Bobby Darling was attracted to Aishwarya Rai : बॉलीवूड दिग्दर्शक सुभाष घई यांच्या ‘ताल’ या गाजलेल्या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या बॉबी डार्लिंगने एका मुलाखतीत अत्यंत रंजक खुलासे केले आहेत. या चित्रपटात ऐश्वर्या रायच्या डिझायनरची छोटी भूमिका साकारणाऱ्या बॉबीने सांगितलं की, शूटिंगदरम्यान सुभाष घईंनी तिला ऐश्वर्याच्या ब्लाऊजचं हुक लावायला सांगितलं होतं. मिस वर्ल्ड ऐश्वर्या रायच्या सौंदर्याने आणि तिच्या परफेक्ट फिगरने प्रभावित होऊन आपण तिच्याकडे आकर्षित झालो होतो, असं बॉबी डार्लिंग म्हणाली.

सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत बॉबी डार्लिंगने शूटिंगच्या आठवणी सांगितल्या. “सुभाष घई यांचा ‘ताल’ हा माझा पहिला चित्रपट होता. त्यातील माझी भूमिका खूप छोटी होती. त्यासाठी मी २५ दिवस शूटिंग केलं होतं. सिनेमातील माझे सीन्स एडिट करणं माझ्या हातात नाही. मी २५ दिवस शूटिंग केलं होतं आणि मला पर-डे २५०० रुपये मिळाले होते. सुभाष घईंनी ‘ताल’साठी माझी ऑडिशन घेतली होती. ऑडिशन पाहिल्यानंतर त्यांनी मी त्या भूमिकेसाठी परफेक्ट असल्याचं सांगितलं. हिला ऐश्वर्याच्या डिझायनरची भूमिका द्या, असं ते म्हणाले होते,” असं बॉबी डार्लिंगने सांगितलं.

बॉबी डार्लिंगला ऐश्वर्या रायच्या ब्लाऊजचं हुक लावायला सांगितलं अन्…

बॉबी डार्लिंग पुढे म्हणाली, “अशा रितीने मला ती भूमिका मिळाली आणि शूटिंग सुरू झालं. माझा सीन सुरू झाला तेव्हा सरोज खान मॅडम ‘रमता जोगी’ या गाण्याचं शूटिंग करत होत्या. गाण्यातील ‘जंगल में कोयल बोले कुक’ या ओळींवर कॅमेरा सुरू झाला. समोर ऐश्वर्या राय, मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय उभी होती आणि सुभाषजी मला म्हणाले की तिच्या ब्लाउजचे हुक लाव. ब्लाऊज होतं की ब्रा? मला माहीत नाही. पण माझे हात भीतीने थरथर कापत होते आणि मी ऐश्वर्याच्या ब्लाऊजचं हुक लावलं. मी मनात म्हणाले, काय नशीब आहे माझं, मला काम हवं होतं आणि भगवान शंकरांनी मला थेट ऐश्वर्या रायच्या शेजारी उभं केलं.”

बॉबी डार्लिंग ऐश्वर्या रायबद्दल म्हणाली…

बॉबी डार्लिंगने ऐश्वर्याकडे आकर्षित झाल्याची कबुली मुलाखतीत दिली. “माझी भूमिका लहान होती, पण ऐश्वर्याला मी रात्रंदिवस भेटत होते. ती खूप नम्र होती, ती खूप गोड होती. नीता लुल्ला तिचे कॉस्च्यूम डिझाईन करत होत्या, मिकी कॉन्ट्रॅक्टर तिचा मेकअप करत असे. आमच्या सर्वांची मैत्री झाली. ऐश्वर्या खूप नम्र होती. तिचा साधेपणा मला इतका भावला की मी तिच्याकडे आकर्षित झाले. जर मी मुलगा असते तर मलाही तिच्यासारखीच मुलगी हवी असती. ती सडपातळ होती, तिचे फिगर आकर्षक होते,” असं बॉबी डार्लिंग म्हणाली.