बॉलीवूडमध्ये असे काही कलाकार आहेत, ज्यांना सकारात्मक भूमिकांमधून जितकी लोकप्रियता मिळाली नाही, त्याहून अधिक पटींनी त्यांच्या नकारात्मक भूमिकांचे कौतुक झाले. बॉबी देओल अशाच कलाकारांपैकी एक आहे.

२०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या अॅनिमल या सिनेमातील बॉबी देओलच्या भूमिकेचे प्रचंड कौतुक झाले. त्याच्या भूमिकेची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली.

बॉबी देओल त्याच्या भूमिकांबरोबरच त्याच्या विविध मुलाखतींमधील वक्तव्यांमुळेदेखील अनेकदा चर्चेत असतो. काही वेळा तो त्याच्या खासगी आयुष्याबद्दलही वक्तव्य करतो. एका मुलाखतीत अभिनेत्याने त्याच्या दारूच्या व्यसनाबद्दल वक्तव्य केले होते. दारूच्या व्यसनाचा त्याच्या आयुष्यावर गंभीर परिणाम झाला. त्याच्या कुटुंबीयांवर तसेच, जवळच्या लोकांना त्याच्यामुळे त्रास होता, असे अभिनेत्याने वक्तव्य केले होते. तो नेमकं काय म्हणाला होता, हे जाणून घेऊ…

Award Banner

“मी दररोज दारू…”

राज शम्मानीला दिलेल्या मुलाखतीत बॉबी देओल म्हणालेला, “मी माझ्या कुटुंबासाठी काम करतो. जर त्यांच्या डोळ्यांत मला भीती आणि दु:ख दिसत असेल, तर मी करत असलेल्या कष्टाचा उपयोग नाही. मी दररोज दारू प्यायचो, असे नाही; पण जेव्हाही मी दारू पीत असे तेव्हा ते मला भीत असत. मी कसा वागेन, याबद्दल त्यांना काहीही कल्पना नसायची. हे भयंकर आहे”, असे म्हणत बॉबी देओलने त्याच्या भावना व्यक्त केल्या होत्या.

पुढे तो दारूच्या व्यसनाबद्दल म्हणालेला, “दारू हे सगळ्यात मोठं व्यसन आहे. ड्रग्जपेक्षा दारूचे जास्त व्यसन लागते. अमली पदार्थांप्रमाणे मेंदूवर त्याचा परिणाम होतो.”

“संपूर्ण कुटुंबच…”

घरात असलेल्या अडचणी व तणावाबद्दल बॉबी देओल म्हणालेला, “मी एका वाईट काळातून जात होतो, माझा भाऊ वाईट काळातून जात होता. साहजिकच माझे वडील खूप कमी काम करत होते. संपूर्ण कुटुंबच तणावाखाली होते; पण माझ्या भावाने तो तणाव कधीच दाखवला नाही, जाणवू दिला नाही. मला आता वाटते की, त्याने तसे का केले? मी त्यावेळी घरात बसून असायचो. एक दिवस माझा मुलगा माझ्या पत्नीला म्हणत होता की, तू तुझ्या कामासाठी बाहेर जातेस; पण बाबा फक्त घरी बसून असतात. ते मी ऐकले. त्यानंतर सगळेच बदलले. मी कसा वडील आहे, असा मी विचार करू लागलो. माझ्यातील क्षमता लोक ओळखू शकत नाहीत, असे म्हणत मी इतरांना दोष देऊ लागलो. या सगळ्यात तुम्ही निरुपयोगी आहात, असा तुम्हाला विश्वास वाटू लागतो. तुम्ही खचून जाता. मी अधिक भावनिक असल्यामुळे मी खचून गेलो. त्यावेळी दारूचा आधार वाटत होता.”

“त्यामुळे मी दारू पिणे…”

अभिनेता पुढे असेही म्हणाला, “तुमच्या जवळच्या लोकांना तुमच्या वाईट गोष्टी माहीत असतात. दारू प्यायल्यानंतर मी माझ्या पत्नीला खूप वाईट बोलायचो. तिच्याशी वाईट वागायचो. राग व्यक्त करायचो. हे सगळं तुमच्याकडून दारू करून घेते. लोक म्हणतात की, दारू प्यायल्यानंतर तुम्ही खरे बोलता; पण मला वाटते की, खरे बोलण्यापेक्षा तुमच्या मनात जे दु:ख आहे, ते बाहेर येते. तुमच्या जवळच्या लोकांना मात्र त्याचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे मी दारू पिणे थांबवले.”

दरम्यान, बॉबी देओल सध्या अनेकविध भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.