Bobby Deol Buys 5 office spaces in Andheri Mumbai: अनेक कलाकार अभिनयाबरोबरच उद्योग-व्यवसायही करतात. रिअल इस्टेट, अन्नपदार्थ, कपडे, दागिने अशा विविध प्रकारचे व्यवसाय अनेक कलाकार करतात. त्यामध्ये विवेक ओबेरॉय, सलमान खान, श्रद्धा कपूर, प्राजक्ता माळी, रितेश देशमुख, शाहरुख खान, शिल्पा शेट्टी अशा अनेक कलाकारांची नावे आहेत. ज्यांनी अभिनयाबरोबरच व्यवसाय क्षेत्रातही स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
बॉबी देओलने मुंबईत खरेदी केली कोट्यवधीची मालमत्ता
बॉलीवूड अभिनेता बॉबी देओलचीदेखील ग्रीनस्टोन इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड (Greenstone Investments Pvt Ltd) ही कंपनी आहे. या कंपनीचा विस्तार करण्याच्या उद्देशाने बॉबी देओल व त्याची पत्नी तानिया देओलने नवीन प्रॉपर्टीची खरेदी केली आहे.
रिपोर्टनुसार, या जोडप्याने पाच कार्यालयांची खरेदी केली आहे, ज्यांची किंमत जवळजवळ १५.०५ कोटी इतकी आहे. प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट्सनुसार ही प्रॉपर्टी मुंबईतील अंधेरी येथे आहे. तसेच त्याचे क्षेत्रफळ ३,४०० स्क्वेअर फूट इतके आहे.
बॉबी देओलने खरेदी केलेले ऑफिस अंधेरी पश्चिम येथील लिंक रोडजवळील युरा बिझनेस पार्क फेझ २ (Yura Business Park Phase 2) च्या दुसऱ्या मजल्यावर आहेत.
कागदपत्रांनुसार, देओल कुटुंबाने ही प्रॉपर्टी थेट डेव्हलपरकडून खरेदी केली असून, या व्यवहाराची २७ फेब्रुवारी २०२६ रोजी नोंदणी झाली आहे. त्यासाठी त्यांना ९० लाख स्टॅम्प ड्युटी भरावी लागली; तर नोंदणीसाठी १.५० लाख इतका खर्च झाला. या खरेदीमध्ये पाच कार पार्किंगचाही समावेश आहे. मात्र, इमारतीचे बांधकाम अद्याप पूर्ण झालेले नाही. सध्या बांधकाम सुरू असून, डिसेंबर २०२७ ला देओल कुटुंबाला या प्रॉपर्टीचा ताबा मिळेल.
विशेष म्हणजे, बॉबी देओलने Greenstone Investments साठी ज्या इमारतीत कार्यालये खरेदी केली आहेत, तिथेच हृतिक रोशन व त्याचे आई-वडील राकेश रोशन व पिंकी रोशन यांनीदेखील याधीच १० कार्यालयांची खरेदी केली आहे. ही कार्यालये तिसऱ्या व चौथ्या मजल्यावर आहेत. Propstack नुसार, रोशन कुटुंबाने नोव्हेंबर २०२५ मध्ये ही प्रॉपर्टी २८ कोटींना खरेदी केली होती.
बॉबी देओलने बॉलीवूडमध्ये नायक म्हणून सुरुवातीला काम केले असले तरी त्याला सध्या खलनायकाच्या भूमिकेतून प्रेक्षकांचे प्रेम मिळत आहे. त्याचे आतापर्यंत अनेक सिनेमे गाजले आहेत.
बॉबी देओलची महत्त्वाची भूमिका असलेले ‘बरसात’ गुप्त, सोल्जर, बादल, ‘बिच्छू, अजनबी, हमराज, यमला पगला दीवाना, रेस ३, हाऊसफुल ४, क्लास ऑफ ८३ असे अनेक चित्रपट गाजले. २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अॅनिमल’मधील त्याची भूमिका चांगलीच गाजली होती. दरम्यान, जना नायगन (Jana Nayagan) या सिनेमात तो महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
