‘धुरंधर : द रिव्हेंज’ या चित्रपटाच्या सेटवर नियमांचं वारंवार उल्लंघन होत असल्याने, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ए वॉर्ड कार्यालयाकडून दिग्दर्शक आदित्य धरच्या प्रोडक्शन हाऊस बी६२ स्टुडिओज आणि त्यांच्या अर्जदारांना चित्रीकरणाच्या परवानग्यांसाठी अर्ज सादर करण्यापासून कायमचे ब्लॅकलिस्ट केलं आहे.

महानगरपालिका उपायुक्तांच्या पत्रात, इमारतीच्या टेरेसवर चित्रीकरण केल्याबद्दल आणि परवानग्याशिवाय दोन जनरेटर व्हॅन वापरल्याबद्दल १ लाख रुपयांचा दंड ठोठावला जावा असं म्हटलं आहे. तसंच दिलेले २५,००० रुपयेदेखील जप्त करावेत. चित्रपटाच्या सेटवर नियमांचे वारंवार उल्लंघन झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, महाराष्ट्र फिल्म, स्टेज आणि कल्चरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडकडे प्रोडक्शन हाऊसने ७ व ८ फेब्रुवारी दरम्यान चित्रपटाचे काही भागांच्या शूटिंगच्या परवानगीसाठी अर्ज केला होता. यानुसार, मोदी स्ट्रीट आणि पेरिन नरीमन स्ट्रीट दरम्यान शूटिंगसाठी परवानगी देण्यात आली होती.

पुढे अधिकाऱ्यांनी असे नमूद केले की चित्रपटाच्या सेटवर पोलिस विभागाकडून फटाके आणि ज्वलनशील पदार्थांचा वापर करण्यास मनाई असल्याच्या नियम घालण्यात आले होते आणि या नियमांचं उल्लंघन केलं गेलं. त्यामुळे अधिकाऱ्यांनी प्रोडक्शन हाऊसला ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याचा इशारा दिला आहे.

ज्वलनशील साहित्याचा वापर

महाराष्ट्र फिल्म कॉर्पोरेशनला कोमल पोखरियालकडून १३ आणि १४ फेब्रुवारी दरम्यान शूटिंगसाठी दुसरा अर्ज करण्यात आला. मागील नियमभंगाचा हवाला देत हा अर्ज रद्द करण्यात आला. यावर अर्जदाराने १४ फेब्रुवारी रोजी १२.३० वाजता ते ४.०० वाजेपर्यंत शूटिंगसाठीचा नवीन अर्ज केला. अर्जदाराने शूटिंग दरम्यान कोणतेही ज्वलनशील साहित्य वापरणार नाही अशी हमी दिली म्हणून शूटिंगसाठी परवानगी देण्यात आली. नंतर १४ फेब्रुवारी रोजी, मुंबई पोलिसांना १२.४५ वाजता शूटिंगदरम्यान ज्वलनशील वस्तू वापरल्या गेल्याची तक्रार आली. यावर पोलिसांनी शूटिंगदरम्यान लागलेल्या ५ टॉर्चेस जप्त केल्या.

महानगरपालिका उपायुक्तांच्या पत्रात २५,००० रुपये जमा रक्कम जप्त करण्यास अंतिम मंजुरी देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच, शूटिंगच्या ठिकाणी मिंट रोडवरील चेकपॉईंटवर जप्त केलेल्या टॉर्चेसची नोंद करण्याचे, संबंधित ठिकाणी इमारतीच्या टेरेसवर शूटिंग केल्याबद्दल १ लाख रुपयांचा दंड ठोठावण्याचे, तसेच दोन जनरेटर व्हॅन परवानगीशिवाय वापरल्याबद्दल आणि रहिवाशांच्या सुरक्षिततेस धोका निर्माण करणाऱ्या गंभीर नियमभंगांबाबत कारवाई करण्याचे नमूद करण्यात आले आहे.