Bobby Deol shares emotional memories of late father Dharmendra : दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांनी अनेक दशकं बॉलीवूडमध्ये काम करत त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये त्यांचं दुख:द निधन झालं. त्यांच्या निधनामुळे त्यांची मुलं आणि संपूर्ण देओल कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळलेला. इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनीसुद्धा याबद्दल हळहळ व्यक्त केली. यातून अजूनही त्यांचं कुटुंब पूर्णपणे सावरलेलं नाहीये. अशातच आता त्यांचा मुलगा बॉबी देओलनेसुद्धा याबद्दल सांगितलं आहे.

अलीकडेच ५ एप्रिलला पार पडलेल्या ‘चेतक स्क्रीन अवॉर्डस्’मध्ये धर्मेंद्र यांना मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला. त्यावेळी त्यांचा मुलगा लोकप्रिय अभिनेता बॉबी देओलनं हा पुरस्कार स्वीकारला. बॉबी देओलने अशातच आता ‘एस्क्वायर इंडिया’शी संवाद साधताना वडिलांबरोबर फार वेळ घालवता आला नाही अशी खंत व्यक्त केली आहे. यावेळी त्याने आता त्यांचं पूर्ण कुटुंब एकत्र आलं असल्याचंही म्हटलं आहे.

बॉबी देओलने व्यक्त केली खंत

बॉबी देओल म्हणाला, “असे काही दिवस असतात जेव्हा मला वाटतं की मी त्यांच्याबरोबर अजून वेळ घालवायला हवा होता, अजून प्रश्न विचारायला हवे होते.” पुढे वडिलांच्या निधनानंतर स्वतःमध्ये झालेले बदल सांगत अभिनेता म्हणाला, “आता मी माझ्या मुलांबरोबर, पत्नीबरोबर आणि कुटुंबाबरोबर आधीपेक्षा जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करतो. बॉक्स ऑफिस, रिव्ह्यू, भूमिका या गोष्टी शेवटी इतक्या महत्त्वाच्या वाटत नाहीत. खरं यश म्हणजे आपल्या आवडत्या लोकांसोबत किती वेळ घालवतो यात आहे. नाव आणि पैसा याचा काय उपयोग, जर तो आनंद साजरा करायला कोणीच नसेल?”.

बॉबी देओलने पुढे धर्मेंद्र यांच्या आठवणीही सांगितल्या. वडिलांबद्दल अभिनेता म्हणाला, “मी अजूनही त्यांचे इंस्टाग्रामवरचे रील्स पाहतो. ते खूप साधे आणि प्रेमळ होते. कधी कधी असं वाटतं, जणू ते माझ्याशीच बोलत आहेत.” वडिलांच्या ‘इक्कीस’ या शेवटच्या चित्रपटाबद्दल बोलताना बॉबीने सांगितलं की, प्रीमियरला त्याने धर्मेंद्र यांचा आवडता शर्ट घातला होता. “तो शर्ट ते नेहमी घालायचे, म्हणून मी तो घालून गेलो. त्यामुळे ते माझ्यासोबत आहेत असं वाटलं.”

वडिलांच्या जाण्यामुळे बॉबी देओल त्याच्या सावत्र बहिणी ईशा देओल आणि अहाना देओल यांच्याही अधिक जवळ आल्याचं त्याने म्हटलं आहे. तो म्हणाला, “मला वाटतं, आम्ही सगळे आपापल्या पद्धतीने या दुःखाला सामोरं जात आहोत. कधी कधी दुःखात असल्यामुळे एकमेकांबद्दल गैरसमज होतो. प्रत्येकाला आपलं दुःखच जास्त वाटतं. पण वेळ दिला की सगळं हळूहळू नीट होतं. एखाद्या व्यक्तीचं जाणं कुटुंबाला पुन्हा एकत्र आणतं,” असं तो म्हणाला.