Dharmendra Lifetime Achievement Chetak Screen Awards : मुंबईत रविवारी (५ एप्रिल) पार पडलेल्या ‘चेतक स्क्रीन अवॉर्डस २०२६’मध्ये अभिनेता बॉबी देओल आपल्या वडिलांच्या म्हणजेच ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या वतीने ‘जीवनगौरव’ पुरस्कार स्वीकारताना भावूक झाला.

भारतीय चित्रपटसृष्टीतील सहा दशकांहून अधिक काळातील अतुलनीय योगदानाबद्दल धर्मेंद्र यांना मरणोत्तर ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जावेद अख्तर, रमेश सिप्पी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

वडिलांच्या आठवणीत बॉबी देओल भावुक

धर्मेंद्र यांचा पुरस्कार घेतल्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना बॉबी देओल म्हणाला, “तुमच्या सर्वांच्या डोळ्यांत मला माझ्या वडिलांचे प्रेम दिसत आहे. त्यांनी केवळ आपल्या कामातूनच नाही, तर त्यांच्या ‘इन्स्टाग्राम रील्स’मधूनही लोकांची मनं जिंकली होती, जो त्यांचा एक नवीन छंद बनला होता. लोकांनी नेहमी आनंदी राहावे, अशी त्यांची इच्छा होती. आपण स्वतःवर विश्वास ठेवला, तर काहीही साध्य करू शकतो, असे ते नेहमी म्हणायचे.”

Award Banner

“वडिलांमुळेच मला इतके प्रेम मिळत आहे”

धर्मेंद्र यांचा संघर्ष आणि चित्रपटसृष्टीतील त्यांचा प्रदीर्घ प्रवास यांबद्दल बोलताना बॉबी म्हणाला, “त्यांनी या इंडस्ट्रीत इतकी वर्षं काम केलं, अनेक चढ-उतार पाहिले; पण कधीही हार मानली नाही. मी आज जिथे जिथे जातो, तिथे तिथे मला जे प्रेम मिळते, ते केवळ माझ्या वडिलांमुळेच…”

पुढे भावूक होत तो म्हणाला, “लोक त्यांच्यावर इतके प्रेम करतात की, त्यांनी आम्हाला कोणताही संकोच न करता आपलेसे केले. आज इथे उभे असताना मला असे वाटतेय की, घरी गेल्यावर मी त्यांना सांगावे, ‘पापा, तुम्ही येऊ शकला नाहीत म्हणून मी तुमचा पुरस्कार घेऊन आलो आहे.'”

शेवटी तो म्हणाला, “मी कधी विचारही केला नव्हता की, मी अशा प्रकारे इथे उभा राहीन. अनंत (गोयंका) यांची मनापासून इच्छा होती की, मी इथे यावे. त्यांचा मुलगा असल्याचा मला अभिमान आहे. स्क्रीन अवॉर्डसचे खूप आभार.”

जावेद अख्तरांकडून आठवणींना उजाळा

धर्मेंद्र यांच्याबरोबरच्या पहिल्या भेटीची आठवण सांगताना जावेद अख्तर म्हणाले, “मी त्यांना १९६५ मध्ये पहिल्यांदा भेटलो होतो, तेव्हा मी अवघ्या १७५ रुपये पगारावर सहायक दिग्दर्शक म्हणून काम करत होतो. कोणा एकानं माझी त्यांच्याशी ओळख करून दिली आणि त्यांनी इतक्या आपुलकीनं माझी भेट घेतली की, मी थक्क झालो. एक सहायक दिग्दर्शक म्हणून मी त्यांच्या अनेक शॉट्सवर ‘क्लॅप’ दिले आहेत, पुढे त्यांच्यासाठी चित्रपटही लिहिले. त्यांनीच मला बोलावून सांगितले होते, ‘मी माझ्या मुलाला लाँच करत आहे आणि तू त्याची पटकथा लिहावीस.’ तो चित्रपट म्हणजे सनी देओलचा ‘बेताब’ चित्रपट.”

“आमचे नाते खूप जुने आहे. यशस्वी लोकांचा आदर केला जातो, पण धर्मेंद्र असे व्यक्ती होते ज्यांच्यावर संपूर्ण चित्रपटसृष्टीने मनापासून प्रेम केले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात स्वाभिमान आणि नम्रता यांचा एक दुर्मिळ संगम होता. जो कोणी त्यांना भेटायचा, तो त्यांच्या प्रेमात पडायचा”, असंही ते पुढे म्हणाले.

धर्मेंद्र यांच्या कारकीर्दबद्दल थोडक्यात

३०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलेले धर्मेंद्र हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक सुपरस्टार आहेत. ६० व ७० च्या दशकात त्यांनी राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम करीत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. इक्कीस हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुले सनी देओल आणि बॉबी देओल, तसेच ईशा देओल आणि अहाना देओल असा परिवार आहे. तसेच प्रकाश कौर आणि हेमा मालिनी या पत्नी आहेत.