Dharmendra First Wife Prakash Kaur : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन झाले आहे. करिअरमध्ये ३०० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम करणारे धर्मेंद्र त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिले. धर्मेंद्र चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी पंजाबहून मुंबईत आले होते, तेव्हा त्यांचं लग्न झालं होतं. सिनेक्षेत्रात त्यांना प्रचंड यश मिळालं. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारली, पण त्यांच्या पत्नीच्या आयुष्यात कालांतराने मोठं वादळ आलं.

धर्मेंद्र यांनी मुंबईत प्रचंड संघर्ष केला. नंतर १९६० मध्ये ‘दिल भी मेरा हम भी तेरे’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. नंतर त्यांनी अनेक चित्रपट केले आणि मागे वळून पाहिलं नाही. चित्रपटांमध्ये काम करतानाच विवाहित धर्मेंद्र अभिनेत्री हेमा मालिनींच्या प्रेमात पडले आणि ४ अपत्ये असूनही त्यांनी लग्न करायचं ठरवलं.

धर्मेंद्र यांच्या दुसऱ्या लग्नामुळे देओल कुटुंबात दरी निर्माण झाली. हेमा मालिनी लग्नानंतर त्यांच्या स्वतःच्या बंगल्यात स्वतंत्रपणे राहिल्या, तर धर्मेंद्र त्यांच्या पहिल्या पत्नी आणि चार मुलांसह त्यांच्या घरी राहत होते. हेमा यांची मुलगी ईशा देओलने एकदा सांगितलं की ती ३० वर्षांची असताना प्रकाश कौर यांना भेटली होती. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत, धर्मेंद्र यांचा धाकटा मुलगा बॉबी देओलने आई-वडिलांबद्दल एक खुलासा केला. धर्मेंद्र शेवटच्या काळात त्यांची पहिली प्रकाश कौरबरोबर खंडाळा येथील फार्महाऊसमध्ये एकत्र राहत होते.

dharmendra stayed with first wife
धर्मेंद्र यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलच्या काही गोष्टी (फोटो- करण जोहर इन्स्टाग्राम)

पहिल्या पत्नीबरोबर घालवले शेवटचे दिवस

धर्मेंद्र सोशल मीडियावर खूप सक्रिय होते. ते त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून सातत्याने पोस्ट करायचे. शेवटच्या काही पोस्ट एकटेपणाबद्दल होत्या. यासंदर्भात बॉबी देओलला एबीपी लाईव्हला दिलेल्या मुलाखतीत विचारण्यात आलं होतं. तेव्हा धर्मेंद्र आईबरोबर खंडाळा येथील फार्म हाऊसवर राहत असल्याचं त्याने सांगितलं होतं. “माझी आईही तिथे आहे. ते दोघेही सध्या खंडाळा येथील फार्म हाऊस राहत आहेत. पप्पा आणि मम्मी एकत्र आहेत. पप्पा कधी कधी थोडे ड्रामा करतात. त्यांना फार्महाऊसमध्ये राहायला आवडतं. आता त्यांचं वय झालंय, त्यामुळे फार्महाऊसमध्ये राहणं त्यांच्यासाठी आरामदायी आहे. तिथलं हवामान छान आहे, जेवण छान आहे,” असं बॉबी देओलने म्हटलं होतं.

धर्मेंद्र खूप भावनिक होते. त्यांना व्यक्त खूप व्हायला खूप आवडायचं. मनात जे यायचं ते सोशल मीडियावर लिहायचे. दरम्यान, धर्मेंद्र यांची ३१ ऑक्टोबरला प्रकृती बिघडली आणि त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. काही दिवस उपचारांनंतर डिस्चार्ज घेऊन १२ नोव्हेंबरला घरी आणलं होतं. तेव्हाही धर्मेंद्र त्यांच्या पहिल्या पत्नी व मुलांबरोबर, नातवंडांबरोबर राहिले. आज ईशा देओल त्यांच्या जुहू येथील घरी गेली होती. त्यानंतर देओल कुटुंबीय धर्मेंद्र यांचे पार्थिव घेऊन विलेपार्ले येथील स्मशानभूमित आले. तिथेच त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला.

दरम्यान, १९५४ साली धर्मेंद्र फक्त १९ वर्षांचे असताना त्यांचे आणि प्रकाश कौर यांचे लग्न झाले होते. या जोडप्याला चार अपत्ये आहेत. मुलं सनी आणि बॉबी देओल आणि मुली अजिता आणि विजेता. काही वर्षांनंतर, १९७० मध्ये धर्मेंद्र हेमा मालिनी यांना ‘तुम हसीन मैं जवान’ या चित्रपटाच्या सेटवर भेटले. त्यांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री लवकरच खऱ्या प्रेमात रूपांतरित झाली. हेमा यांच्या कुटुंबाकडून या लग्नाला विरोध झाला होता. पण तरीही त्यांनी १९८० मध्ये लग्न केले. या दोघांना ईशा आणि अहाना देओल या दोन मुली आहेत. ईशा देओलचं बॉबी व सनी देओलशी चांगलं नातं आहे.