Bobby Deol : बॉबी देओलने १९९५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बरसात’ या चित्रपटातून पदार्पण केलं. यामध्ये त्याच्यासह अभिनेत्री ट्वींकल खन्ना झळकलेली. त्यानंतर त्याने मनिषा कोइराला, प्रीती झिंटा, काजोल यांसारख्या अभिनेत्रींसह काम केलं. अशातच त्याने नुकतच त्याच्या सहअभिनेत्रींची तो मस्करी करायचा आणि तो खोडकर होता असं सांगितलं आहे.

बॉबी देओलने रजत शर्मा यांना दिलेल्या मुलाखतीत त्याच्यावर सहअभिनेत्रींबरोबर त्याचे वाद व्हायचे असा आरोप करण्यात आला. यावेळी ‘बरसात’च्या चित्रीकरणादरम्यान ट्वींकलबरोबर झालेल्या वादाबद्दलही त्याला विचारण्यात आलं. यावर बॉबी म्हणाला, “त्यावेळी आम्ही दोघेही खूप तरुण होतो. मला लहानपणापासून पोटाच्या समस्या होत्या. मी सतत माझ्या पोटाच्या त्रासाबद्दल बोलत असायचो. आज शौचालयाला गेलो का, पुन्हा जाणार का, तब्येत कशी आहे, अशा गोष्टी मी नेहमी सांगायचो. त्यामुळे ट्विंकलला माझा खूप कंटाळा यायचा आणि ती चिडायची.”

बॉबी देओल पुढे म्हणाला, “चित्रपटासाठी तिची पहिली मुलाखत झाली तेव्हा तिने माझ्या या सवयीबद्दल सांगितलं. ते ऐकून मी तिला फोन केला आणि म्हणालो, तू मुलाखतीत हे कसं काय सांगू शकतेस? पण आम्ही दोघेही त्यावेळी खूप लहान होतो. त्यात काही गंभीर नव्हतं, तो फक्त एक मजेशीर किस्सा होता.”

राणी मुखर्जीबरोबरही झालेला वाद?

यानंतर बॉबी देओलला राणी मुखर्जीबरोबर चित्रपटाचं शूटिंग करत असताना तो तिला तिच्या उंचीवरुन चिडवायचा याबद्दल विचारल्यानंतर यावर बॉबी हसत म्हणाला, “राणी माझी खूप चांगली मैत्रीण आहे. खरं तर आमची मैत्री याच चित्रपटापासून सुरू झाली. आम्ही एका गाण्याचं चित्रीकरण करत होतो आणि खूप वारा सुटला होता. त्यामुळे राणीने तिचे केस विरुद्ध दिशेने उडावेत म्हणून ती दुसऱ्या बाजूकडे तोंड करून उभी राहिली होती. तिचे केस माझ्या चेहऱ्यावर येत होते. त्यामुळे मी तिला तसं न उभं राहता बाजूने उभं राहायला सांगितलं, जेणेकरून आमच्या दोघांचेही केस एकाच दिशेने उडतील. पण आम्ही दोघेही आपापल्या मतावर ठाम होतो आणि त्यावरून आमच्यात थोडा वाद झाला. मात्र, त्या एका छोट्याशा भांडणानंतर आमची खूप चांगली मैत्री झाली. राणी घरून माझ्यासाठी चविष्ट जेवण आणायची. ती खूप छान आणि मनमिळावू व्यक्ती आहे”

बॉबी देओलने पुढे ‘गुप्त’ चित्रपटादरम्यान मनीषा कोईरालाबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला. यामध्ये त्याने साहिल सिन्हा ही मुख्य भूमिका साकारलेली आणि त्याच्याबरोबर काजोल व मनीषा कोईराला या अभिनेत्री होत्या. चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचा एक मजेशीर किस्सा सांगताना बॉबी म्हणाला, “हो, मला तो प्रसंग आठवतो. आम्ही थंडीत शूटिंग करत होतो आणि जवळच एकजण चणे विकत होता. मनीषा ते आवडीने खात होती. त्यानंतर एका गाण्याच्या सीनमध्ये तिला माझ्या हनुवटीला चावा घ्यायचा होता. पण तिच्या तोंडातून कांद्याचा वास येत असल्यामुळे मला नीट प्रतिक्रिया देणं कठीण जात होतं”.

दरम्यान, कामाबद्दल बोलायचं झालं तर बॉबी देओल लवकरच अ‍ॅक्शन-थ्रिलर चित्रपटात दिसणार आहेत. हा चित्रपट ५ जून रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.