BJP Leader post for Salman Khan: राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी (१२ ऑक्टोबरला) गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी आतापर्यंत चार जणांना अटक केली आहे. बाबा सिद्दीकी (Baba Siddique Shot Dead) यांच्या हत्येची जबाबदारी बिष्णोई गँगने घेतली आहे. फेसबुकवर एक पोस्ट शेअर करून त्यांनी याची जबाबदारी घेतली. यानंतर सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट्सच्या बाहेरील सुरक्षा आणखी वाढवण्यात आली आहे. याच दरम्यान, भाजपा नेते हरनाथ सिंह यादव यांनी सलमान खानने माफी मागावी, असं म्हटलं आहे.
हरनाथ सिंह यादव हे भाजपाचे माजी राज्यसभा खासदार आहेत. हरनाथ सिंह यांनी एक्सवर एक पोस्ट करून सलमान खानला बिश्नोई समाजाची माफी मागण्याचा सल्ला दिला आहे.
“प्रिय, सलमान खान..
बिश्नोई समाज ज्याला देव मानतो, त्या काळवीटाची तुम्ही शिकार केली आणि तुम्ही त्याला शिजवून खाल्लं. त्यामुळे बिष्णोई समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत आणि मागच्या बऱ्याच वर्षांपासून तुमच्याबद्दल त्यांच्या मनात नाराजी आहे. माणसाकडून चुका होतात, तुम्ही मोठे अभिनेते आहात, देशात मोठ्या संख्येने लोक तुमच्यावर प्रेम करतात. त्यामुळे तुम्ही बिष्णोई समाजाच्या भावनांचा आदर करून तुमच्याकडून झालेल्या मोठ्या चुकीबद्दल बिश्नोई समाजाची माफी मागावी, असा माझा तुम्हाला प्रामाणिक सल्ला आहे,” अशी पोस्ट हरनाथ सिंह यादव यांनी केली आहे.
हेही वाचा – बाबा सिद्दीकी यांनी मिटवला होता सलमान खान व शाहरुख खान यांच्यातील अनेक वर्षांचा वाद, नेमकं काय घडलं होतं?
हरनाथ सिंह यादव यांच्या पोस्टवर लोक विविध प्रकारच्या कमेंट्स करत आहेत. काही लोकांनी हरनाथ सिंह यांनी दिलेला सल्ला योग्य असल्याचं म्हटलं आहे. काहींनी सलमानवर टीका केली आहे.
सलमानवर काळवीटांची शिकार केल्याचा आरोप
सलमान खानने एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान राजस्थानमध्ये १९९८ साली दोन काळवीटांची शिकार केल्याचा आरोप झाला होता. यासंदर्भात त्याच्याविरोधात खटला दाखल झाला आणि अनेक वर्षांच्या सुनावणीनंतर त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली. तेव्हापासून बिश्नोई गँग सलमान खान जीवे मारण्याच्या धमक्या देत आहे.
काही महिन्यांपूर्वी सलमान खानच्या घरावर झाला गोळीबार
एप्रिल २०२४ मध्ये सलमान खानच्या मुंबईतील घरावर गोळीबार करण्यात आला होता, त्याला सतत ई-मेलद्वारे जीवे मारण्याच्या धमक्या येतात. त्याच्या पनवेलच्या फार्म हाऊसचीही रेकी करण्यात आली होती. गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये झालेल्या गोळीबारानंतर सलमान खानची सुरक्षा वाढवण्यात आली होती. आता बाबा सिद्दीकी यांच्या हत्येने खळबळ उडाली आहे. सलमानची सुरक्षा आणखी वाढवण्यात आली आहे.