Bobby Deol : बॉबी देओल आणि सनी देओल हे दोघे भाऊ त्यांच्या आई प्रकाश कौर यांना त्यांच्या आयुष्यातील मोठा आधार मानतात. छोट्या गावातून आलेल्या प्रकाश कौर यांनी मुंबई सारख्या गजबजलेल्या शहरात दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांच्याबरोबर संसार केला. घरात त्या शिस्तप्रिय होत्या आणि मुलांनाही शिस्तीत ठेवत असत. नुकतच बॉबी देओलने त्याच्या आईबरोबरच्या जुन्या आठवणी सांगितल्या आहेत.
बॉबी देओलने नुकतीच आप की अदालतमध्ये याबद्दल सांगितलं आहे. यावेळी त्याला तो अभ्यासात चांगला होता का असं विचारल्यानंतर तो म्हणाला, “अजिबात नाही.” पुढे तो म्हणाला, “शाळेत न गेल्यामुळे मला खूप मार पडायचा. खरं तर मला शाळाच आवडत नव्हती. लहानपणी मी प्रामुख्याने हिंदीत बोलायचो. पण माझी शाळा इंग्रजी माध्यमाची होती. त्यामुळे शाळेतून आईकडे नेहमी तक्रारी यायच्या की, तुमचा मुलगा सतत हिंदीत बोलतो, तर त्याला हिंदी माध्यमाच्या शाळेत टाका.”
अभिनेता पुढे म्हणाला, “त्या तक्रारीनंतर मला खूप ओरडा बसला. मग मी हिंदी कमी वापरण्याचा प्रयत्न केला आणि इंग्रजी शिकायला सुरुवात केली. इतकं की आता मी बहुतेक वेळा इंग्रजीतच विचार करतो. आमचं घर शाळेजवळच होतं. त्यामुळे अनेकदा आई मला शाळेत सोडायला जाताना वाटेत मारत-ओरडत घेऊन जायची.”
बॉबी देओल पुढे म्हणाला, “एकदा शाळेचे मुख्याद्यापक उभे होते. त्यांनी माझ्या आईला सांगितलं तुमच्या मुलाला शिकायचंच नाही, त्याला आत्ताच घरी घेऊन जा. ते ऐकताच मला वाटलं की त्यांनी असं बोलायला नको होतं. कारण त्यानंतर आई मला पुन्हा मारतच घरी घेऊन गेली. ती बहुतेक वेळा चप्पलनेच मारायची. तेच तिचं आवडती गोष्ट होती”.
२०२४ मध्ये कपिल शऱमाच्या शोमध्ये सनी देओलला त्याच्या वडिलांनी धर्मेंद्र यांनी कधी मारलं आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर तो म्हणालेलेा, “पप्पांनी मला कधीच मारलं नाही. त्यांच्या नजरेतच एवढा दरारा आहे. त्यांचा हातच २० किलोचा आहे. पण आईकडून मात्र आम्हाला खूप मार पडायचा. तिनेच मला शिस्त लावली. अनेकदा मला आधीच दुखापत झालेली असायची, तरीही आई चप्पलने मारायची. कधी-कधी तर जखमेतून रक्तही येत असायचं”.
कामाच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, बॉबी देओल लवकरच अनुराग कश्यप दिग्दर्शित अॅक्शन-थ्रिलर चित्रपटात झळकणार आहेत. हा चित्रपट ५ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. याशिवाय तो ‘अल्फा’ या चित्रपटातही दिसणार असून, त्यांच्याबरोबर आलिया भट्ट आणि शर्वरी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
