बॉबी देओलने गेल्या तीन वर्षांत रणबीर कपूर आणि आलिया भट्ट या दोघांबरोबरही काम केलंय. आधी, त्याने रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेल्या संदीप रेड्डी वांगा यांच्या २०२३ मधील ब्लॉकबस्टर ‘ॲनिमल’ चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारली होती. आता तो शिव रवैल यांच्या ‘अल्फा’ या स्पाय थ्रिलर चित्रपटात मुख्य खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे, या चित्रपटात आलिया भट्ट मुख्य भूमिकेत आहे. मात्र, बॉबीच्या मते, त्याचं या जोडप्याशी वैर फक्त चित्रपटापुरतंच मर्यादित आहे. ‘अल्फा’च्या सेटवर त्याच्या आणि आलियामध्ये काहीतरी बिनसल्याच्या चर्चांवर त्याने आता स्पष्टीकरण दिले आहे.
हसत हसत बॉबी म्हणाला, “माझ्या एका मित्राने मला त्या बातमीचा स्क्रीनशॉट पाठवला होता. मला खूप धक्का बसला. लोक इतके रिकामटेकडे आहेत की काहीही बोलत असतात. खरं तर मी रणबीरबरोबर ‘ॲनिमल’ केल्यानंतर मला आलियाच्या चित्रपटाची ऑफर आली. मला आश्चर्य वाटलं, मला माझ्या दोन आवडत्या कलाकारांबरोबर काम करण्याची संधी कशी काय मिळतेय!” बॉबीच्या मते, तो या पती-पत्नीचा (रणबीर-आलिया) खूप आदर करतो, पण त्यांची फारशी भेट होत नाही.
आलिया उत्तम अभिनेत्री आहे- बॉबी देओल
‘आप की अदालत’ या शोमध्ये आलियाचे कौतुक करताना बॉबी म्हणाला, “पहिली गोष्ट म्हणजे ती एक उत्तम अभिनेत्री आहे. ती प्रचंड व्यावसायिक आहे, ती खूप मेहनत घेते. तिच्या फाईट सीक्वेन्ससाठी तिने खूप चांगली तयारी केली होती.” बॉबीच्या या वक्तव्यानंतर सेटवर त्याच्या व आलियाच्या वादाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. अफवांवर बोलताना तो पुढे म्हणाला, “लोक तर असंही म्हणत होते की बॉबी इतका नाराज होता की आदित्य चोप्राने त्याची मनधरणी करण्यासाठी दुसऱ्या चित्रपटाची ऑफर दिली.”
आदित्य चोप्रा यांची ‘यशराज फिल्म्स’ कंपनी ‘अल्फा’ चित्रपटाची निर्मिती करत आहे. हा चित्रपट ‘YRF स्पाय युनिव्हर्स’चा एक भाग आहे. यात आधीच शाहरूख खानचा ‘पठाण’ (२०२३), सलमान खान आणि कतरिना कैफची ‘टायगर’ फ्रँचायझी, आणि हृतिक रोशनची ‘वॉर’ फ्रँचायझी यांसारखे ब्लॉकबस्टर चित्रपट आहेत. या युनिव्हर्सचा पुढचा भाग ‘अल्फा’ हा आहे, ज्यामध्ये शर्वरी वाघ आणि अनिल कपूर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट ३ जुलै रोजी चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे.
आलिया भट्टने अल्फासाठी काय तयारी केली?
बॉबी देओलने ‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीतही आलिया भट्टचे कौतुक केले. तो म्हणाला, “मी आतापर्यंत ज्या कलाकारांबरोबर काम केले आहे, त्यापैकी आलिया ही अत्यंत कष्टाळू आणि प्रामाणिक अभिनेत्री आहे. ती सेटवर पूर्ण तयारी करून येते आणि प्रत्येक सीनमध्ये स्वतःला झोकून देते. तिने याआधी कधीही अशा प्रकारचे ॲक्शन सीन केले नव्हते, पण शूटिंगसाठी तिची तयारी पाहून मी थक्क झालो. ॲक्शन सीन्स पडद्यावर साकारणं खूप कठीण असतं, पण ती यासाठी तिचे १०० टक्के देत असल्याचं मी पाहिलं.”
पूजा भट्टने बॉबी देओलला केलेलं डेट
बॉबीने पुढे सांगितलं की, तो आलियाला तिच्या लहानपणापासून ओळखतो. खरं तर, बॉबीने आलियाची मोठी बहीण आणि अभिनेत्री-दिग्दर्शिका पूजा भट्ट हिला काही काळ डेट केलं होतं. पूजा भट्टने स्वतः याबद्दल भाष्य केलंय. विकी लालवानी यांना दिलेल्या मुलाखतीत पूजा म्हणाली, “तो माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय काळ होता आणि बॉबी एक खूप छान माणूस होता. आमचं नातं का संपलं, यावर आज इतक्या वर्षांनंतर बोलणं योग्य ठरणार नाही. आम्ही नात्यात होतो आणि ते आम्ही कधीच नाकारलं नाही. सध्या तो विवाहित आहे, त्याची मुलं मोठी झाली आहेत आणि त्याच्या करिअरला चांगली गती मिळाली आहे. ‘ॲनिमल’ चित्रपटातील त्याचा अभिनय मला खूप आवडला. मी त्याच्यासाठी खूप आनंदी आहे.”
