकडून ज्या गोष्टींची अपेक्षा केली जाते, तीच अपेक्षा ४० वर्षांच्या महिलेकडूनही केली जाते. आणि जर तुम्ही लगेच पूर्वीसारख्या शरीरयष्टीत परतला नाहीत, तर तुम्हाला ट्रोल केलं जातं. लोक खूप क्रूरपणे टीका करतात.”
बिपाशाने पुढे सांगितलं, “मला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. काही असंवेदनशील पापाराझींनी माझे अतिशय विचित्र फोटो काढले. एक महिला किती मेहनत घेत असते, बाळ, तिचं आयुष्य, जीवनशैली आणि वैयक्तिक दबाव यांचा समतोल साधण्यासाठी तिला किती गोष्टी कराव्या लागतात, याचा ते विचार करत नाहीत. खरं तर कोणालाच याची पर्वा नसते. प्रत्येकालाच तुमच्याकडून लगेच पूर्वीसारख्या शरीरयष्टीत परतण्याची अपेक्षा असते.”
बिपाशाने पुढे सांगितलं की, आई झाल्यानंतर तिचं आयुष्यच बदलून गेलं. ती म्हणाली, “देवीला जन्म दिल्यानंतर मी पूर्वीसारखी राहिलेली नाही. माझ्या आयुष्यात मी केलेली किंवा करू शकलेली ही सर्वात सुंदर गोष्ट आहे.” ती पुढे म्हणाली, “माझ्या मुलीबरोबरचा प्रत्येक दिवस मला जगाकडे नवीन दृष्टीकोनातून पाहायला शिकवतो. ती अगदी छोट्या-छोट्या गोष्टी करताना तिच्या डोळ्यांत दिसणारं कुतूहल मला खूप काही शिकवतं. तिच्या त्या निरागस आश्चर्यातूनच मी आनंद घेत आहे आणि आयुष्य किती सुंदर आहे, तसंच प्रत्येक छोटी गोष्ट किती महत्त्वाची आहे, हे मला जाणवतं.”
